आपल्या लहान मुलाला घेऊन तुम्ही आणि तुमची बायको बाहेर फिरायला जाता.. समजा, बाजारात जाता.. (किंवा कुठेही, त्याने काही फरक पडत नाही म्हणा!) आणि तिथे एक फुगेवाला दिसतो. वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे सुंदर फुगे ! साहजिकच लहानगा/गी फुग्याचा हट्ट करतो/ते.. किंवा न करताही तुम्ही एक छानपैकी वेगवेगळ्या रंगांचा मोठा फुगा घेता. फुगा घेऊन घरी येता आणि खेळता खेळता 'फट्ट'दिशी फुगा फुटतो ! का फुटतो ? कळतच नाही ! तुमचं मूल, तुम्ही आणि तुमची बायको एकमेकांकडे बुचकळ्यात पडल्यागत पाहाता, क्षणभरच.. आणि मग भोकाड..............! फुगा फुटला कसा ? हा प्रश्न बाजूला राहातो आणि आता मुलाला/ मुलीला आवरू कसा ? हा प्रश्न पडतो..! रामबाण उपाय..... 'आपण उद्या अजून एक फुगा आणू या, ठीकेय ?' कसंबसं मूल शांत.
असंच काहीसं मी, माझी बायको आणि माझ्यातलाच 'मी' बाळ ह्यांचं झालं.. 'मटरू...' बघितल्यावर. फुगा रंगीत होता... मोठ्ठा होता... छान होता... पण तिच्या मारी.. फुटला ! आणि का फुटला, तेही कळलं नाही.. आता मीच मला समजावतोय, 'पुढच्या आठवड्यात अजून एक सिनेमा पाहू या, ठीकेय ?' कसाबसा 'मी' शांत !
तर हा फुगा असा आहे/ होता..
हरियाणातील एक शेतकरीबहुल गाव... 'मंडोला'. गावाचं नाव, गावातला पिढीजात अब्जाधीश/ खर्वाधीश 'हरी मंडोला' (पंकज कपूर) च्या आडनावावरून असतं. हा मंडोला म्हणजे एक नंबरचा पक्का 'पेताड' असतो. म्हणजे त्याला पिणं सुरू करणं माहित असतं, थांबणं माहित नसतं. शुद्धीत असताना मिस्टर मंडोला किंवा हरी (harry) असणारा हा पीवट प्यायल्यावर 'हरिया' बनत असतो. शुद्धीतला मंडोला पक्का बिझिनेसमन असतो. त्याला फायदा, पैसा, सत्ता, धंदा, ई. पुढे आणि शिवाय काही दिसत नसतं आणि टुन्न 'हरिया' कधी काय करेल ह्याचा नेम नसतो.. स्वत:च्याच विरोधात मोर्चा काढतो.. दारूचे दुकान लिमोझिन घुसवून फोडतो.. काहीही, अगदी काहीही ! गावातलाच एक तरुण 'मटरू' (इम्रान खान) मंडोलाकडे कामाला असतो. मटरु दिल्लीला शिकलेला असतो, शिक्षणासाठी त्याने मंडोलाकडूनच कर्ज घेतलं असतं पण शिक्षण झाल्यावर त्याचं शहरात मन रमत नाही म्हणून तो गावात परततो आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी मंडोलाकडे काम करायला लागतो. त्याचा ड्रायव्हर आणि केअर टेकर म्हणून. मंडोलाची बिनधास्त मुलगी बिजली (अनुष्का शर्मा) आणि मटरु लहानपणापासूनचे मित्र असतात. व्यावसायिक फायद्यासाठी बिजलीचं लग्न, स्थानिक राजकारणी चौधरी देवी (शबाना आझमी)चा बावळा मुलगा बादल (आर्य बब्बर) शी नक्की केलेलं असतं. गावातल्या शेतकऱ्यांच्या जमीनी हडप करून तिथे एक मोठा मोटार कारखाना करायचं मंडोलाचं स्वप्न, त्यात चौधरी देवीचं सशर्त सहकार्य, मटरुचा मंडोलावरील राग व त्याचं खरं 'माओ'वादी रूप, बिजली-बादलचं नकली प्रेम, अश्या सर्व प्रवासांतून ही कहाणी एका 'प्रेडिक्टेबल' सुखाच्या शेवटाला पोहोचते आणि सगळे कलाकार फेर धरून नाचतात.
चित्रपटाच्या काही भागांत पथनाट्याची झाक दिसते. एका गंभीर विषयाची जराशी वेगळी हाताळणी असल्याने सिनेमा बऱ्यापैकी आवडतो. पण मांडणी काही वेळा जराशी विस्कळीत वाटते.
गुलजारच्या शब्दांपेक्षा विशाल भारद्वाजचं संगीत खूपच उजवं आणि संवादही खुसखुशीत वाटतात.
पंकज कपूरने तोंडातल्या तोंडात हरयाणवीत पुटपुटलेले बरेच संवाद कळत नाहीत.
अनुष्का शर्मा पुन्हा एकदा छाप सोडते. तिचा पडद्यावरील वावर खूप सहज आहे.
इम्रान खान 'मटरु' दिसण्यासाठी त्याला भरगच्च दाढी असणं आवश्यक होतंच. पण त्या दाढीवरून जेव्हा अनुष्का शर्मा त्याला 'कीस' करते, तेव्हा तिची केवळ दया येते.. इंडस्ट्रीत स्थान बनवण्यासाठी काय काय करावं लागतं !
शबाना आझमी लौकिकास साजेसं काम करते आणि आर्य बब्बर बाप-लैकिकास.
'गुलाबो' ब्रांड ची दारू पिणाऱ्या मंडोलाला, दारू एकदम बंद केल्यानंतर दिसणारी गुलाबी म्हैस गंमतीदार आहे.
- पण फुगा का फुटला, ह्याचं कारण मला अजूनही मिळालं नाहीये. असो.. फुटला, तर फुटला.. पण जितका वेळ खेळलो, तितका वेळ मजा आली, एव्हढं मात्र नक्कीच !
रेटिंग - * * १/२
I think you need a different glass to view Black humor...totally disagree with your review....Well it's probably not your fault आपल्याकडे चित्रपटाने मनोरंजन(च) केलं पाहिजे हे इतकं ठासलं असतं की त्यातला विनोद काही सामाजिक / राजकीय मनोव्रूत्तीे कड़े बोट दाखवतोय तिथे लक्ष द्यायला वेळ कुणाला?
ReplyDeleteपुलेशु.
"आणि आर्य बब्बर बाप-लैकिकास" .. class, hasata hasata potat dukhayala lagale evadhya eka vakyanech. :-) chan review.
ReplyDelete