Wednesday, July 30, 2008

माणसं

खोक्यांसारखी माणसं
एकावर एक रचलेली
गंज चढलेले मेंदू
आणि अक्कल पुसलेली

मेंढरांसारखी माणसं
मागे-मागे चालणारी
कंटाळवाणी मंदगती
पडणाऱ्यावर पडणारी..

बगळयांसारखी माणसं
ध्यान लावून बसलेली
दिसतात स्थितप्रज्ञ
मोडता घालण्या टपलेली

गेंड़यांसारखी माणसं
निगरगट्ट बनलेली
सोयर ना सूतक काही
मस्तवाल फुललेली

माणसासारखी माणसं
नावापुरती उरलेली
चिमणीच्या जातीसारखी
दुर्मीळ होत चाललेली.....


....रसप...
१३ जुलै २००८

2 comments:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...