किरकिर किरकिर गजर वाजतो भल्या पहाटे 'पिडतो'
'स्नूझ' करुन मी परत झोपतो रोजच उशीर होतो..!
खडबडून मग उठतो आणिक किती धावपळ करतो
नाश्ता सोडुन देतो कारण रोजच उशीर होतो..
कापुन घेतो हनुवटीस मी पटपट दाढी करतो
पाणी ओतुन बदाबदा मी 'बुडबुड गंगे' म्हणतो!
इस्त्री करतो शर्टाला अन तशीच पँट चढवतो
सॉक्स घालतो पुन्हा कालचे, रोजच उशीर होतो !
खिश्यात केवळ चिल्लर असून रिक्शाला थांबवतो
पुन्हा पुन्हा मी घड्याळ बघतो अन सुस्कारे देतो
कसाबसा तो चुकवून ट्रॅफिक स्टेशनला पोचतो
रुपया-रुपया मोजुन देता रोजच उशीर होतो
तोबा गर्दी भरलेली, मी पुन्हा पुन्हा चेंगरतो
गाडी माझी निघून जाते हताश मीही बघतो
लगडुन येते पुढची गाडी मीही तिला लगडतो
मुठीत घेतो जीव तरीही रोजच उशीर होतो
सरतच नाही काम जराही फुरसत मला न मिळते
कँटिनमधल्या अड्ड्यांनाही मला न जाता येते
उगा जरासे गिळून तुकडे माझा लंच उरकतो
अड्डे जाती उठुन मला तर रोजच उशीर होतो
रात सावळी उरते माझा दिवस सुना मावळतो
पुन्हा लगडण्या गाडीला मी उलटपावली येतो
किती रिकामी गाडी असते चौथी जागा घेतो !
तिसऱ्या प्रहरी घरी पोचतो, रोजच उशीर होतो
असाच माझा रहाटगाडा थोडा कुरकुर करतो
पोटासाठी सगळी मरमर, मरत मरत मी जगतो
पेरुन स्वप्ने मिटतो डोळे, ग्लानी येउन निजतो
किरकिर किरकिर गजर वाजतो, रोजच उशीर होतो......
किरकिर किरकिर गजर वाजतो, रोजच उशीर होतो......!
....रसप....
१२ नोव्हेंबर २०११