Monday, August 29, 2011

सलाम अण्णा! Salute Anna hajare!



अखेरीस सरकार झुकलं..
अहिंसेच्या ताकदीपुढे झुकलं!

"अजून हा अर्धाच विजय आहे", हे अण्णांचं म्हणणं जरी बरोबर असलं, तरी हा अर्धा विजयसुद्धा अहिंसात्मक  विचाराने दिलेल्या लढ्याचाच आहे. हिंसा फार काळ टिकत नाही आणि तिला बळाचा वापर करून दडपता येतं. पण अहिंसेवर बळाचा उपयोग करता येत नाही, त्यामुळे असा लढा मोडून काढणं फार कठीण असतं. गांधींचे विचार आज पहिल्यांदा मला पटत आहेत. अण्णांनी ते मलाच नव्हे, करोडो भारतीयांना पटवून दिले आहेत.

१२ दिवस उपोषण!
मी १२ तास उपाशी राहू शकत नाही! पण मोठ्या लढाया जिंकण्यासाठी मोठा संयम लागतो.
असं म्हणतात की, एका गाढवांच्या सेनेचा सेनापती सिंह असेल आणि एका सिंहांच्या सेनेचा सेनापती गाढव असेल तर गाढवांची सेना सिंहांच्या सेनेलाही सहज हरवू शकते..!! इथे तर अण्णांच्या सेनेत सेनापतीसह सैनिकही सिंहच होते आणि सरकारच्या सेनेत गाढव सैनिकांचा सेनापती नावाचाच 'सिंह' निघाला..  ना आवाज ना धमक!

काल संसदेच्या विशेष सत्रात लालूप्रसाद आणि शरद यादव ह्या भारतीय राजकारणाच्या सगळ्यात ओंगळवाण्या चेहऱ्यांनी आपली वैचारिक पातळी आणि हीन मनोवृत्ती दाखवताना अण्णा व त्यांच्या टीमवर टीका केली.
शरद यादव ह्यांचं म्हणणं आहे की ते गोरगरीबांची सेवा करून इथपर्यंत पोचले आहेत (!) आणि त्यांचा असा जाहीर अपमान होणे अयोग्य आहे. (म्हणजे खासदारांच्या घराबाहेर धरणे आंदोलन करणे, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणे, सर्व नेते भ्रष्ट आहेत असं जाहीरपणे बोलणे, ई.) आणि लालूंनी तर ह्याला जातीय रंग देण्याचा गलिच्छ प्रयत्न केला! म्हणे, "फुले-आंबेडकरांच्या भूमीतून आलेल्या अण्णांनी दलित समाजाच्या समस्यांना का उचलून धरले नाही!"
"सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही" असं म्हणतात ते खरंच आहे. गेल्या १२ दिवसात जनतेने सरकार व राजनेत्यांवरील आपला अविश्वास एकमुखाने, उस्फूर्तपणे दाखवला, तरी त्यातून काही बोध घेणे तर राहिलं दूरच, उलटपक्षी "मियाँ पड़ें तो टंगड़ी ऊँची"!! अजूनही ह्यांचा माज उतरत नाही!

माझ्या "लोकशाहीतून यादवीकडे" ह्या पूर्वीच्या एका लेखात मी म्हटल्याप्रमाणे, ह्या आणि असल्या निर्लज्जांना खुर्चीवर बसवणारे आपणही ह्यात दोषी आहोत.

असो. अजून अर्धी लढाई बाकी आहे. विधेयक अंमलात आल्याशिवाय हा विजय पूर्ण मानता येणार नाही.
पण एक विचार मनात पुन्हा पुन्हा येतोय.. कायदा बनण्याआधीच त्याला तोडायसाठी पळवाटा शोधल्या जातात.. लोकपालाच्या संरचनेतही त्याला बनवणारे स्वत:साठी पळवाटा ठेवतीलच ना?


3 comments:

  1. विजय साजरा करायची जरा घाई करताहेत लोक अस वाटतंय! संसदेत अशी किती तरी 'बिल' पडून राहतात ..

    ReplyDelete
  2. @ aativas,

    नक्कीच..
    म्हणूनच हा अजून अर्धाच विजय आहे!

    ReplyDelete
  3. You can publish the poem:) I'm so sorry, I don't know marathi. Anyways, will translate it:)

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...