Sunday, February 13, 2011

"म.क." पुराण (१२ कविता)

ऑर्कुट वरील "मराठी कविता" समुहावर, समुहाबद्दल लिहिलेले काही:

'काव्य'शाला

कवीमित्र आणि
सर्व वाचकांनी
"म.क." समूहाशी
बंध जोडा

इथे भेटतील
किती शब्दवीर
काव्यज्ञानक्षीर
वाही रोज

अशी पर्वणी ही
कुठे अन्य नाही
दिशा लीन दाही
काव्यानंदी

इथे महंतांनी
थोर पंडितांनी
काव्यतुषारांनी
तोषविले

मुक्तछंद आहे
वृत्तबद्ध आहे
ग़ज़ल-गान आहे
सर्व काही

शिकायचे ज्याला
काव्यलेखनाला
अशी 'काव्य'शाला
एकमेव

रण्या म्हणे आता
मराठीस माता
ठेवियला माथा
पायी त्याच


....रसप....
१२ फेब्रुवारी २०११


शब्दराज्य
.
काव्यदेवतेस
दावला प्रसाद
इथे तेवतात
मैत्रदीप

इथे येत जावे
शब्दरूप व्हावे
सुखेची रहावे
खेळीमेळी

अभिप्राय द्यावे
कधी बोध घ्यावे
अहंभाव द्यावे
सोडुनिया

कुणी थोर नाही
कुणी क्षुद्र नाही
इथे लोकशाही
शब्दराज्य

कुणाला कळावे
कुणा ना कळावे
तरी ना रुसावे
रण्या म्हणे

....रसप....
१२ फेब्रुवारी २०११


वाहिला जन्म
.
इथे महाराज
इथे स्वामीजीही
शब्दश: सारे
नांदतात

एक आहे ‘नाम’
तुषारास जाण
शुद्ध सारंगास
ऐक येथे

आकाश अनंत
कुणी ‘कल्पी’लेले
कृपे विनायका
लाभिले गा

फुलावे नीरज
कवनवनात
सत्स्वरूपी राम
प्रकटला

पुनश्च हरीही
शब्दरूप घेई
"म.क." माऊली ही
धन्य थोर

स्वप्नाजा "मराठी
कविता" समूह
जाहला प्रसिद्ध
"ब्रम्ह"रूप

रण्या म्हणे मीही
मार्गस्थ उषेचा
"म.क." ला वाहिला
अवघा जन्म

....रसप....
१२ फेब्रुवारी २०११


प्रवास अनोखा
.
अभंग तुक्याचा
भाव ज्ञानेशाचा
संतसाहित्याचा
इतिहास

शब्द माधवाचे
विष्णु वामनाचे
आणि कितीकांचे
आशीर्वच

लेखणीस बळ
ह्रुदयात जाळ
आतड्यास पीळ
अम्हां ठायी

पाऊल मराठी
दौड घेण्यासाठी
बांधी खूणगाठी
सिद्ध जाले

सवे एकमेकां
घेऊ आणाभाका
प्रवास अनोखा
आरंभिला

रण्या म्हणे आहे
भविष्य उज्जवल
अता साहित्याचे
हमखास

….रसप….
१३ फेब्रुवारी २०११


मयूरपिसारा
.
कुणा वाटे लाख
"म.क." प्राथमिक
पूर्णपणे चूक
समज हा

लिहिती सुरेख
एक ना अनेक
नियमित नेक
कवीजन

अम्हां नसे गंड
नाहीच घमेंड
चालतो अखंड
काव्ययज्ञ

दिसे ज्यां पसारा
मयूरपिसारा
दृष्टिदोष सारा
त्याचा असे

जिथे पीक आले
शिवारही डोले
कुइकुई कोल्हे
येतातच

रण्या म्हणे ऐका
वाजविला डंका
निर्धार खमका
आम्ही केला.......


….रसप….
१३ फेब्रुवारी २०११


मूर्तिमंत साचा
.
कविता निनावी
"म.क.” ला नसावी
कुणीही लिहावी
डिलीट हो

इथे नसे थारा
कुणा चोरा-पोरा
फालतूचा सारा
नसे केर

स्वच्छ समूहाचा
मूर्तिमंत साचा
“म.क.” वरी वाचा
मूळ प्रत

अनावश्य वाद
कुणाचा प्रमाद
जाहिरातबाज
सह्य नाही

रण्या म्हणे येथ
लिहा स्पष्ट-थेट
तरीही भाषेस
गोड ठेवा

....रसप....
१३ फेब्रुवारी २०११


जाणिले म्या
.
मनाचा तरंग
बने तो अभंग
करी मुग्ध दंग
आळविता

अलामत कळावी
रदीफे लिहावी
ग़ज़ल पूर्ण व्हावी
वृत्तबद्ध

कवितेस नाही
जरी बंध काही
चित्र चौकटीही
शोभते ना?

लिही मुक्तछंद
ओळखून अंग
विषया सुसंग
जेथ वाटे

यमकात येणे
नसे काव्य होणे
जरा ‘नाद’ देणे
अत्यावश्य

रण्या नसे ज्ञानी
कुणी थोर-मानी
“म.क.” ला येऊनी
जाणिले म्या


….रसप….
१४ फेब्रुवारी २०११


रण्यामुखी नाम

.
गंध रातराणी
निर्झराचे पाणी
कोकिळाची गाणी
“म.क.” “म.क.”

घास आवडीचा
भास प्रेयसीचा
ध्यास अंतरीचा
“म.क.” “म.क.”

पाय विठ्ठलाचे
दान शारदेचे
बोल सावळ्याचे
“म.क.” “म.क.”

माऊली मराठी
तुझ्या सेवेसाठी
उदधरणासाठी
“म.क.” “म.क.”

दिवस-रात हेच
रण्यामुखी नाम
असे एक धाम
“म.क.” “म.क.”


....रसप....
१४ फेब्रुवारी २०११


सुवर्णेतिहास..
.
कुणी ना इथे भोगण्या ‘अर्थ’ आला
“म.क.” संघ 'नेटी' अवाढव्य झाला
कृपा लाभली शारदेची आम्हाला
इथे चालली थोर साहित्य-शाला

जया गर्व झाला, “मला सर्व येते”
तया दाखवा खास साहित्य येथे
पुरे विश्व आले लिहीण्यास जेथे
नसे कोण ज्ञानी कुणी श्रेष्ठ तेथे

भविष्यास आता लिहीतोय आम्ही
सुवर्णेतिहासा घडवणार आम्ही
नभी फडकवू ह्या तिरंग्यास आम्ही
मराठीस नोबेल देणार आम्ही

रण्याला इथे लाभले मार्गदर्शी
इथे जोडली बंधने भावस्पर्शी
लिहू लागलो मुक्तके ऐसी-तैसी
असा वाहिला जन्म शब्दार्जनासी

....रसप....
१५ फेब्रुवारी २०११


अभिप्रायदान
.
इथे टाकली जी
एक कविताही
वाचलीच जाई
शब्द-शब्द

कुणीही लिहावे
कुणीही पहावे
अभिप्राय यावे
अर्थपूर्ण

नसे कोरडासा
नुसताच वाह वाह
दृष्टांत मिळावा
शोभे जेथ

असा एकटाच
संघ हाच खास
जिथे दावतात
मर्म-दोष

बामणास भीक्षा
पूर्ण हो अपेक्षा
कविता समीक्षा
येथ होई

रण्या म्हणे माना
अभिप्रायदाना
कडू वाटताना
मौल्यवान

....रसप....
१६ फेब्रुवारी २०११


सोहळा
.
ऋतू-रस-रंग
नव-रस-रंग
कवितांचे कुंभ
ओसंडले

थोर महंतांनी
नावाजलेल्यांनी
कविता वाचोनी
तोलीयल्या

जरी ओळ एक
कविता अनेक
लिहिल्या कितीक
शीघ्रतेने

प्रसंगानुरूप
लेखनास ऊत
जणू चित्ररूप
रेखाटले

नसे खेळ सारा
असे सोहळा हा
नवा जन्म झाला
काव्याचा हो

रण्या म्हणे माझी
लागू दे समाधी
मायबोलीसाठी
कामी येवो

....रसप....
१६ फेब्रुवारी २०११


"म.क." पुराण समाप्त
.
माघ शुद्ध पक्षी
चतुर्दशी दिवशी
“म.क.” चे पुराण
पूर्ण होय

स्विकार करावा
लोभही असावा
तसाच रहावा
पोरावरी

शब्द ना पुरेसे
गुंफले मी ऐसे
कविते प्रयासे
यथाशक्ती

कृपा अभिलाषी
तुझ्या चरणाशी
बैसलो अधाशी
माझे माय

कळी फूल व्हावी
विठ्ठला वहावी
प्रतिभा जगावी
तैसी येथे

संथ प्रवाहाला
पुन्हा वेग द्यावा
लेखनास यावा
तैसा अर्थ

अंबरी विहंग
विहरतो अखंड
उंच हा पतंग
तैसा जावा

भेद ना असावा
गर्व ना चढावा
द्वेष ना करावा
कोणाचाही

करितो प्रणाम
स्मृतीस तयांच्या
गुणी थोरल्यांच्या
मनोभावे

रण्याला नको ती
कोणती प्रसिद्धी
माजवे जी बुद्धी
अनाठायी


....रसप....
१७ फेब्रुवारी २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...