Tuesday, April 12, 2011

अति झालं क्रिकेट..! ;-)

किती तुमचा स्टॅमिना हो? विचारावं थेट..
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

टेस्ट नंतर वनडे नंतर ट्वेंटी२० खेळतात
वर्ल्डकप नंतर चारच दिवसात आयपीएल रंगतात
जिंकल्यानंतर विजेत्यांच्या चैम्पियन्स ट्रोफी भरतात
कुणीतरी खातो का हो, जेवल्यानंतर भरपेट?
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

कोण कुठला बिस्ला म्हणे कॅलीससोबत खेळतोय
डिब्ली-डुब्ली बोलरसुद्धा पहिली ओव्हर टाकतोय
वाकूच शकत नाही तरी, आशिष नेहरा धावतोय!
मनोरंजनाची अशी कुणी देतं का हो भेट?
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

धडकी भरे उरात जेव्हा हॉल धावत यायचा
भारतीयांच्या फिरकीपुढे फलंदाज नाचायचा
दिवसभरात २०० धावा, चांगला खेळ वाटायचा
आता क्रिकेट बघताना - "फॅसन युवर बेल्ट"
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

किती आमच्या जीवाला घोर लावणार तुम्ही
स्कोरकडे लक्ष ठेवून कामं करतो आम्ही
सामने बघता बघता पितो बादल्या-बादल्या पाणी!
हार्टपेशंटच्या ठोक्यांचा वाढतो आहे रेट
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

रोज घरी जातो तेव्हा मैच सुरू असते
स्पोर्ट्स चैनल लावलं म्हणून आमची 'ही' चिडते
झोपता झोपता डोक्याशी भुणभुण करू लागते
माझ्या मात्र डोक्यात असतं - "गेली कशी विकेट?"
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

बीसीसीआय बघता बघता दादा मंडळ झालं
क्रिकेटचं 'मार्केट' आता उपखंडात आलं
मधल्यामध्ये खेळाडूंचं उखळ पांढरं झालं!
नाक्या-नाक्यावरती आता "क्रिकेट-क्रिकेट-क्रिकेट"
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

देव झाला सचिन आणि हीरो झाला धोनी
एक होतात क्रिकेटसाठी राम-रहीम-जॉनी
विजयासाठी धावा-दुवा हात उचलून दोन्ही
विसरून जातात भ्रष्टाचार अन फिक्सिंगचे रैकेट
थोडा तरी दम घ्या..अति झालं क्रिकेट!

....रसप....
१२ एप्रिल २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...