आपली बस ठरलेली
तुझी जागा ठरलेली;
माझी जागा ठरलेली
तुझ्या गालावरची बट
तू कानामागे खोवायची
बटसुद्धा अशी लोचट
पुन्हा पुन्हा रूळायची....
....पुन्हा पुन्हा झुलायची
दीड तासाचा प्रवास
तुझ्या सुगंधाने बहरायचा
रोज एक नवा गुलाब
मनामध्ये फुलायचा
परत घरी येताना
वेगळे वेगळे यायचो
कारण मी ऑफिसमध्ये
उशीरापर्यंत बसायचो
त्या दिवशी मात्र
गडबड झाली होती
पावसामुळे ऑफिसं
लौकर सोडली होती
पाऊस मी म्हणत होता
छत्र्या फाडून बरसत होता
टॅक्सी-रिक्शा-बस साठी
नुसता गोंधळ चालला होता
मी घाई केली नाही
ऑफिसातच थांबलो
दुसऱ्या दिवशी सकाळी
घरी परत आलो
पण त्या दिवशीनंतर तू
परत दिसलीच नाहीस
पाऊस गेला, पाणी सरलं
तरी तू आलीच नाहीस
आजकाल तुझ्या घरालाही
म्हणे कुलूपच असतं
बाल्कनीतून गुलाबफुल
एकटंच हसत असतं
आता जेव्हा कधीही
आभाळ भरून येतं
गुलाबाचा गंध माझ्या
मनात सोडून जातं...
....रसप....
९ जुलै २०११
पावसाळी नॉस्टॅलजिया १ ते १२
आजकाल तुझ्या घरालाही
ReplyDeleteम्हणे कुलूपच असतं
बाल्कनीतून गुलाबफुल
एकटंच हसत असतं
आता जेव्हा कधीही
आभाळ भरून येतं
गुलाबाचा गंध माझ्या
मनात सोडून जातं...
रणजीत काय बोलावे .. अफलातून