Saturday, March 10, 2012

खुर्चीच्या टोकावरची - "कहानी" (चित्रपट परीक्षण) - Kahani Review


एखाद-दुसरं नाव वगळता कुणीच 'माहितीचं' नाही.. सिनेमात एकही गाणं नाही.. परदेशातलं शूटिंग नाही.. (शूट करताना स्लो आणि नंतर फॉरवर्ड केलेले) गाड्यांचे जीवघेणे पाठलाग नाहीत.. अकारण रक्तरंजन नाही.. कानठळ्या बसवणारं पार्श्वसंगीत देऊन भंपक नाट्यनिर्मिती करायचा प्रयत्न नाही.. तरीही गच्च आवळलेल्या मुठी, एकावर एक दाबून धरलेले दात आणि पडद्यावर खिळलेली नजर.. असा खुर्चीच्या टोकावर आणणारा रोमांचक अनुभव (किमान २-३ ठिकाणी) देणारा हिंदी सिनेमा बऱ्याच दिवसांनी पाहिला आणि "हिंदी सिनेसृष्टी वाटते तितकी 'होपलेस' नाही" हा माझा समज किंचित आणखी दृढ झाला!

'कहानी' सुरू होते आणि घडते कोलकात्यात. मेट्रो रेल्वेत विषारी वायू सोडून शेकडो लोकांना ठार करण्याचा घातपात घडवला जातो. हे घडवणारा माणूस दुसरा-तिसरा कुणी नसून खुद्द गुप्तचर खात्याचा एक गद्दार एजंट 'मिलन दामजी' असतो. जो अर्थातच ह्या 'कामगिरी'नंतर गायब होतो आणि त्याच्या अस्तित्त्वाचे सर्व पुरावेही हेतुपुरस्सर नष्ट केले जातात.
ह्या प्रकारानंतर साधारण दोन वर्षांनी 'विद्या बागची' (बंगालीत - 'बिद्या') ही गरोदर स्त्री कोलकात्याला येते. सॉफ्टवेअर व्यावसायिक असलेले बागची नवरा-बायको लंडनस्थित असतात. व्यावसायिक कामासाठीच तिचा नवरा - अर्णव बागची - कोलकात्यात दोन आठवड्यांसाठी आलेला असतो, पण तो परततच नाही. त्याचा शोध घेण्यासाठी विद्या कोलकात्यात येते. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर ती "National Data Center" जिथे अर्णव कामासाठी आलेला असतो, तिथे जाते व छाननीचा प्रयत्न करते. अर्णवचा चेहरा एका दुसऱ्या व्यक्तीशी थोडाफार जुळत असल्याचे कळते.. आणि सुरु होते एक वेगळेच नाट्य.. जीवावर बेतणारे.. बेतलेले.. तिच्या ह्या शोधात 'सांत्योकी सिन्हा उर्फ राणा' हा पोलीस ऑफिसर तिची मदत करतो. गुप्तचर खात्याचा ऑफिसर खान ह्या प्रकरणात समाविष्ट होतो.. वारंवार नवीनवी वळणं घेत ही 'कहानी' अखेरीस एका पूर्णत: अनपेक्षित वळणावर येऊन संपते आणि सिनेमातील पात्रांसह प्रेक्षकही विस्मयचकित होतो.

घातपात घडवून आणणारा एजंट मिलन दामजी कोण असतो?
घातपात घडवून आणण्यामागे मास्टरमाइंड असलेल्या गुप्तचर खात्यातील व्यक्ती, ज्या मिलन दामजी पर्यंत कुणालाही पोहोचू देत नाहीत, त्या कोण आहेत ?
दामजी आणि अर्णवचा नेमका संबंध काय ?
अर्णव जिवंत आहे का?
एका अनोळखी बाईला इतकी मदत करण्यात 'राणा'ला इतका रस का आहे?
'खान'चा नक्की हेतू काय आहे ?
असे असंख्य प्रश्न वारंवार पडत राहतात, पण सिनेमाचा वेग विचार करायला क्षणाचीही उसंत देत नाही आणि सरतेशेवटी उघडणारे रहस्य डोळे सताड उघडे करते!

सिनेमा संपतो आणि अर्थातच लक्षात राहते - विद्या बालन.
'डर्टी पिक्चर' मध्ये वजन वाढवणारी विद्या इथे गरोदर स्त्रीची भूमिका बरहुकूम वठवते. नव्या जमान्याची शबाना आझमी बनायची ताकद ह्या अभिनेत्रीत नक्कीच आहे. कदाचित ती त्याही पुढची असेल, असंही वाटतं.
'राणा' आणि 'खान' ह्या दोन व्यक्तिरेखा सुद्धा चांगल्या वठवल्या गेल्या आहेत.
संगीतकार 'विशाल-शेखर'ला फारसा वाव नाही, हे बरं झालं. "रा-वन"च्या गगनभेदी कर्कश्य संगीतानंतर त्यांना इतपतच मोकळीक मिळालेली बरी!!

एकंदरीत, अस्सल थरार अनुभवण्यासाठी हा सिनेमा अवश्य पाहावा असाच आहे.

(डिस्क्लेमर - एखाद्या इंग्रजी सिनेमाची नक्कल असल्यास, ते मला समजले नसल्यास, तो माझ्या अज्ञानाचा भाग समजून माझ्याच अक्कलखाती जमा करावा, पण सिनेमा जरूर पाहावा!)

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...