Sunday, March 04, 2012

प्रतिपश्चंद्रलेखेव..


प्राक्कथन:

२७ फेब्रुवारी; अर्थात 'मराठी भाषा दिन', म्हणजेच मराठी सारस्वताच्या उत्तुंग अस्मिताभिमानाचा सुदिन.
हा सुवर्ण-दिवस 'मराठी कविता समूह' काहीतरी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो. मागील वर्षी ह्याच दिवशी सतत २४ तास ऑर्कुटवरील 'मराठी कविता समूहा'वर काव्यसमिधा अर्पण करून साजरा केला होता. ह्या 'काव्य महायज्ञा'त प्रथितयश कवींच्या १८४ आणि आंतरजालावरील कवींच्या २०४ नवीन कविता; अशा एकूण ३८८ कविता लिहिल्या गेल्या.
या अशा अभिनव उपक्रमाची परंपरा पुढे घेऊन जाताना ह्या वर्षीच्या 'मराठी भाषा दिना'च्या निमित्ताने 'मराठी कविता समूह' आपला नित्याचा 'प्रसंगावर गीत' हा उपक्रम, मराठी माणसाच्या हृदयाशी अत्यंत निकट असणारा आणि महाराष्ट्राच्या भूमीच्या ज्ञात इतिहासातील सर्वोच्च मानबिंदू असलेला एक प्रसंग घेऊन साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे. या उपक्रमात प्रत्येक मराठी कवीने आपली कविता लिहून या प्रसंगावरील आपले विचार 'गीत स्वरुपात' मांडणे अपेक्षित आहे आणि त्याच बरोबरीने 'मराठी भाषा दिन' आजपासून पुढील पंधरा दिवस साजरा करणे अपेक्षित आहे.
चला तर मग मराठी काव्यमित्रांनो, तुमच्या लेखण्यांना लावा संगीनीची धार, तुमच्या धमन्यांमधले रक्त तुमच्या लेखणीच्या वाटे झिरपू द्या आणि तुमच्या अद्वितीय प्रतिभेतून उमटलेल्या मराठी काव्यगीतांचा अर्घ्य मराठी साहित्य-रत्नाकरामध्ये अर्पण करू या!!!
  

"मराठी कविता प्रोडक्शन्स"चा अत्यंत महत्वाकांक्षी आगामी चित्रपट - "शिवराज्याभिषेक" तयार होत आहे !

पार्श्वभूमी-

महाराष्ट्राचे दैवत असलेला शिवशंभूराजा, आदिलशाहीमध्ये गाढवाचे नांगर फिरवलेल्या पुण्याच्या पुण्यभूमीवर त्यांच्या लाल महालात मातोश्री जिजाबाई यांच्या समवेत राहायला आले. तेथे त्यांचे शारीरिक, बौद्धिक, सामरिक आणि राजकीय शिक्षण संस्कारांच्या बरोबरीनेच सुरु झाले. अल्पावधीतच शिवबा युद्धपारंगत तर झालाच; परंतु त्याच बरोबरीने आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने त्याने तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यासही केला. हळूहळू या शिवबाने बारा मावळातील अठरापगड जातींमधल्या गरिबीत खितपत पडलेल्या मराठी मावळ्यांशी नाते जमवले आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची; अस्मितेची जाणीव निर्माण करायला सुरुवात केली.
हळूहळू हा शिवबा आदिलशाही, निझामशाही यांच्या कडील एकेक प्रदेश काबीज करत सुटला. प्रत्येक वेळी नवनवीन युक्तीने आणि क्लृप्तीने त्याने सा-या शाह्यांना चकित आणि चारी मुंड्या चीत करून टाकले.
केवळ एक जुजबी वाटणारे बंड हळूहळू एका स्वतंत्र साम्राज्याचे स्वरूप घेऊ लागले. मग हे बंड मोडून काढण्यासाठी या शहांनी एकेक मोठमोठी संकटे या छोटुकल्या स्वराज्यावर धाडली. परंतु अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान यासारख्या बलाढ्य सरदारांशी झालेली भयंकर युद्धे असोत की सिंहगड, पावनखिंड-पन्हाळा, पुरंदर सारख्या किल्ल्यांवर मावळ्यांनी दिलेली झुंज असो, हरेक दिन मराठी स्वराज्य विस्तारत गेले आणि एक स्वतंत्र साम्राज्य म्हणून वाढत गेले.
आणि अशा त-हेने स्वतंत्र साम्राज्य निर्माण करणा-या शिवाजीराजांवर राज्याभिषेक होऊन त्यांनी छात्रचामरे धारण केली पाहिजेत हा आग्रह घेऊन प्रत्यक्ष काशीवरून प्रकांड पंडित विश्वनाथ भट्ट उर्फ गागाभट्ट थेट शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याची आग्रही विनंती केली. शिवाजी महाराजांनी ती मान्य केली आणि महाराष्ट्रभूमीचे भाग्य खुलले.
अनेक युद्धे आणि नाट्यमय प्रसंग दाखवून चित्रपटाचा अखेरचा प्रसंग दाखवण्यात येत आहे तो "शिवराज्याभिषेका"चा!!!

चित्रपटातील प्रसंग -

एक दवंडीवाला एका गावामध्ये दवंडी देतो - 'ऐका हो ऐकाSSS! आजपातूर अर्ध्या मासानं आपल्या शिवाजीराजाला अभिषेक होनार हाये होSSS!
आणि चित्रपटातील गीताला सुरुवात होते...........................
ही वार्ता ऐकताच गावातील प्रत्येक माणूस आनंदानं फुलून निघतो. सारे अबालवृद्ध आनंदानं गावाच्या रस्त्यांवर अक्षरश: नाचू लागतात.
चहूकडे आनंद आणि उत्साहाला उधाण आलेलं आहे. सारा मावळ परिसर आनंदानं न्हाऊन निघाला आहे. महाराष्ट्राच्या मातीमाधली हिरवाई नवचैतन्यानं डोलू लागली आहे.
रायगडावर राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. गडावर महाराजांच्या दरबाराचे बांधकाम जोरात सुरु झाले आहे. महाराजांचा राजमहाल, अश्वशाळा, गोशाला, मंदिरे, कार्यालये ई. सर्व ईमारतींची डागडुजी, रंगरंगोटीचे काम सुरु झाले आहे.
महाराजांचे रत्नजडीत सिंहासन, हिरे-माणिकमंडित राजमुकुट, रेशमी उंची पेहराव ई. ची तयारी सुरु आहे.
शास्त्रशुद्ध राज्याभिषेकासाठी काशीवरून वेदविद्याविभूषित अनेक महापंडित ब्राह्मण आले आहेत आणि राज्याभिषेकाच्या विविध विधींसाठी पंचनद्यांच्या पवित्र जलापासून ते चंदन-अष्टगंधादी नाना परिमळ द्रव्यांपर्यंत प्रत्येक बारीक सारीक तपशीलाकडे जातीने लक्ष देत आहेत.
स्वराज्याचं सैन्यदेखील जोरदार तयारीत आहे. विविध पथके आपापल्या विशिष्ट गणवेशात संचालनाची तयारी करत आहेत. राज्याभिषेक समारोहाच्या वेळी कुठलीही आगळीक होऊन नये याची दक्षता घेण्यासाठीची सज्जता चालू आहे.
आणि अखेरीस महाराष्ट्राची भाग्यरेखा बदलणारा; मराठी मातीला तिच्या अस्तित्वाची ओळख करून देणारा, मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू असलेला तो दिवस; तो क्षण आला आहे.
रायगडावर पहाटेच्या मंगलप्रसंगी होम-हवनादी अनेकविध विधी संपन्न झाल्यानंतर महाराजांवर पंचनद्यांच्या पवित्र जलाचा अभिषेक करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्राची भाग्यदेवता शिवाजी महाराज हे राजसिंहासनावर अधिष्ठित झालेले आहेत. वेदमंत्रघोषात शिवाजी महाराजांवर छत्र-चामर धरली गेली आहेत आणि गागाभट्ट आपल्या खड्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वाचून दाखवत आहेत "प्रतीपश्चंद्रलेखेव.............."

आणि चित्रपट येथेच संपतो!

(लेखन - सारंग भणगे)

* * * * * * * * * * * * * *

"मराठी कविता समूहा"च्या "लिहा प्रसंगावर गीत - भाग क्र. २२ ("मराठी भाषा दिन" विशेष)"मध्ये अफाट वर्णन केलेल्या ह्या ऐतिहासिक प्रसंगासाठी गीत लिहिण्याचा माझा प्रयत्न - 


कोरस -

{उजळेल नवा रवि आज नभी 
तव नाम असे शिवछत्रपती 
गगनासम हा अभिमान उरी 
जयघोष करा शिवछत्रपती
शिवछत्रपती !! शिवछत्रपती !! शिवछत्रपती !! शिवछत्रपती !!}

राजाधिराज मावळचा भाग्यास बदलण्या आला
स्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला 

सरणार दूर तो आता अंधार पारतंत्र्याचा
येथे फुटणार नव्याने ह्या मातीलाही वाचा
छातीत एक शौर्याचा अंगार फुलवण्या आला 
स्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला  

जे पीडित शोषित होते जे वंचित शोणित होते
जे गाडा अन्यायाचा पाठीवर ओढित होते
त्यांच्या हाती बंडाचे औजार सोपण्या आला 
स्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला 

लगबग खटपट जिकडे तिकडे सजावटीची चाले 
तासुन लखलख चमचमती साऱ्या तरवारी-भाले 
गनिमांचा नाश कराया शस्त्रांस उपसण्या आला 
राजाधिराज मावळचा भाग्यास बदलण्या आला
स्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला 

कोरस -

{उजळेल नवा रवि आज नभी 
तव नाम असे शिवछत्रपती 
गगनासम हा अभिमान उरी 
जयघोष करा शिवछत्रपती
शिवछत्रपती !! शिवछत्रपती !! शिवछत्रपती !! शिवछत्रपती !!

पंच*नद्यांचे आशीर्वच तव अभिषेकरुप लाभते 
राजमुकुट अन हे सिंहासन तुला खरे शोभते 
**प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता 
शाहसूनो: शिवस्यैषामुद्राभद्रायराजते**| }


....रसप....
३ मार्च २०१२ 


*एक असाही समज आहे की पाच नव्हे, सात नद्यांचे पाणी होते. तसे असल्यास 'पंच' ऐवजी 'सप्त' करावे.

**शिवाजी महाराजांची राजमुद्रा - 
"प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो: शिवस्यैषामुद्राभद्रायराजते|"

1 comment:

  1. माझी वाचनाची आवड जोपासणारा अत्यंत खास ब्लॉग.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...