Friday, April 29, 2011

तुषार.... अपरंपार..!

आले-गेले येथे फार
उरला आहे एक तुषार

गोडी शब्दांमधे अपार
काव्यस्वरूपी एक तुषार

वाही एकटा कितीक भार
खंबीर आहे एक तुषार

अभ्यासूनी खोल विचार
करतो तो हा एक तुषार

थोरांमधला खास हुशार
म्हणती सारे एक तुषार

हक्काचा आहे आधार
अमुच्यासाठी एक तुषार

जोडे सर्वांना जी तार
झटतो-झिजतो एक तुषार

उत्साहाची संततधार
नित्य बरसतो एक तुषार

कधीच माने ना जो हार
लढवय्या तो एक तुषार

नित्य सांगतो युक्त्या चार
मुत्सद्दी हा एक तुषार

पचवून झाले सर्व विखार
अमृतधारा एक तुषार

नसेच कोणी असा उदार
ज्ञान वाटतो एक तुषार 

नावाचा हा फक्त तुषार..
सागर आहे अपरंपार


....रसप....
२७ एप्रिल २०११

Thursday, April 28, 2011

शुक्रिया ज़िन्दगी - भावानुवाद

कणभराचं तरी चांदणं लाभलं
फूल ह्या कळीचं जरा हासलं
जीवना धन्यवाद, झाले उपकार रे

एकरंगी छबी कधी शोभेल का?
वेदनेविना नाही किंमत सुखा
मोहवी मनाला ना उन्हं-सावली?
अढी ठेवण्या नसे रे वेळ कोठली!
जीवना धन्यवाद, झाले उपकार रे

नशीबाची पहा आहे ऐशी कथा
कधी जीवघेणे कधी देई मुभा
मुभा लाभता आली मनी शांतता
जीव घे जो तयावर जीव भाळला
जीवना धन्यवाद, झाले उपकार रे

-
मूळ गीत/ कविता: शुक्रिया ज़िंदगी
गीतकार/ कवी: मीर अली हुसैन
भावानुवाद: ....रसप....
२८ एप्रिल २०११



मूळ गीत:

छन के आयी तो क्या चाँदनी तो मिली
चंद दिनही सही यह कली तो खिली
शुक्रिया ज़िन्दगी, तेरी मेहरबानियाँ

सिर्फ इक रंग से तस्वीर होती कहीं
ग़म नहीं तो ख़ुशी की कीमत नहीं
धूप छाँव दोनों हैं तो दिलकश जहां
क्या शिकायत करें, फुरसत कहाँ
शुक्रिया ज़िन्दगी, तेरी मेहरबानियाँ

अपनी तक़दीर की है यह दास्ताँ
कभी क़ातिलाना, कभी मेहरबाँ
मेहरबानी जो दिल को करार आ गया
अपने क़ातिल पे भी प्यार आ गया
शुक्रिया ज़िन्दगी, तेरी मेहरबानियाँ

- मीर अली हुसैन

Wednesday, April 27, 2011

कोणी काय झाकले आहे?

क्रांती ताईंच्या "नाते" ह्या गजलेतील "पाहिले काल चंद्राला एकांती मुसमुसताना" ह्या ओळीवरून प्रेरणा घेउन अभिजीत दाते ह्यांच्या अप्रतिम गजलेतील "दवबिंदू ही दुनिया ज्याला खुशाल म्हणते आहे" ह्या ओळीवरून पुढे -

.
दवबिंदू ही दुनिया ज्याला खुशाल म्हणते आहे
मी चंद्राला मुसमुसताना काल पाहिले आहे


कळ्या उमलता फुले म्हणूनी माळी हसतो वेडा
पण भुंग्याने मधास सा-या कधीच प्याले आहे


पारंब्यांना सोडुन खाली वडास सुस्ती आली
बांडगुळांनी अंथरुण त्यासि कधीच केले आहे


सूर्य उगवता पक्षी किलबिल करून जागे होती
अंधाराच्या मुठीत कोणी काय झाकले आहे?


उचलुन घेता खडा लागला घागर वाहुन गेली
थोडे खारे, बाकी गोडे भिजवुन गेले आहे


'जीत' जिंकला कधी हारला, खेळ संपला नाही
शांत मरायासाठी झटता जगणे हुकले आहे


....रसप....
२७ एप्रिल २०११

Tuesday, April 26, 2011

शिक्षा ह्या अपराधाला आजन्म मारणे होते

प्रभा प्रभुदेसाई ह्यांच्या गजलेतील ओळीवरून पुढे -

पाऊस पुन्हा ओघळला मन जागे माझे झाले
तू चुरला गुलाब, डोळे थोडेसे ओले झाले

पाहून चांदणी वाटे गालामध्ये हसली तू
चंद्राने चोरुन बघता संचितही ताजे झाले

काचेवरचे ते ओघळ अश्रूंसह वाळुन जाती
पण दु:ख कधी का ऐसे चुपचाप चालते झाले?

दे घाव आणि थोडेसे, जाई न प्राण हा माझा
प्रेमाबदली घाताचे हे खासच देणे झाले!

मी लिहिली होती कविता भाळूनी सौंदर्याला
कोणाला ठाउक होते की कितीक वेडे झाले ?

लोकांनी हसण्यासाठी मी प्रेम न केले होते
होताच हसे हे माझे आशीक़ शहाणे झाले

प्रेम केले अन झाला 'जीतू' तू घोर अपराधी
शिक्षा ह्या अपराधाला आजन्म मारणे होते

....रसप....
२६ एप्रिल २०११

Saturday, April 23, 2011

मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

भट सरांच्या गजलेतील "मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते" ह्या ओळीवरून पुढे लिहिली आहे. लहान तोंडी फारच मोठा घास आहे. गुस्ताखी माफ.



मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
दुनिया करते वा-वा ते, हृदयाचे खवले होते


आरोप असेही झाले मी रमलो स्वैराचारी
म्हणताना हाती प्याले घेऊन झिंगले होते

हातावरच्या रेषांना होती थोडीशी वळणे
गिरवून पुन्हा मी त्यांना आखून घेतले होते

क्षितिजावर आभाळाची शकले पडलेली होती
वेचाया हृदयाला ते आभाळ वाकले होते

कोणाला होती चिंता जगण्याची मरता-मरता
मृत्यूच्या वाटेवरती जगण्याचे इमले होते

ना जीत ऐकला कोणी, ना जीत पाहिला कोणी
आता म्हणती वेड्याला हे काय जाहले होते ?

....रसप....
२५ एप्रिल २०११

Thursday, April 21, 2011

भूल जाऊँ अब यही मुनासिब है - भावानुवाद


आता इष्ट असे तुला विसरणे, ना शक्य होई परी
नाही स्वप्न कुणी खरीच असशी, वाटे मनाला तरी

माझे हाल कसे कुणा समजणे, झालोय वेडा-खुळा
जे नाही घडले तया विसरण्या माझ्या मना सावरी

अव्यक्ती पडले विचार अधुरी राहून गेली कथा
ऐशी ओढ मला कधीच नव्हती, कल्पीत ते मी स्मरी

सांगावे मजला कुणी मन खुळे आता कसे सावरू
नाही स्वप्न कुणी खरीच असशी, वाटे मनाला तरी

-
मूळ कविता: भूल जाऊँ अब यही मुनासिब है
कवी: जावेद अख्तर
भावानुवाद: ....रसप....
२१ एप्रिल २०११


मूळ कविता:

भूल जाऊँ अब यही मुनासिब है
मगर भुलाना भी चाहूँ तो किस तरह भूलूँ
कि तुम तो फिर भी हक़ीक़त हो कोई ख़्वाब नहीं

यहाँ तो दिल का ये आलम है क्या कहूँ कमबख़्त

भुला सका न ये वो सिलसिला जो था ही नहीं
वो इक ख़याल
जो आवाज़ तक गया ही नहीं
वो एक बात
जो मैं कह नहीं सका तुम से
वो एक रब्त
वो हम में कभी रहा ही नहीं

मुझे है याद वो सब
जो कभी हुआ ही नहीं

अगर ये हाल है दिल का तो कोई समझाए
तुम्हें भुलाना भी चाहूँ तो किस तरह भूलूँ

कि तुम तो फिर भी हक़ीक़त हो कोई ख़्वाब नहीं

- जावेद अख्तर

Tuesday, April 19, 2011

बेबंद

क्रांती सडेकर ह्यांच्या गजलेतील ओळीवरून पुढे -

अज्ञात मुक्कामास मी माझा निवारा मानले
सांडून थोडी वेदना मी तो उबारा मानले


मी आठवांची घेतली होती शिदोरी बांधुनी
अर्ध्याच घासाला भुकेचा मी सहारा मानले


"पूर्वेकडे येतां उषा" सा-या जगाने पाहिले
माझ्या पहाटेला जरासे मी उशीरा मानले


पाऊल माझे चालले रस्ता जिथे जाई तसे
अन चांदण्याला थांबण्याचा मी इशारा मानले


तोडून "जीतू" बंधने वागे मना वाटे तसा
संवेदनांच्या चौकटीला एक कारा मानले



....रसप....
१९ मार्च २०११

Wednesday, April 13, 2011

"पंचम" (भावानुवाद - ३)

आठवतात का तुला, ते दिवस पावसाचे?
दरीखो-यांतून, धुक्यातून वाट काढणा-या रुळांचे?

ते रूळ अजून तसेच आहेत..


रोपट्यांसारखे बसलो होतो
हिरव्याकंच गालिच्यावर
डोळे लावून होतो आपण
येणा-याच्या वाटेवर

तो गालिचा अजून तसाच आहे..


ट्रेनसाठी थांबलो होतो
रुळांवरती बसून
तीही आली नाही, तोही आला नाही
तू गेलास निघून..
तुझ्यामागे इथे
धुकं दाटलं आहे
तुझ्या जुन्या आठवांनी
मला ग्रासलं आहे..

त्या धुक्यात, मी एकटा... अजून तसाच आहे..!


-
मूळ कविता: "पंचम"
कवी: गुलजार
भावानुवाद: ....रसप....
१३ एप्रिल २०११




मूळ कविता:
याद हैं बारिशों का दिन पंचम
जब पहाड़ी के नीचे वादी में,
धुंद से झाँक कर निकलती हुई,
रेल की पटरियां गुजरती थी..!

धुंद में ऐसे लग रहे थे हम,
जैसे दो पौधे पास बैठे हो..
हम बहुत देर तक वहाँ बैठे,
उस मुसाफ़िर का जिक्र करते रहे,
जिसको आना था पिछली शब, लेकिन
उसकी आमद का वक़्त टलता रहा!

देर तक पटरियों पे बैठे हुए
ट्रेन का इंतज़ार करतें रहे
ट्रेन आयी, न उसका वक़्त हुआ,
और तुम यूं ही दो कदम चल कर
धुंद पर पाँव रख के चल भी दिए

मैं अकेला हूँ धुंद में पंचम!!


- गुलज़ार

भंगारचा भाव

बराच वेळ दिला तरी,
भंगारच्या भावासाठीही गि-हाईक आलं नाही
किंवा कदाचित..
असंही असेल.. फार जोर लावला नाही मी
मला 'मार्केटिंग' करता आलं नाही

अजब बाजार आहे ही दुनिया
इथला कायदा कळता कळत नाही
जिथे भाव कमी तिथे
गि-हाईक फिरकत नाही!

पण लुटलेल्याने महाग व्हायचं तरी कसं?
विझलेल्याने खोटं-खोटं चमकायचं कसं?
ऊर फुटत असताना हसायचं तरी कसं?
तीळ तीळ मरताना जगायचं कसं?
म्हणूनच -
मी उद्या पुन्हा बाजारात जाणार आहे
आता जरा चढा भाव लावणार आहे

मोडीत काढलं तरी काय झालं..?
आयुष्य आहे.. विकेलच.


....रसप....
१२ एप्रिल २०११

Tuesday, April 12, 2011

अति झालं क्रिकेट..! ;-)

किती तुमचा स्टॅमिना हो? विचारावं थेट..
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

टेस्ट नंतर वनडे नंतर ट्वेंटी२० खेळतात
वर्ल्डकप नंतर चारच दिवसात आयपीएल रंगतात
जिंकल्यानंतर विजेत्यांच्या चैम्पियन्स ट्रोफी भरतात
कुणीतरी खातो का हो, जेवल्यानंतर भरपेट?
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

कोण कुठला बिस्ला म्हणे कॅलीससोबत खेळतोय
डिब्ली-डुब्ली बोलरसुद्धा पहिली ओव्हर टाकतोय
वाकूच शकत नाही तरी, आशिष नेहरा धावतोय!
मनोरंजनाची अशी कुणी देतं का हो भेट?
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

धडकी भरे उरात जेव्हा हॉल धावत यायचा
भारतीयांच्या फिरकीपुढे फलंदाज नाचायचा
दिवसभरात २०० धावा, चांगला खेळ वाटायचा
आता क्रिकेट बघताना - "फॅसन युवर बेल्ट"
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

किती आमच्या जीवाला घोर लावणार तुम्ही
स्कोरकडे लक्ष ठेवून कामं करतो आम्ही
सामने बघता बघता पितो बादल्या-बादल्या पाणी!
हार्टपेशंटच्या ठोक्यांचा वाढतो आहे रेट
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

रोज घरी जातो तेव्हा मैच सुरू असते
स्पोर्ट्स चैनल लावलं म्हणून आमची 'ही' चिडते
झोपता झोपता डोक्याशी भुणभुण करू लागते
माझ्या मात्र डोक्यात असतं - "गेली कशी विकेट?"
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

बीसीसीआय बघता बघता दादा मंडळ झालं
क्रिकेटचं 'मार्केट' आता उपखंडात आलं
मधल्यामध्ये खेळाडूंचं उखळ पांढरं झालं!
नाक्या-नाक्यावरती आता "क्रिकेट-क्रिकेट-क्रिकेट"
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

देव झाला सचिन आणि हीरो झाला धोनी
एक होतात क्रिकेटसाठी राम-रहीम-जॉनी
विजयासाठी धावा-दुवा हात उचलून दोन्ही
विसरून जातात भ्रष्टाचार अन फिक्सिंगचे रैकेट
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

....रसप....
१२ एप्रिल २०११

Monday, April 11, 2011

"पंचम" (भावानुवाद - २)

न्हाऊन चिंब होता गंधाळल्या सरींनी
शोधीत वाट येती ऐसे धुक्यामधूनी
डोकावती, पहाती ते रूळ आपल्याला
ओल्या दिसांस तूही स्मरतोस का अजूनी

बसलास पास माझ्या उधळून सूर काही
अर्धीच धून प्यारी घुमली दिशांत दाही
धुंदीत त्या धुक्याच्या बसलो विचारमग्न
हिरव्या सभोवताली हिरवेच तू नि मीही

का शब्द येइना ते झाला उशीर आता
पाहून वाट बसलो दोघे रुळांवरी त्या
येतील का कधी ते, रुचतील का सुरांना
दोन्ही मनांत अपुल्या तेव्हा विचार होता

अन तेव्हढ्यात का रे गेलास तू उठूनी
वाटेवरी धुक्याच्या शब्दांस पाखडूनी
झाले नकोनकोसे तुजवीण एकट्याने
आयुष्य आज माझे मोडीत काढले मी


-
मूळ कविता: "पंचम"
कवी: गुलजार
भावानुवाद: ....रसप....
११ एप्रिल २०११



मूळ कविता:
याद हैं बारिशों का दिन पंचम
जब पहाड़ी के नीचे वादी में,
धुंद से झाँक कर निकलती हुई,
रेल की पटरियां गुजरती थी..!

धुंद में ऐसे लग रहे थे हम,
जैसे दो पौधे पास बैठे हो..
हम बहुत देर तक वहाँ बैठे,
उस मुसाफ़िर का जिक्र करते रहे,
जिसको आना था पिछली शब, लेकिन
उसकी आमद का वक़्त टलता रहा!

देर तक पटरियों पे बैठे हुए
ट्रेन का इंतज़ार करतें रहे
ट्रेन आयी, न उसका वक़्त हुआ,
और तुम यूं ही दो कदम चल कर
धुंद पर पाँव रख के चल भी दिए

मैं अकेला हूँ धुंद में पंचम!!


- गुलज़ार

"पंचम" (भावानुवाद - १)

गर्द हिरव्या डोंगर द-यांत
सांडलेल्या धुक्यातून
वाट काढत रूळ जात असत..
ते पावसाचे दिवस आठवतात का तुला?

धुक्यामधले आपण दोघे
जणू दोन छोटी रोपटीच दिसत असू
किती तरी वेळ बसून आपण
"ती" धून बांधत होतो
आणि ती पूर्ण होता होता
अर्धी रहात होती

रुळांवर बसून आपण
शब्दांची वाट बघत होतो
शब्द सुचले नाहीत
धूनही अर्धीच राहिली
आणि तू न सांगताच..
धुक्यात सामावून निघून गेलास...?

मी धुक्यात एकटा राहिलो आहे, मित्रा..


-
मूळ कविता: "पंचम"
कवी: गुलजार
भावानुवाद: ....रसप....
११ एप्रिल २०११



मूळ कविता:

याद हैं बारिशों का दिन पंचम
जब पहाड़ी के नीचे वादी में,
धुंद से झाँक कर निकलती हुई,
रेल की पटरियां गुजरती थी..!

धुंद में ऐसे लग रहे थे हम,
जैसे दो पौधे पास बैठे हो..
हम बहुत देर तक वहाँ बैठे,
उस मुसाफ़िर का जिक्र करते रहे,
जिसको आना था पिछली शब, लेकिन
उसकी आमद का वक़्त टलता रहा!

देर तक पटरियों पे बैठे हुए
ट्रेन का इंतज़ार करतें रहे
ट्रेन आयी, न उसका वक़्त हुआ,
और तुम यूं ही दो कदम चल कर
धुंद पर पाँव रख के चल भी दिए

मैं अकेला हूँ धुंद में पंचम!!


- गुलज़ार

Sunday, April 10, 2011

जो जीता वोही सिकंदर


जो जिंकतो तो राजा असतो
जो हरतो तो खुजा असतो
.
.
.
.
आईविनाच वाढलो
मी आणि दादा
माझी पावलं भरकटली
तो सरळ साधा

बाबा आणि दादाने
खूप खस्ता खाल्ल्या
मेहनत केली त्यांनी
मी गमजा मारल्या

अभ्यासात-खेळात
दादा हुशार होता
फालतू धंदे करण्यात
माझा नंबर होता

नापास झालो, वर्ष बुडलं
लाज वाटली नाही
चोरी केली, राडा केला
माज गेला नाही

दादाच्या प्रेमाला
कधीच जाणलं नाही
बाबांच्या स्वप्नांना
कधीच जगलो नाही

दादा, मला नेहमीच तू
सांभाळून घेतलंस
कृष्णकृत्यांवरती माझ्या
पांघरूणही घातलंस

ठाउक आहे मला तुझा
कुणी घात केला
पाठीमागून जीवघेणा
कुणी वार केला

तुझ्याजवळ मृत्यू पाहून
जागा झालोय मी
तुझ्याजागी खेळण्यासाठी
आता झटतोय मी

विजेत्याचं स्वप्न
फक्त विजयाचं असतं
त्वेषाने जो खेळतो त्याला
पछाडलेलं असतं

बाबा, दादा तुमचं स्वप्न
आज मी पाहतोय
जिंकीन किंवा हरीन
पण तुमच्यासाठी खेळतोय.. तुमच्यासाठीच खेळतोय

....रसप....
१० एप्रिल २०११

सडा.. (Get Romantic..!)


आज बागेमध्ये मोग-यांचा सडा
गंधतो अंगणा पावलांचा सडा


चांद होता जरा काल राती खुळा
केव्हढा सांडला चांदण्यांचा सडा


वाहतो गार वारा शहारा उठे
लाज शृंगारण्याच्या क्षणांचा सडा


रूप ते पाहुनी आरसे दंगता
भंगले, वेचतो आज त्यांचा सडा


ही नशा राहु दे झिंगलो मी असा
पापणी पेलते मोतियांचा सडा


शायरी खुद्द ती, शब्द होते तिचे
गुंफतो "जीत" त्या आठवांचा सडा


....रसप....
११ एप्रिल २०११

Thursday, April 07, 2011

छोटीसी बात

जैक्सन तोलाराम प्रा. लि. ची
फार जुनी परंपरा आहे
कंपनीतल्या प्रत्येकाने
प्रेमविवाहच केला आहे!

"अरुण"ची केस मात्र
जराशी वेगळी आहे
बोलायची हिंमतच नाही
सारं काही मनात आहे

सकाळ-संध्याकाळ "प्रभा"च्या
मागे-मागे जातो
तिने वळूनसुद्धा बघितलं तर
उलटा मागे फिरतो!

एकटाच आहे बिचारा
आई-बापाविना राहतो
सर्व काही चोख आहे
'विश्वासा'त मार खातो..

करता-करता हळूहळू
आपसूक ओळख वाढली
'प्रभा'च्याही मनामध्ये
अरुणचीच सावली!

पण बोलणार कसं समजेना
एक नंबर बावळट
दोघांच्या मध्ये घुसला
'नागेश' नामक चावट!

गुलाबाच्या काट्यासारखा
नागेश तिच्या सोबत असे
त्यासमोर गुमसुम गुमसुम
अरुण आणखीच बावळा दिसे

बाईक घेतली "फेल" झाली
अजून हसं झालं
मंत्र-तंत्र करूनदेखील
काहीच नाही झालं

शेवटचा उपाय म्हणून
खंडाळ्याला गेला
कर्नल जे. डब्ल्यू. एन. सिंगना
तडक जाउन भेटला

हा माणूस म्हणजे ना
अजब रसायन होतं
"ज्युलियस नगेन्द्रनाथ विल्फ्रेड" असं
विचित्र नाव होतं..

नावासारखीच ख्यातीसुद्धा
मोठी होती त्याची
स्मगलर, नेते, अभिनेते
मदत घेत त्याची

"व्यक्तीमत्त्व विकास" करण्यात
हातखंडा होता
सगळ्या समस्यांसाठी इथे
खास तोडगा होता

अरुणला यशस्वी करण्याचा
विडा त्याने उचलला
असा केला "ब्रेनवॉश", की
अरुण पूर्ण बदलला!

"कोर्स" पुरा करून अरुण
मुंबईला परतला
पावलोपावली "नागेश"ला
चीत करू लागला!

काहीतरी गडबड आहे
नागेशने जाणलं
'कर्नल'च्या फॉर्म्युलाला
त्याने अचूक ताडलं

"प्रभा"चे कान भरण्यास
त्याने सुरू केलं
पण प्रेम खरं होतं त्यांचं
तरीसुद्धा जिंकलं!

नागेशनेही धरली मग
खंडाळ्याची वाट
अरुण-प्रभाच्या प्रेमाची ही
"छोटीसी बात"!!


....रसप....
७ मार्च २०११

Wednesday, April 06, 2011

मी कधीच झालो नाही


मी कधीच झालो नाही
तव चित्र रंग भरलेले
माझे हे विश्वच अवघे
बेरंगी भरकटलेले

मी नव्हतो भिडला षड्ज,
बुडलेला खोल न खर्ज
मनव्याकुळ माझे गाणे
कणसुरात भरकटलेले..

मी अर्धा-मुर्धा पिकलो
अन फुलता फुलता थकलो
मी हिरवाई सरल्यावर
नि:शब्द पान गळलेले

मी गडगडणारे अभ्र,
जे दिसती नुसते शुभ्र
ओलावा वाऱ्यावरचा
आकाशी विखूरलेले

मी निर्झर झालो नाही
खळखळही जमली नाही
वाळूमधले मी पाणी
लाटांनी फसफसलेले

मी कधीच झालो नाही
कविता जी तू लिहिली ती
माझे हे असणे-नसणे,
शब्दांनी ओळखलेले...


....रसप....
६ मार्च २०११
(संपादित - ०७ जुलै २०१५)

दे घुमाके!

नको कोणती मिजास आता
नको कोणते उधार आता
चुकवून सारे आज टाकू दे
उडा के डंडी धूम मचा दे, दे घुमाके!

ध्येय एक जे मनी बाणले
स्वप्न लोचनी रोज पाहिले
सत्य करूया सर्व मनसुबे
जोर लगाके धूम मचा दे, दे घुमाके!

आज पणाला सर्व लावुया
जीव ओतुनी जीत खेचुया
देशाचीही शान वाढु दे
विकेट लेके धूम मचा दे, दे घुमाके

असो सामना कोणाशीही
हार मानणे मंजूर नाही
बाहूंना ह्या चेव चढू दे
जीत जीत के धूम मचा दे, दे घुमाके

....रसप....
६ मार्च २०११

Tuesday, April 05, 2011

नज़्म बहौत आसान थी पहले...(भावानुवाद)

कविता सुगम्य होती सहजीच मांडण्याला
जणु पालवी फुटावी बहरून पिंपळाला

मज भेटली कितीदा हस-या मुलाप्रमाणे
गलक्यास पाखरांच्या गजला म्हणावयाला

घरट्यात ह्याच माझ्या वसण्या कधी न आली
झटक्यात पूर्ण झाली बिलगून कागदाला

परि आज चित्र सारे बदलून भव्य झाले
गिळलेय भव्यतेने पुरते जुन्या जगाला

कविता अशीच आता असते मला अलिप्ता
तमसात ह्या विशादी ठिणग्या उजाळण्याला

सरकार-धर्म ह्यांची असली युतीच दैना
ममता पुरी पडेना नवजात अर्भकाला

शहरास पारखूनी कविता थकून येता
विटते, नकार देते रचनेत बंधण्याला

निघते, निघून जाते फुटपाथ गाठते ती
रडतोय वृद्ध जो त्यां नयनांत वाळण्याला

-
मूळ कविता: "नज्म बहौत आसान थी पहले..."
कवी: निदा फाजली
भावानुवाद: ....रसप....
५ एप्रिल २०११



मूळ कविता:

नज्म बहुत आसान थी पहले
घर के आगे
पीपल की शाखों से उछल के
आते-जाते बच्चों के बस्तों से निकल के
रंग बरंगी चिडयों के चेहकार में ढल के
नज्म मेरे घर जब आती थी
मेरे कलम से जल्दी-जल्दी खुद को पूरा लिख जाती थी,

अब सब मंजर बदल चुके हैं
छोटे-छोटे चौराहों से चौडे रस्ते निकल चुके हैं
बडे-बडे बाजार पुराने गली मुहल्ले निगल चुके हैं

नज्म से मुझ तक अब मीलों लंबी दूरी है
इन मीलों लंबी दूरी में कहीं अचानक बम फटते हैं
कोख में माओं के सोते बच्चे डरते हैं
मजहब और सियासत मिलकर नये-नये नारे रटते हैं

बहुत से शहरों-बहुत से मुल्कों से अब होकर
नज्म मेरे घर जब आती है.
इतनी ज्यादा थक जाती है
मेरी लिखने की टेबिल पर खाली कागज को खाली ही छोड के
रुख्सत हो जाती है और किसी फुटपाथ पे जाकर
शहर के सब से बूढे शहरी की पलकों पर
आँसू बन कर
सो जाती है।

..निदा फ़ाजली
Related Posts Plugin for WordPress, Blogger...