Thursday, August 11, 2011

तुझे "मिसरे"..


तुझ्याच पायी लोळण घेती दरवळणारे हजार मिसरे
कधी मला तू ओंजळ भरुनी थोडेसे दे उधार मिसरे


स्पर्श तुझ्या कलमाचा होउन लखलखणारा शब्द एक दे
झळकुन होतिल कनक अन्यथा असेच माझे सुमार मिसरे


सुगंध यावा कागदासही अशी सुगंधी गझल वाचली
फिरून फुलली बाग पुन्हा ते उधळुन गेले बहार मिसरे


थकलो, हरलो, पिचून गेलो रहाटगाडा ओढुन आम्ही
निश्चल झाल्या मनास देती जोम, दिलासा, उभार मिसरे


जसा षड्ज ऐकुनी चुकावा रसिकाच्या हृदयाचा ठोका
तसेच गझला तुझ्या वाचुनी शायर विसरे टुकार मिसरे


शरण तुला हा 'जीत' येतसे शब्दकोकिळे अद्वितीय तू
मला कधी ना सूर गावला, तुझे सुरेले तुषार मिसरे !



....रसप....
९ ऑगस्ट २०११

क्रांती ताई साडेकर ह्यांच्यासाठी


"मिसरा" (उर्दू) - कवितेतील/ खासकरून गझलेतील एक ओळ/ चरण/ पंक्ती. 

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...