Monday, February 07, 2011

माझी भरभराट..... तिचा जळफळाट..!!

हातावरच्या रेषा कुणी
कधी आखून देत नाही
माझी भरभराट झाली
ह्यात तुझा दोष नाही

आजकाल म्हणे सगळ्यांशी
फारच विचित्र वागतेस
पाल्हाळ लावून बोलतेस
किंवा शब्दच निघत नाही

किरकोळ कारणांवरून तुझं
वाद उकरून काढणं
एकदा तरी भांडल्यशिवाय
दिवस सरत नाही

मला तोंडघशी पाडलंस
तेव्हा खुशीत होतीस तू
माझं वागणं बिथरताना
काहीच वाटलं नाही?

तारवटलेल्या डोळ्यांची ती
शून्यामधली नजर
तुझं जाळणं, माझं जळणं..
आता आठवत नाही?

दु:खाशी पण दोस्ती होते
जखमा येतात भरून
तुझे घाव पचवले ह्यात
शॉकींग काहीच नाही!

"बदलत जातो तो काळ"
असं ऐकलं होतं कधी
तुझ्याजागी दुसरी आली,
ह्यात गैर काहीच नाही..

....माझी भरभराट झाली
ह्यात तुझा दोष नाही....



....रसप....
०३ फेब्रुवारी २०११
Related Posts Plugin for WordPress, Blogger...