पप्पूला राजकारणी व्हायचंय
मागच्या-पुढच्या सात पिढ्यांचं
एकाच जन्मात खायचंय..
आमच्या पप्पूला राजकारणी व्हायचंय !
कसाबसा पप्पू १२ वी शिकला
पास-नापासच्या छापा-काट्यात तितपतच टिकला
पुढच्या पुस्तकांचा गठ्ठा मात्र रद्दीमध्ये विकला
१२ वीत पास होण्यासाठी एक क्लास लावला होता
तसंच आता एखादं 'पक्ष कार्यालय' लावायचंय
कारण पप्पूला राजकारणी व्हायचंय !
त्याने ठरवलंय, नोकरी करायची नाही
कारण माहितेय, मेहनत झेपायची नाही !
पण शौक पुरे करण्यासाठी बाप कमाईही पुरायची नाही !
ढुंगण न हलवताही पैसा यायला पाहिजे
म्हणूनच त्याला एकदाच 'मीटर डाऊन' करायचंय
एव्हढ्यासाठीच पप्पूला राजकारणी व्हायचंय !
'सामाजिक जाणीव' त्याला बालपणापासून होती
शाळेतल्या दिवसात त्याला पोरं बिचकून होती
ह्याच्या बालहट्टांपुढे आईसुद्धा मान तुकवून होती
आता बाळ मोठा होऊन माजोरडा सांड झालाय
माजलेल्या सांडाला आता सारं गाव उजवायचंय
मस्तवाल पप्पूला राजकारणी व्हायचंय
उद्या पप्पू उभा राहील तिकीट विकत घेऊन
मतं मागेल, मतं मिळवेल दारोदार फिरून
मीच आणीन निवडून त्याला सगळं माहित असून
कारण 'हा' पप्पू आला नाही, तरी फरक काय पडतो ?
दुसऱ्या कुठल्या पप्पूला डोक्यावर घ्यायचंय !
ह्या देशात प्रत्येक पप्पूला राजकारणी व्हायचंय
प्रत्येक लोकशाहीचं 'अराजक'च बनत असतं
पाहावं तिथे आजकाल अघटित घडत असतं
लोकहिताच्या राज्यघटनेचं बाड कुजत असतं
सुशिक्षित समाजावर राज्य करायला -
अर्धशिक्षित नालायकांनीच सरसावायचंय
वर्षानुवर्षं 'पप्पूं'ना राजकारणी व्हायचंय !
मागच्या-पुढच्या सात पिढ्यांचं एकाच जन्मात खायचंय..
इथे प्रत्येक पप्पूला राजकारणी व्हायचंय !!
....रसप....
२० जानेवारी २०१३
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!