Wednesday, February 24, 2010

सहनशक्ती दे..

 

विकोपास गेलेल्या दुखण्याची
इतकी वेदना व्हावी
दुखून दुखून तिला स्वत:लाच
कळ लागावी
तळपत्या सुर्याने
इतकी आग ओकावी
पोळणारी झळ त्याला
स्वत:लाच लागावी
अशी पराकोटीची सहनशक्ती
जेव्हा तू देशील
छोट्या हळूवार फुंकरीलाही
अनमोल बनवशील

इथे तुझ्यासमोर
सगळे लाचार होऊन बसतात
दु:खावर औषध म्हणून
सुखाची भीक मागतात
शिकव त्यांना..
दु:ख पचवण्याची ताकद असणं,
हेच सुख
सुख वाटण्याची दानत असणं ,
हेच सुख

तुझं काम फक्त निर्मितीचं आहे?
मग जडणघडण कुणाच्या अखत्यारीत आहे?
की तुलाही एक न्यूनगंड आहे?
महत्त्व कमी होइलशी भीती आहे?
नाही?
मग बाहेर ये त्या दगडातून
दे एक कवडसा निबिड काळोखातून
आणि खंगत चाललेल्या
जीर्ण माणुसकीच्या
शीर्ण मनाला
उभारी दे
आधार दे
पुनरुज्जीवन दे
शक्ती दे
सहनशक्ती दे.. सहनशक्ती दे


….रसप….

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...