Thursday, December 30, 2010

बात निकलेगी तो फिर..........

प्रेरणा: "बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी" (कफील आजेर)


कोणी काही विचारलं तर माझं नाव घेऊ नकोस
मनामध्येच ठेव सारं, ओठांवरती आणू नकोस

खोडच असते लोकांना उगाच नाक खुपसायची
गप्प राहण्याचं कारणसुद्धा कुणालाही सांगू नकोस

तुझ्या रेशमी केसांत माझे श्वास असतील रेंगाळत
मोकळं कर त्यांना पण केस मोकळे सोडू नकोस

प्रश्न करतील काही-बाही हातांकडे पाहून तुझ्या
वाढलेल्या बांगड्यांचा तू हिशोब कधी देऊ नकोस

भोचक-खडूस टोमणे तुला काट्यांसारखे खुपतील
पिउन घे आसवांना डोळ्यांमध्ये साठवू नकोस

उलट-सुलट प्रश्नांना तर पेवच फुटेल बघ आता
प्रतिप्रश्न करून तिथे विषयाला वाढवू नकोस

खरी गोष्ट बाहेर आली तर काहूर माजेल चोहिकडे
मनामध्येच ठेव सारं, ओठांवरती आणू नकोस



....रसप....
३० डिसेंबर २०१०

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...