Wednesday, July 27, 2011

रुसवा.... २६ जुलै २००५ चा..

काल.. एका महाप्रलयास ६ वर्षे पूर्ण झाली. ह्याच दिवशी, २६ जुलै २००५ ला मुंबईला अपरिमित पावसाने अक्षरश: झोडपून काढलं होतं.
एक काल्पनिक काव्यकथी.. एका "त्या"ची आणि "ती"ची.
आवडली तर अवश्य सांगा, न आवडल्यास कारणही सांगा..!
तिचा लटका राग
आणि त्याचं समजावणं
मिनतवाऱ्या करणं
मुसळधार पावसातही चालूच होतं
बँडस्टॅण्डचा समुद्र भलताच खवळलेला होता
त्या दिवशी पाऊसही जणू पिसाळलेला होता
पण लटक्या रागाला अन मिनतवाऱ्यांना
कसलीच शुद्ध नव्हती..
नखशिखांत भिजल्याचीही

रिजेन्ट हॉटेलकडून एक रिक्शा आली
लगबगीने ती तिच्यात बसती झाली..
त्याच्या हाकांना दुर्लक्षून..
"अंधेरी.. जल्दी.."

हे नेहमीचंच होतं..
त्याचं उशीरा येणं
आणि तिचं रुसणं..
रुसून रिक्षा पकडणं..
आणि त्याने पाठलाग करून रिक्षा थांबवणं..!!

रिक्षा सुरू झाली..
त्यानेही बाईककडे धाव घेतली..
आणि सुरू झाला पाठलाग..
अरे..!
पण इतकं पाणी कधीच भरलं नव्हतं..
रिक्षा पुढे निघून गेली..
गुडघाभर पाण्यात बाईक बंद पडली..
एव्हढ्या पाण्यातून बाईक ढकलत जायचं..?
छे: शक्यच नाही..
शेवटी रस्त्याच्या कडेला बाईक सोडून..
तोही रिक्षा शोधू लागला..

अंधेरी आलं..
पण तो नाही आला..
"कुणास ठाऊक का? चिडला की काय?
हुं:! चिडला तर चिडू दे..
नेहमीच कसा उशीरा येतो?
मीही नाही फोन करणार!"

रुसव्या-फुगव्यातच दिवस सरला..
सकाळ झाली तरी फोन नाही आला
"शहाणाच आहे.. बघतेच आता..
पण फोन का लागत नाहीये..?

आता मात्र हद्द झाली
दुपार होत आली!
घरीच फोन करते.."
२ ६ १ _ _ _ _ ६
"हॅलो, _ _ _ आहे का?"

एक शांतता.. आवाज बदलला..
"तो कालपासून घरीच नाही आला"

एक तो २६ जुलै.. आणि एक आजचा
रुसवा अजून गेला नाही
तो अजून आला नाही....



....रसप....
२६ जुलै २०११
२६ जुलै २००५ वर लिहिलेली अजून एक कविता - पावसाळी नॉस्टॅलजिया

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...