नवीन देश बांधणे सुरू करा हळूहळू
नवीन वाट चालणे सुरू करा हळूहळू
नसानसांत वाहते कृतघ्नता निलाजरी
नवीन रक्त शोषणे सुरू करा हळूहळू
नको मनास बोचणी बरेच पाप जाहले
नवा हिशेब मांडणे सुरू करा हळूहळू
नकार स्वर्ग भोगण्या मिळे जरी तमा नको
नशेत धुंद झिंगणे सुरू करा हळूहळू
नरोत्तमास ह्या जगात यातनाच लाभती
नराधमांस पूजणे सुरू करा हळूहळू
न रेशमी न भरजरी सफेद वस्त्र साजरे
नमून डाव साधणे सुरू करा हळूहळू
नशीब-देव-दैव सर्व झूठ वाटते 'जितू'
न पाप-पुण्य जाणणे सुरू करा हळूहळू
....रसप....
२३ जून २०११
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!