कुंतलकाळी रात सारुनी पहाटवारा खेळत होता
तुझ्या कुशीतुन हळूच निसटुन पहाटवारा हासत होता
सुगंध श्वासांमधून माझ्या तनामनाला व्यापुन गेला
दरवळ माझ्या 'रातकली'चा पहाटवारा उधळत होता
क्षितिजावरचा रक्तलालिमा नव्हता ओठांपरी रंगला
तुझ्या मल्मली मिठीस वेडा पहाटवारा उसवत होता
अजून बाकी तृषा मनाची स्वप्न मनोहर अजून बाकी
फुले शहारा पुन्हा पुन्हा अन् पहाटवारा डिवचत होता
रिमझिम श्रावण सरी झेलतो गवाक्षातुनी चोरुन बघतो
पळवे ना त्या चंद्राला तो पहाटवारा गुंजत होता
कधी न ऐसा गंध माळला कैफ न ऐसा कधी जाणला
गुपीत कानामधे येउनी पहाटवारा सांगत होता
....रसप....
९ ऑगस्ट २०११
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!