Sunday, November 30, 2008

शपथ घे


आग शमली,
धुराचे लोटही विरले
आता पुन्हा गायले जातील
मुंबापुरीचे पोवाडे
स्तुतीसुमनं उधळणारे..
पण मला सांग,
ही सहिष्णुता की हतबलता?
ही शांतता की उदासीनता?
ही सहनशक्ती की कचखाऊ वृत्ती?
ही चिकाटी की लाचारी?

आग स्फोटांची विझली असेल
पण चितांची..??
ती नेहमीच धगधगत राहील.
चल, एक कोलीत उचल
अन् लाव चटका स्वत:ला
आत.... खोल.. स्वत:च्या मनाला..
हा चटका झोंबू दे
अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा चिघळू दे..भळभळू दे
इथून पुढे तुलाही लढायचंय, कारण..
देशांना सीमा असतील
पण युद्धांना राहिल्या नाहीयेत
शस्त्र घ्यायचं तेव्हा घ्यावंच लागेल..
अन् घेच.. पण आज..
आज शपथ घे..
त्या हुतात्म्यांची
त्या वीर बहद्दुरांची
डौलदार तिरंग्याची
अन् लाडक्या मुंबापुरीची
आठव ते माधव ज्युलियनांचे शब्द --
"लेखणी बंदूक घ्या वा तागडी वा नांगर
हिंदवी व्हा चाकर
एक रक्ताचेच आहो साक्ष देई आतडे..
भ्रांत तुम्हां का पडे?


....रसप....
३० नोव्हेंबर २००८

2 comments:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...