बदलापूरची माझी शाळा प्रचंड मोठी... नावाजलेली.. आम्ही थोडे गावाबाहेर राहात होतो. त्यामुळे तशी दूरच होती, परंतु एक "short-cut" होता. डोंगरातून.. मी, ताई आणि अजून १-२ मुलं त्याच रस्त्याने जात असू. शाळेत जाणं-येणं मला शाळेपेक्षा जास्त आवडायचं.
ह्या शाळेतली एक आठवण मी कधीच विसरणार नाही..
दुपारची वेळ होती, मधल्या सुट्टीनंतरची..खामकर सर. गणिताचा तास. आदल्या दिवशी मी गैरहजर होतो व त्याच दिवशी इंग्रजीचे पेपर मिळाले होते.
बाई आल्या आणि त्यांनी सरांना काल गैरहजर असलेल्या साऱ्यांना एकेक करून वर्गाबाहेर पाठवायला सांगितले.. पेपर देण्यासाठी. परेड सुरु झाली. ७-८ मुलं होती एकूण.
पेपर घेऊन परत वर्गात आलेल्या प्रत्येकाला खामकर सर "किती..?" विचारत.
माझी धडधड माझा नंबर जसजसा जवळ येऊ लागला तसतशी वाढतच होती. अखेरीस माझाही नंबर आला. गेलो. बाईंकडून पेपर घेऊन मी आधी चमकलेले तारे विझवले आणि वर्गात शिरलो.
सर फळ्यावर काहीतरी खरडत होते. अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसत होता, तसा मला फक्त माझा बाक दिसत होता. मी जवळजवळ धावतच जागेवर जायला सुटलो. पण इतक्यात सर वळलेच अन् मला हाक मारली, "पराडकर.. किती..??"
मला काहीच सुचेना. मी ढीम्म. सर जवळ आले.. धडधड अजून वाढली..
"किती मिळाले?"
"सर, कमी आहेत."
"सर कमी नाहीत, एकच आहेत.. मार्क किती मिळाले.."
सगळा वर्ग हसला..
"सर.... कमी आहेत..."
"अरे, पण किती..??"
मी हळूच चोरून 'ती'ला पाहिलं.. ती सुद्धा हसत होती.. मला शरमेने मेल्यासारखं झालं....
"सर, कमी आहेत.." माझा आवाज अचानक कमी झाला आणि सरांचा मात्र वाढला.
"आता सांगतोस.. की देऊ एक...??"
त्यांनी हातात पट्टी घेतली होती. काय करावं कळेना.. साऱ्या वर्गासमोर मार्क सांगितले तर काही इज्जतच राहणार नाही. त्यात 'ती' किती हुशार होती ! 'ती' तर माझी 'छी: थू'च करेल आणि नाही सांगितलं तर पट्टी..!
"सांग लौकर..!!"
मी नकारार्थी मान हलवली..
"हात पुढे.."
मी केला..
सट्ट.. कळवळलो..
"जो पर्यंत सांगणार नाहीस, पट्टी खावी लागेल..
मनात म्हटलं,"ह्यांना काय करायच्यात चांभार चौकश्या..उगाच त्रास देतायत मला.."
अजून चार-पाच पट्ट्या खाल्ल्यावर मात्र मी रडू लागलो.. शेवटी क्षीण आवाजात माझे एक आकडी (अव)गुण सागितले.. कुणाही कडे न बघता तडक बाक गाठला आणि आडव्या हाताच्या घडीत तोंड खुपसलं..(त्या वयात येत असणा-या सा-या शिव्या देऊन झाल्या.. हे सांगायलाच नको..)
त्या दिवशी पासून 'ती'च्या नजरेला नजर देण्याची उरली-सुरली हिंमतसुद्धा विरली-जिरली.
आज खामकर सर भेटले तर त्यांना माझी इंग्रजी जरूर ऐकवीन, पण त्यांनी अजून कुठल्या विषयाबद्दल विचारलं, तर मात्र पुन्हा पट्टी खावी लागेल..!!