१. पंढरपुरी
७.२८ ची विरार पकडून बान्द्र्यासाठी सुटायचं
माहीमलाच मित्राला मिस्ड कॉल देऊन कळवायचं
लगेच बिचारा मित्र येऊन स्टेशन बाहेर थांबणार
त्याच्या बाईकवरून आम्ही दोघं तिथून निघणार
कुलाब्याला राहातो तरी बान्द्र्याला का जातो?
तीच माझी पंढरी हो, दर्शन घेऊन येतो..!
कॉलनीतल्या बस स्टॉप मागे मोकळी जागा सोडलेली
तिथेच आम्ही आमची ही पंढरपुरी थाटलेली
करेक्ट ८.३० वाजता स्वारी आमची पोहोचे
स्वागत करण्यासाठी आधीच फौज तयार असे
चार कुत्रे, एक बोका, मित्रं आठ-दहा
बाळू पानवाला आणि सखारामचा चहा
हाच तो बस स्टॉप जिथून गाड्या पुन्हा वळतात
वळून गेल्या तरी पुन्हा परतून इथेच येतात
आमचीसुद्धा तसं पाहता हीच कहाणी आहे
एक पाय बाहेर पडला, तरी दुसरा इथेच आहे
....रसप....
६ जानेवारी २०१०
२. कसा मी असा
इथे ह्याच वेळी तुला पाहिले मी
भल्या सांजवेळी उजळल्या दिशा
तुला काय सांगू कसा हाल होता
एक श्वास येथे उसासा जसा
कधी रोखुनी तू मला पाहताना
मला तेच वाटे तुझे हासणे
असा तीर छातीवरी झेलण्याचा
किती हर्ष मोठा कळावा कसा
मनाशी अखेरीस हे बांधले मी
नसे शक्य आता उगी राहणे
भले वा बुरे काय होवो न जाणो
निखारा मनाशी जपावा कसा
कसे कोण जाणे तुला ठाव झाले
मुक्या मनसुब्यांचे मनोरे असे
तुझी वेळ आणि बसही बदलली
उभा ह्याच थांब्यावरी मी अता....!
....रसप....
२९ जानेवारी २०१०
३. चहावाला सखाराम
सख्याचा चहा कधीच वाफाळला नाही
चार घोटांपलीकडे जास्त टिकला नाही
तरी आम्हाला सख्याचा पुळका फार आहे
कारण 'तिथे' चहा प्यायचा मजाच और आहे
पिंपळाच्या झाडाखाली बाईक लावून बसणं
तिथूनच हाक मारुन बोटांनी सांगणं
चहावाल्या मामाचं कटिंग घेऊन येणं
चहा घेता घेता आम्ही त्याची फिरकी घेणं
आजचे पैसे उद्या कधी परवा सुद्धा देणं
खिश्यात पैसे असतानाही हात दाखवून जाणं
सख्यासुद्धा आमच्याकडे पैसे मागत नाही
त्याच्या-आमच्या हिशोबात गडबड असत नाही
BEST च्या कैंटीन मध्ये सख्या कामाला होता
कैंटीनवाला गणपत शिंदे पक्का पेताड होता
गल्ल्यावरतीच बसून मेला कच्ची मारत असे
सगळा व्यवहार आवडीने सख्याच पाहात असे
फार जुनी गोष्ट नाही पाचच वर्षं झाली
एके दिवशी कंट्राक्टरला खाड्कन जाग आली
शिंदेने कैंटीनचा गुत्ताच केला होता
BEST चा स्टाफसुद्धा तिथे येत नव्हता
पारसी बावा कंट्राक्टरने शिंदेला काढलं
मेहनती सख्याला त्यानेच वर आणलं
सख्यानेही बावाला नाराज नाही केलं
पाच वर्षांत दरवेळी भाडं वेळेत दिलं
प्रत्येक ग्राहकावरती त्याची बारीक नजर असते
चहा थंड असला तरी चव चांगली असते
....रसप....
७ जानेवारी २०१०
४. बाळ्या पानवाला
नावावरती जाऊ नका बिलकुल साळसूद नाही
चेह-यावरती जाऊ नका बिलकुल भाबडा नाही
ह्याला बाळासाहेब म्हणणं जरा अतीच होतं
म्हणून ह्याचं नाव आम्ही 'बाळ्या' केलं होतं
काय ह्याचा माज सांगू नवाबसुद्धा फिका
रोज इंग्लिश दारू पितो, खातो चिकन टिक्का
तसा फारसा बोलत नाही पण ऐकतो मात्र सारं
इथे-तिथे काड्या करण्यात ह्याचं नाव खरं
साडेचारची सिगरेट पाच रुपयाला देतो
पाकिटामागे पाच रुपये असेच फालतू काढतो
आम्ही मात्र कधी ह्याला भीक घालत नाही
सिगरेटसोबत मिंट गोळी घ्यायला विसरत नाही
बाळ्या आपला धंदासुद्धा नोकरी सारखा करतो
आठवड्यातला एक दिवस वीकली ऑफ घेतो
इथल्या मांजर-कुत्र्यांचा हाच मालक होतो
बहाद्दुराच्या चायनीजमधून हाडं आणून देतो
कॉलनीमध्ये कलेक्टरचं मोठं ऑफिस झालं
अतिक्रमणं तोडणार म्हणून फर्मान ऐकू आलं
सहा महीने बाळ्याचे बारा वाजले होते
सकाळ संध्याकाळ बिचा-याचा जीव मुठीत असे
फर्मान आलं तसंच हळूच हवेत विरून गेलं
इथे ह्याचं दुकान आम्ही नोंदणीकृत केलं
डोक्यावरची टांगती तलवार कायमची गेली
दुकानावर बाळ्याची नेम प्लेट लागली
असा आमच्या बाळ्याचा बाळू शेट झाला
पण सुंभ जळला तरीसुद्धा पीळ नाही गेला
आजही ह्याच्या अंगामध्ये तीच मस्ती-माज
साडेचारचे पाच घायला वाटत नाही लाज
....रसप....
७ जानेवारी २०१०
५. थिटे साहेब
थिटे म्हणजे सांड
तोंडामध्ये पान
शिव्यांचं दुकान
कोल्हापुरी वहाण
थिटे म्हणजे लोखंड
मांडीएव्हढे दंड
डोक्याने थंड
कसलाच नसे गंड
थिटे म्हणजे आदर
हसता-खेळता वावर
अस्सल बेरकी नजर
दोस्त बुलाएँ उधर
थिटे म्हणजे सिगरेट फ्री
वय वर्षं थर्टी थ्री
पेग भरायचा इतिश्री
आमच्यासाठी भ्राताश्री
थिटे म्हणजे नारळ
थिटे म्हणजे कलिंगड
थिटे म्हणजे ओल्ड वाईन
थिटे म्हणजे अननस
....रसप....
७ जानेवारी २०१०
६. पाचोळा
.
पाचोळ्यामध्ये लपलेली सिगरेटची थोटकं
मी ब-याचदा मोजतो
कधी संपत नाहीत मोजून
पण तुझी वाट पाहणं जरा सुकर होतं
ह्या पिंपळाने जेव्ह्ढी पानं झाडली नसतील
तेव्हढे दिवस मी वाट पाहतोय
असं वाटतं बरेचदा
बसल्या जागी पिंपळासारखाच पिकून जाईन
असंच वाटतं बरेचदा
आजही आठवतोय तो शनिवार
नाकर्त्याचा वार.... शनिवार
रोखठोक बोलायचं ठरवून होतो
होईल ते भोगायला तयार होतो....
एक तो दिवस आहे
अन् एक आज
पाचोळा बघत बसलोय
उचल कोणतंही पान
त्यावर तुझंच नाव लिहिलंय
मला प्रश्न एकच..
हवा येते आणि पाचोळा मागे उडून जातो
पण कधीच हवा उलटी वाहात नाही??
....रसप....
८ फेब्रुवारी २०१०
७. पिंपळ
.
गावाकडचा पिंपळ तर मी कधी पाहिला नाही
(पिंपळ सोडाच.. मी गावातच कधी राहिलो नाही)
बस स्टॉप वरच्या पिंपळाने
सारं काही पाहिलंय
इथे बस स्टॉप बनत असतानाही
पिंपळाने पाहिलंय
खाडी बुजवून इमारतींना
उभारताना पाहिलंय
उरल्या जागेत झोपड्यांना
वाढताना पाहिलंय
दरवर्षीचा धो-धो पाऊस पिंपळाने झेललाय
हिवाळ्यात पानं झाडून पिंपळ कोरडा हसलाय
फांद्यांना छाटताना मूकपणे रडलाय
घावावर घाव सोसूनही पिंपळ उभा राहिलाय
पिंपळाने पाहिलंय आम्हाला टाइम पास करताना
पिंपळाने पाहिलंय आम्हाला खो-खो हसताना
पिंपळाने पाहिलंय आम्हाला आपसात भांडताना
पिंपळाने पाहिलंय आम्हाला पैच अप्स करताना
सगळ्यांमध्ये असतानाही मी एकटा जेव्हा असतो
सळसळ करून पानांची पिंपळ सोबत असतो
....रसप....
९ फेब्रुवारी २०१०
८. पाऊलखुणा.
आज जरा बसस्टॉपसुद्धा जास्तच सुना होता
एकेकाळचा कंपू माझा माझ्याविना होता
सारे येतात, हसून पाहतात, हात मिळवून जातात
आजचा चेहरा नवा आणि कालचा जुना होता
अर्थ आहे ओळखीला, दोस्तीला स्वार्थ आहे
निरपेक्षता हा शब्द येथे ठाव कुणा होता?
सान होते थोर झाले, येऊनी शिरजोरही
सांडलेल्या आठवांना दाम उणा होता
वारा गेला मागे ठेवून काही पाऊलखुणा
बसस्टॉपवरती पाचोळ्याचा सडा जुना होता
....रसप....
२३ मार्च २०१०
९. तो
रविवारचा यायचा तो
बसस्टॉपवरती असाच
आमच्यामध्ये बसायचा
तासन् तास उगाच
mechanical engineering चं
स्वप्न त्याचं होतं
घरच्यांनीही त्यासाठी
जुंपलं त्याला होतं
डोळ्यांमधली चमक त्याच्या
गूढ़ होती खास
तल्लख बुद्धी, मनामध्ये
जिज्ञासा अन् ध्यास
IIT ला जाणार म्हणून
भलताच खुश होता
आता ऑर्कुट-sms नेच
touch मध्ये होता
हळूहळू करत त्याचे
sms बंद झाले
कधी-कधी यायचे ते
scraps येईना झाले
हाल-हवाल साठी मी
फोन केला त्याला
दबलेल्या आवाजाचा
हुंदका ऐकू आला
"मी त्याचा मामा बोलतोय
माझा भाचा गेला...."
मला काही सुचेनाच
.... पुढे बोलायला
तडकाफडकी आम्ही सारे
त्याच्या घरी गेलो
खरे काय ते कळल्यावरती
हबकून भांबावलो
अर्ध्यावरती सोडून सारं
तो निघून गेला
एक चिट्ठी सोडून मागे
"I QUIT" बोलला
.
.
.
.
.
.
बरेच दिवस झाले
सारं उदास-उदास वाटतं
बस स्टॉप असतो गजबजलेला
मन भकास असतं.....
….रसप….
२० डिसेंबर २०१०
१०. आकाश सर
केसांचा भांग
कपड्यांची इस्त्री
बुटान्ची लकाकी
कधीच बिघडत नाही
कोरलेली मिशी
रुबाबदार चाल
शुभ्र हातरुमाल
कधीच बदलत नाही
मोजकंच बोलणं
गालातच हसणं
वेळेवर निघणं
कधीच चुकात नाही
उपदेशाचा डोस नाही
कोणावरती रोष नाही
कशाचाही सोस नाही
नशिबाला दोष नाही
आकाश सरांचा साज काही वेगळाच असतो
बस स्टॉप वरती तसा कुणीच दुसरा नसतो
कधीच नसतात कुणाच्या
अध्यात आणि मध्यात
आपण आणि आपलं काम
बाकी सारं खड्ड्यात..!
....रसप....
२५ डिसेंबर २०१०
११. ..हम ना करेंगे प्यार..
ब-याच दिवसांनी मी बस स्टॉप वर गेलो
इतक्या दिवसात पहिल्यांदाच बसने गेलो
पिंपळ सळसळला
बाळ्या कुजबुजला
आणि चक्क..
सख्याचा चहा वाफाळला!!
रविवारचा दिवस होता
दुपारचा प्रहर होता
नुकताच कुणीतरी
पाचोळा झाडला होता
सोललेल्या नारळासारखा
बस स्टॉप दिसत होता
काही तरी समजल्यासारखा
पिंपळ हसत होता
बहुधा किशोरदाचा
स्मृतीदिन होता
"यह दर्दभरा अफ़साना.."
रेडियो वाजवत होता
एकानंतर दुसरं गाणं
ऐकत बसलो होतो
ब-याच दिवसांनी 'मेलोडी'त
पुन्हा रमलो होतो
पिंपळाचं हसणं अजूनच वाढलं
अचानक छातीमध्ये काही तरी हललं…
दुपारच्या उन्हात
वेगळीच लकाकी आली
नुकत्याच आलेल्या बसमधून
"ती" उतरती झाली
बसमधून उतरून
माझ्या बाजूनेच गेली
माझी मात्र पुरती
हवा 'टाईट' झाली
मला पाहिलं की नाही
काही कळलं नाही
सिगरेट कशी विझली
समजलंही नाही
जाग आली तेव्हा
रेडियो चालूच होता
"..हम ना करेंगे प्यार.."
किशोर सांगत होता…
....रसप....
२७ डिसेंबर २०१०
१२. पिंटू टल्ली
पिंपळाच्या मागल्या बाजूस
एक बाईक असते
बाईक वरती पिंटूची
बैठक जमली असते
कैंटीनवाल्या शिंदेचा
हा जुना जोडीदार
दोनच गोष्टी ठाऊक ह्याला
बाटली आणि बार
दिवस असो रात्र असो
कधीच शुद्धीत नसतो
चार-चार दिवस मुक्काम
बाईकवरतीच असतो
हातामधून बाटली
कधीच सुटत नाही
म्हणे पूर्वी बरा होता
इतकी प्यायचा नाही
advertising agency चा
चांगला बिझीनेस होता
भागीदारीत धंद्याचा
जम बसला होता
भागीदार दोस्ताने
विश्वासघात केला
पिंटू शेट्टी तेव्हापासून
पिंटू टल्ली झाला
नंतरच्या दहा वर्षात
सारं काही गेलं
नावापुढे बदनामीचं
बिरुद तेव्हढं राहिलं
शत्रू नाही मित्र नाहीत
नाती-गोती नाहीत
ब्रह्मानंदी टाळी लावून
पिंटू नेहमी टाईट
....रसप....
२८ डिसेंबर २०१०
१३. कॉलनी....बदललेली
.
पूर्वीची कॉलनी बरीच वेगळी होती
सर्वात उंच बिल्डिंग चार मजली होती
एका बाजूस हायवे धो-धो वाहत असे
दुस-या बाजूस झोपड्यांचा बजबजाट असे
कॉलनीतल्या श्रीमंताकडे ओम्नी कार असायची
मध्यमवर्गीय माणसाकडे हिरो होंडा दिसायची
रुपयात तासभर सायकल भाड्याने मिळायची
शाळेची पोरं शाळेत पायी चालत जायची
"अमृत" वाण्याच्या दुकानात रेलचेल असायची
रेशनच्या केरोसीनसाठी लाईनसुद्धा लागायची
"कलामंदिर" नामक एक डब्बा थिएटर होतं
आणि दारू प्यायला एकच "उजाला" बार होतं
.
पण हळूहळू करत खूप बदल झाले
झोपड्यांच्या जागी टावर उभे राहिले
कॉलनीचा ’पुनर्विकास’ टोलेजंग झाला
कळत नाही कसा काय पैसा स्वस्त झाला
होंडा आणि टोयोटाचा सुळसुळाट झाला
सायकल चालवणारासुद्धा कार फिरवू लागला
थिएटरच्या जागी शॉपिंग कॉम्प्लेक्स झाला
वाणी आणि रेशनला ग्राहक नाही राहिला
कॉलनीतली पोरं आता कॉन्व्हेंटमध्ये जातात
त्यांच्यासाठी पिवळ्या बसेस ये-जा करतात
"उजाला"चा उजेड आता गल्लोगल्ली पडलाय
नाक्या-नाक्यावरती एक ए.सी. बार झालाय
.
ह्या सगळ्या धबडग्यात बस स्टॉप तसाच राहिला
पण टोलेजंग विकासाने पिंपळ बुटका झाला....
....रसप....
११ जानेवारी २०१०
१४. कुठे आहे हा बस स्टॉप..??.
प्रत्येकाच्या मनात एक बस स्टॉप असतो
कमी अधिक 'फ्रिक्वंसी'ने वापरात असतो
इथे अनेक बसेस येतात
कधी त्याच त्या
तर कधी नवीन येतात
कधी एकाच बससाठी
शेकड्यांची गर्दी असते
बिचारी एखादी बस मात्र
रिकामीच निघून जाते
कुणी बस चुकल्यामुळे
हळहळत असतो
वाट न बघता कुणी एखादा,
'कुठली'ही पकडून निघतो
कुणी असतो एकटाच
लटकतसुद्धा जातो
कुणाबरोबर बायका-पोरं
दोन-तीन बसेस सोडतो..!
जेव्हा जी नको असते
तीच नेमकी येते
हवी असलेली उशीराने
गच्च भरून येते..!
.
.
.
.
वाट बघत रेंगाळण्यात काही अर्थ नसतो
प्रत्येकाचं आयुष्य असाच बस स्टॉप असतो
....रसप....
२४ जानेवारी २०११
१५. असा मी बस स्टॉप
.
“वराहाने उचललेली पृथ्वी, ही भाकडकथा
पण बसस्टॉपने पेललेला भार, ही सत्यकथा
ये कधी मध्यरात्री माझ्या भेटीला
आणि पाहा माझा पसारा
गजबजलेल्या वेळेस जाणवत नाही ना
केव्हढा आहे डोलारा?
एका वेळी पन्नास टनाच्या पंधरा बस अंगावर असतात
ते कमी म्हणून की काय,
मधूनच ब्रेक दाबून चाबुकही ओढतात
सगळे वळ रात्री स्पष्ट दिसतात
मीच मला फुंकर घालतो जेव्हा
दिवसा फुंकर घालू शकत नाही ना
काळा धूर असतो तेव्हा
कधी पिचका-यांनी रंगतो, कधी मुता-यांनी भिजतो
कधी गर्दीत गुदमरतो, कधी कच-यानेही सजतो
माझ्या जखमांचे खड्डे दिसतात पण मी कुणाला दिसतो?
आता वय झालंय माझंही पण आराम कधी मिळतो?
जुन्या जखमा चिघळतात, चिघळल्यावर बुजवतात
पण अजून जखमा होतात अन् पुन्हा पुन्हा चिघळतात
मी आणि पिंपळ, एकत्रच आलो जन्माला
मी राहिलो तळाला तो भिडला गगनाला
पण दोस्त आहे माझा सावली देतो थोडी,
पाचोळ्याच्या शालीमध्ये ऊबदार गोडी
उंचावरून पाहून मला सारं सांगत असतो,
त्याच्या नजरेनंच मी जग पाहात असतो
.
.
.
.
पूर्वी चटका लागायचा जेव्हा सिगरेट चुरायचास..
मग कळलं तू माझ्यावर कविता पण करायचास..!!
असा मी बस स्टॉप, ज्याला तू लिहितोयस..
असा मी बस स्टॉप, ज्याला तू समजतोयस..
….रसप….
१० फेब्रुवारी २०११
१६. बसस्टॉप आणि कट्टा
जन्मानंतर माझा
दोनदा जन्म झाला
आधी कॉलेज कट्टा आणि
नंतर बसस्टॉप आला
तसं माझं कॉलेजही
बसस्टॉप जवळच होतं
पण बसस्टॉपचं जग तेव्हा
मला पारखं होतं
कट्ट्याने मला
घडवलं - बिघडवलं
त्या वयाच्या कुवतीला
मला तेव्हढंच पुरवलं
मग मी मोठा झालो
माझा अड्डा बदलला
कॉलेज तिथेच होतं
माझा कट्टा बदलला
“Out of Syllabus”
कट्ट्याने शिकवलं
“Syllabus of Life”
बसस्टॉपने पढवलं
कट्ट्यावरती शिकलो
माणसांना वाचायला
बसस्टॉपवरती शिकलो
वाचलेल्यांना चाळायला
तुमची-माझी कथा
एकसारखीच आहे
बसस्टॉपच्या ऐवजी
नाका-टपरी आहे
कट्ट्याने दिलेलं
सारं मी गमावलं
बसस्टॉपचं देणं मात्र
चुकवायचंच राहिलं….
....रसप....
१२ मार्च २०११
१७. मनमौजी
बस स्टॉप म्हणजे समुद्रच
इथे हर त-हेचा मासा
कुणी आहे चिकना-चुपडा
तर कुणी लेचा-पेचा
इथे आहेत पांढरपेशे
इथे आहेत पेताड
कुणी आहे 'वेल सेटल्ड'
तर कुणी आहे बेकार..
कुणी बुढा.. लटपटणारा
कुणी तरणाबांड
कुणी आहे हाडाडलेला
कुणी माजला सांड
इथे असतात 'फक्कड' पोरी
लिपस्टिक खाऊन येतात
मैत्रिणीशी बोलता-बोलता
आय लायनर लावतात..!!
आज कुणाला थोडासा
उशीर झाला असतो..
कुणी उशीर होऊनसुद्धा
आरामातच असतो..!
आमच्यासारखे मनमौजी
आम्हीच असतो इथे
बसण्यासाठी येतो फक्त
जायचं नसतंच कुठे!
कुणी आम्हाला "टपोरी" म्हणतं
कुणी म्हणतं "गुंड"
कुणी म्हणे, "आजकालची
पिढीच असली षंढ!!"
पण आमच्याही मनामध्ये
काहीतरी रुतलंय
आयुष्यावर हसता-हसता
डोळ्यात काही खुपलंय
कुणी शोधतोय नोकरी
कुणी झालाय देवदास
कुणी जरा मागे पडलाय
कुणी झालाय नापास
चिंता करून झुरण्यापेक्षा
'झुरके' मारतो आम्ही
जगण्यासाठी मरण्याआधी
हसून घेतो आम्ही
.
.
.
.
.
.
पण तरी, उंदरांच्या शर्यतीत
धावायचंच आहे
एव्हढी सिगरेट संपल्यावर
निघायचंच आहे..!!
....रसप....
१९ मे २०११
१८. बस स्टॉप "सुटल्यापासून"
चिंब भिजलेला बस स्टॉप
वेगळाच दिसत होता
काळवंडलेला पिंपळसुद्धा
वेगळाच दिसत होता
तोच पांचट चहा आज
हवाहवासा वाटला
कॉँक्रिटचा ओला वास
हवाहवासा वाटला
बस स्टॉप वर कुणीच नव्हतं,
मी तेव्हढा सोडून
काहीच कोरडं राहिलं नव्हतं,
मी तेव्हढा सोडून
ओल्या पावसासोबत आल्या
जुन्या आठवांच्या सरी
वाऱ्यासोबत बोचू लागल्या
जुन्या आठवांच्या सरी
काळाबरोबर माणसं तुटतात
पण - Life Goes on…
ओलं-सुकं नशीब असतं
पण - Life Goes on…
उगाच काही विचारांनी मनात गर्दी केली
चहा-सिगारेट झाल्यावर मी माझी वाट धरली
फारच विचित्र वाटतंय मला,
बस स्टॉप "सुटल्यापासून"
हरवून बसलोय स्वत:लाच
बस स्टॉप "सुटल्यापासून"
….रसप….
२३ जुलै ११
१९. "शायर उधारी"
"यह बाईस-ऐ-नौमीदी-ऐ-अरबाब-ऐ-हवस हैं
ग़ालिब को बुरा कहतें हो अच्छा नहीं करतें"
अर्थ विचारण्याची हिंमत
आमच्यात नसते
बस स्टॉप वरती "वाह वाह"
त्याला नेहमीच मिळते
काळी जीन्स आणि
चौकटीचा शर्टं
पायात फ्लोटर्स
डोक्यावर घरटं
आजपर्यंत "उधारी"ला
असाच बघत आलोय
"बाउन्सर" शायरीला
गुमान ऐकत आलोय
फटीचर बुडाचा
नेहमीच 'कडकी"त असतो
आमचीच सिगरेट घेऊन
आम्हालाच चावत असतो
त्यालाही कळतं -
आम्ही त्याची खेचतो
"वाह.. तेरी माँ की!"
म्हटल्यावर तोसुद्धा हसतो!
"शायर उधारी"
जन्मजात भिकारी
बाप गिरणी कामगार
पोसलेली बेकारी!
एका खोलीच्या घरात
नऊ जण राहतात
काळ्याकुट्ट वर्तमानात
स्वप्नांना शोधतात
ऐंशीच्या पुढचे आजी-आजोबा
कंबरेतून वाकतात
कमनशिबी लोकच कसे
दीर्घायुषी असतात?
परिस्थितीबद्दल आम्हाला
सहानुभूती आहे
पण त्याच्या शायरीवर
स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे!!
....रसप....
४ ऑगस्ट २०११
२०. बस स्टॉप कालचा
डोळ्यांसमोर आहे बस स्टॉप कालचा
सलतो मनात माझ्या बस स्टॉप कालचा
माझे मला कळेना आली कशी उदासी
सुनसान वाटला तो बस स्टॉप कालचा
येथेच हासलो मी, येथेच प्रेम केले
वाटे तरी दुजा का बस स्टॉप कालचा
गर्दीच चेहऱ्यांची कोणी न ओळखीचे
होता अनोळखीसा बस स्टॉप कालचा
पाहून पिंपळाला काळोख ल्यायलेला
झोपून गाढ गेला बस स्टॉप कालचा
....रसप....
८ ऑगस्ट २०११