क्षणोक्षणी मरायचे हळूहळू हळूहळू
हलाहलास प्यायचे हळूहळू हळूहळू
उदास रात्र आजची उद्या उदास सूर्यही
इथे मुके रडायचे हळूहळू हळूहळू
मला नकोत सांत्वने, नकोत फोल भाषणे
लपून घाव द्यायचे हळूहळू हळूहळू
कुठे असेल देव तो कुणास ठाव ना इथे
तरी पुढे चलायचे हळूहळू हळूहळू
असीम प्रेम मी दिले, चुकून पाप जाहले
म्हणून मी जळायचे हळूहळू हळूहळू
कधीकधीच लाभते भरून साठवा तुम्ही
कधी तरी सरायचे हळूहळू हळूहळू
बघा जरा इथे कुणी, दया न ये कुणास का?
मरूनही सडायचे हळूहळू हळूहळू
....रसप....
१४ जून २०११
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!