Monday, March 26, 2012

विशाल आसमंत मी अथांगसा समुद्र तू

विशाल आसमंत मी अथांगसा समुद्र तू
तुझ्या मिठीत रंगतो क्षितीज माळताच तू

कधी कधी निराश मेघ काळवंडती मनी
तुफान शांतवून मी विसावतो तिथेच तू

उरात आग पेटवून जाळतो मलाच मी
हलाहलास प्राशुनी निशांत अन निवांत तू

तमास ओढुनी खुशाल रोज मी पहूडतो
उसंत ना मुळीच घेउनी खळाळतेस तू

तुझ्यामधे तुझी किती रूपे दडून राहती
तुझा न आरसा कुणी छबी तुझीच पूर्ण तू

तुझी भयाण शांतता कधी मनास कोरते 
कधी निवांततेस सोडुनी प्रकोपतेस तू

अकांडतांडवास पाहुनी विषण्ण मी उरे
विराट गर्जना करून क्रूर भासतेस तू

तुला बघून  क्रंदतो, तुला बघून भांडतो 
तुझ्या मिठीत रंगतो क्षितीज माळताच तू


....रसप....
२६ मार्च २०१२ 

2 comments:

  1. अप्रतिम रणजीत ...!!! विरोधाभास छान उभा केलाय...

    सुंदरच आहेत कडवी... -प्रसन्न जोशी

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...