कधी मिळावे तुझे तुलाही
तुझ्याकडुन जे मला मिळाले
मनात वादळ, उरात कातळ
पाझरणारे अबोल छाले..
सांग तरीही माझ्यासम तू
उधार हासू आणशील का ?
एकच मोती गुपचुप माळुन
'सडा सांडला' मानशील का ?
फसफसणाऱ्या लाटांनाही
खळखळणाऱ्या सरिता बनवुन
अवघड असते हसू आणणे
डोळ्यांमध्ये समुद्र झाकुन
समजा जर हे तुला मिळाले -
'कातळ, छाले, वादळ-वारे'
कविता, स्वप्ने, हळवे गाणे
परत मला दे माझे सारे
सांग तुला हे जमेल का ?
सांग तुला हे कळेल का ?
व्याकुळलेली शून्यनजर ही
तुला जराशी छळेल का ?
........सांग तुला हे जमेल का ?
........सांग तुला हे कळेल का ?
....रसप....
३० जानेवारी २०१३
अवघड असते हसू आणणे
ReplyDeleteडोळ्यांमध्ये समुद्र झाकुन
Khoop chhan
..... Omkar