झेलताना वादळाला हार ना मी मानली
लोटले मी सागराला, हार ना मी मानली
पाठ माझी पाहुनी हल्ल्यास तो सरसावला
माफ केले भेकडाला, हार ना मी मानली
मी जिथे गेलो तिथे काटेच होते सांडले
पाहुनी एका फुलाला हार ना मी मानली
हा नशीबाचा रडीचा डाव आयुष्यासवे
जिंकुनीही हारण्याला हार ना मी मानली
चेहरा ओढून घे वा सजवुनी भांगास घे
पाळताना बंधनाला हार ना मी मानली
बोल तू बिनधास्त 'जीतू' शब्द होऊ दे सुरे
ऐकुनी निर्ढावण्याला हार ना मी मानली
....रसप....
८ नोव्हेंबर २०११
छान. असा दृष्टिकोन हवाच :-)
ReplyDeleteक्षणभर वाटलं माझीच व्यथा आहे !
ReplyDelete