दुपारी १.००-१.३० चा सुमार... सकाळपासून तुम्हाला चहाशिवाय काहीही मिळू शकले नाहीये.. पोटात कावळे कोकलत आहेत.. आणि तुमच्या सभोवताली हर तऱ्हेची होटेल्स आहेत. उडिपी, पंजाबी, चायनीज, पिझ्झा, व्हेज-नॉन व्हेज... सारं काही. काय कराल ? उडिप्याकडे जाऊन डोसा/ इडली/ वडा सांगाल की पंजाब्याकडे जाऊन कोफ्ता/ मख्खनवाला? की चायनीजमध्ये जाऊन चॉप्सी/ हक्का की पिझ्झा की अजून काही ? वेल... हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे पण उडिप्याकडे जाऊन चॉप्सी/ हक्का किंवा पंजाब्याकडे जाऊन डोसा/ इडली/ वडा मागवलंत तर ? तर..... गडबड होते ना ? तसंच काहीसं झालंय 'पुणे ५२' चं.. सिनेमाच्या केंद्रस्थानी त्यांनी ठेवला एक गुप्तहेर आणि कथा गुंफली भावनिक ओढाताणीची.. डोश्याला तंदूरमध्ये थापून रोटी आणि डोसा दोन्हीची चव घालवल्यासारखं, ह्या भावनिक ओढाताणीला उगाचच वरवरच्या थराराची जोड दिल्याने भावनिक नाट्यही गंडलं आणि थरारही !
च्यायला !! कैच्याकै लिहिलं ना ? 'बादरायण' का काय ते..? पण काय करणार 'पुणे ५२' हे नावही तसंच आहे ! कहाणीशी काहीही बादरायण संबंध नाही. म्हणजे पुणे ५२ ऐवजी, मुबई ५७ असतं.. ठाणे ५०२ असतं किंवा अगदी कोल्हापूर ११ असतं किंवा अगदी आकाशवाणी फेम झुमरीतलैया १ ते ९९ असतं, तरी काहीही फरक पडला नसता.
अमर आपटे (गिरीश कुलकर्णी) हा 'कैवल्य' बंगला, पुणे ५२ स्थित एक अयशस्वी गुप्तहेर असतो. घराच्याच, एका जरा बाहेरील खोलीत त्याचं 'सर्चलाईट ईन्व्हेस्टिगेशन' नामक नोंदणीकृत ऑफिसही असतं. अमर हेरगिरीच्या व्यवसायात असला तरी जरासा तत्वनिष्ठ असतो. कधीच फालतू धंदे करून बक्कळ पैसा कमवावा असं त्याला वाटलेलं नसतं. काकांकडे वाढलेल्या, काकांना त्यांच्या वकिलीच्या कामासाठी किरकोळ हेरगिरी करून माहिती पुरवण्याची मदत करत त्याचीच सवय लागलेल्या अमरची आर्थिक परिस्थिती 'सो-सो'च असते. थकलेल्या बिलांवरून, रात्री-अपरात्री घरी येण्यावरून, घरातल्या कामात काडीचीही मदत न करण्यावरून आणि लग्नाला अनेक वर्षं उलटूनही अजूनही अपत्य होत नसण्यावरून अमर आणि त्याची बायको 'प्राची' (सोनाली कुलकर्णी) मध्ये संवाद कमी आणि वाद जास्त असतात. एकंदरीत, एक नैराश्यमय जीवन जगणारा गुप्तहेर अमर आतल्या आत घुसमटत असतो.
दुष्काळात तेरावा महिना यावा, तसं तो त्याचा अशील 'पारेख' (स्वानंद किरकिरे) साठी पारेखची बायको (अबक) आणि एक सुप्रसिद्ध बिल्डर प्रसाद साठे (किरण करमरकर) चे फोटो काढताना फसतो. त्याला साठे पाहातो आणि अमरच्या घरी पोलिस येतात. कटकट करणाऱ्या आईसमोर (भारती आचरेकर) दारात पोलिस आल्याने वैतागलेली प्राची, पारेखने फी म्हणून अमरला दिलेले पैसे पोलिसांना देऊन मामला निस्तरायचा प्रयत्न करते. दोघांत अजून वाद होतात.. दुसऱ्या दिवशी दोघांत भांडण चालू असतानाच 'नेहा' (सई ताम्हणकर) येते. ती अमरकडे तिचा नवरा - बिल्डर साठे - वर लक्ष ठेवायचे, फोटो काढायचे काम घेऊन आलेली असते. पैश्याची चणचण असणारा अमर काम स्वीकारतो. पण त्याला तपासादरम्यान समजतं की साठे अणि नेहा नवरा-बायको नसून त्यांच्यात फक्त 'संबंध' आहेत. काहीही न बोलता, 'तुझा नवरा स्वच्छ आहे' अशी क्लीन चीट देऊन तो नेहाचं काम सोडतो खरा, पण घरी आल्यावर बायको असं काही डोकं खाते की तो अपरात्री घरातून निघून नेहाच्या घरी येतो. दोघं एकमेकांकडे आकर्षित होतात.. घडू नये, ते घडतं.. (इतके दिवस चुकत असलेला नेम, नेम न लावताच लागतो आणि) दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर त्याला समजतं की बायको प्रेग्नंट आहे !
तत्पूर्वी, पारेखच्या बायकोबरोबर काढलेले साठेचे फोटो घेऊन अमर, थेट साठेला भेटतो आणि फोटोंच्या बदल्यात साठेने पाठवलेल्या पोलिसांमुळे गेलेले त्याचे मेहनतीचे पैसे भरून द्यायची मागणी करतो. पण साठेही 'मुरलेला' खेळाडू असतो. तो अमरला एक वेगळीच 'ऑफर'ही देतो. (ती ऑफर काय आहे, हे न दाखवूनही जाणकार प्रेक्षकाला कळतं, हे बहुतेक दिग्दर्शकाला माहित नसावं.)
एकाच वेळी दोन स्त्रियांकडे आकर्षित झालेला अमर, त्याच्या हातून एक मोठं 'कांड' झाल्यामुळे साठेच्या जाळ्यात फसतो.. घरात भरपूर पैसा येतो, पण अमरची घुसमट आणखी वाढत जाते. ती लेखक-दिग्दर्शकांनाही व्यापते.. सगळेच गोंधळतात.. आणि आधीच गोंधळलेल्या प्रेक्षकाला कहाणी अर्धवटच सोडून अजून बुचकळ्यात टाकतात ! सिनेमाचा शेवट जवळ आल्यावर चित्रपटगृहाचा 'एक्झिट'चा दरवाजा उघडला जातो आणि आपल्याला कळतच नाही ? आत्ता ? ह्या जागेवर शेवट ? म्हणजे हे त्या 'वासेपूर' सारखं 'क्रमश:' वगैरे आहे की काय ? पण तेही नाही !
सिनेमागृहाच्या बुचकळ्यातून बाहेर येऊन प्रेक्षक सिनेमावर अजून विचार करतो आणि काही प्रश्न पडतात -
१. तो गुप्तहेर नसता, महानगरपालिकेतला सफाई कामगार असता तरी काय फरक पडला असता ?
२. पुणे(च) ५२(च) का ?
३. एखादा गुप्तहेर इतका बिनडोकासारखा फोटो काढतो ? आय मीन, बंगल्याच्या दारासमोर स्कूटर उभी करून तिचाही आडोसा न घेता ताठ उभं राहून समोरासमोर फोटो घेणं म्हणजे काय फॅशन फोटोग्राफी आहे का ही ?
४. ('वळू' पाहिल्यावर पडला होता तसाच....) हे हे असं असं झालं... बरं मग ?
भिजलेल्या कुत्र्यासारखं अंग थरथरवून/ फडफडवून असल्या निरुत्तर प्रश्नांना झटकून टाकून तो फक्त 'चिंतन' करतो आणि जाणवतं -
१. 'सो कूल' (सोनाली कुलकर्णी) ची बडबड अजिबात भुणभुण वाटत नाही ! इतक्या गोड आवाजात ती बोलते ! हा तिच्या एकंदरीत प्रसन्न व्यक्तिमत्वाचा 'प्रॉब्लेम' असावा, पण वैतागवाडी बायको उभी राहात नाही.
२. तोंदू अमर कुणीही वाटतो, पण 'हीरो' वाटत नाही आणि गुप्तहेर तर नाहीच नाही. जेव्हा नेहा त्याला 'तू हीरो आहेस' म्हणते तेव्हा तो हसतो, खरं तर तेव्हा आपल्यालाही हसू येतं.
३. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास, सई ताम्हणकरची गरम दृश्यं गिरीश कुलकर्णीमुळे अजिबात 'प्रेक्षणीय' वाटत नाहीत.
सिनेमा पहिल्यापासून शेवटपर्यंत (आणि शेवट झाल्यानंतरही !!) असा भास देत राहातो की काही तरी होणार आहे... काही तरी होणार आहे... पण होत काहीच नाही ! शेवटाजवळच्या दृश्यांत अमर ज्याप्रकारे झटकन खुर्चीतून उभा राहून चार-पाच जणांना हाणतो... धावतो... लाथा मारतो... तिथे सिनेमात 'फिल्मीगिरी'ही येतेच.
दळवी काकांचे पात्र, हॉटेलात असताना अमरचं अचानक कुठे तरी शोध घेत जाणं, नेहा-अमर फोनवर बोलताना प्राचीच्या आईने कानोसा घेणं, ते त्याचं दहा पैश्याचं जुनं नाणं, खिडकीतलं पक्ष्याचं घरटं, अमरला नंतर नंतर होऊ लागलेली ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर सारखी मानसिक दुरवस्था अश्या अनेक घटना/ गोष्टी एक तर उगाचच आहेत किंवा त्यातून आवश्यक ती नाट्यनिर्मिती करण्याची संधी गमावली गेली आहे.
कॅमेरा वर्क सुद्धा खूप गोंधळलेलं आणि गोंधळात टाकणारं वाटतं. उदाहरणार्थ - नेहा जेव्हा पहिल्यांदा अमरला भेटण्यास येते तेव्हा तिचा चेहरा सुरुवातीच्या काही अँगल्स मध्ये दाखवलेला नाहीये. त्यावर अंधार तरी दाखवला आहे किंवा तिला पाठमोरी दाखवली आहे. अश्या प्रकारचे कॅमेरा अँगल्स चालू असताना अचानक एका संवादापासून तिचा चेहरा दाखविण्यास सुरुवात केलीय. ह्यात कुठलाही धक्का बसत नाही... ना पाहाणार्याला ना अमर आपटेला... ना तसं काही पार्श्वसंगीत आहे... ना ती चेह्रा दिसतो त्या वेळी असं काही बोलते, जेव्हा तिचा चेहरा एकदम अंगावर यावा... ना त्या आधी ती असे काही बोलत असते ज्यामुळे तो झाकून ठेवावा.
केंद्रस्थानी असलेली व्यक्तिरेखा एक 'गुप्तहेर' आहे, त्याच्याकडे दोन स्त्रिया आकर्षित होणार आहेत ह्या दोनच कारणास्तव अमरच्या जागी एखादा आधी 'हीरो' आणि नंतर 'अभिनेता' असणारा कुणी तरी असता, तर बरं झालं असतं; असं वाटलं.
एकंदरीत, तंदूरवर लावलेल्या डोश्यासारखं 'पुणे ५२' हे एक ना धड भावनिक ना धड थरार नाट्य आहे - असं मला वाटतं.
रेटिंग - २
....रसप....