"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवर कविता -भाग ८७" मध्ये माझा सहभाग -
अंधाराला जाळणारे पेटविण्या दिवे
पुन्हा एका वादळाचे मला स्वप्न हवे
नको मला सुखासीन आयुष्य गोजिरे
कोळसाच हाती येवो नको मला हीरे
माझ्या मनामध्ये हीरा आहे मी जपला
संघर्षाच्या खाणीमध्ये सापडला मला
समाधान नाव त्याचे लख्ख चकाकतो
त्याच्या तेजानेच माझा चेहरा खुलतो
उजेडाचा अंधाराशी लढा नेहमीचा
अंधाराचा कावा आता आहे ओळखीचा
चोरपावलाने येणे लपून छपून
हळूहळू चहूबाजूंनी घेणे वेढून
झेलण्याला सज्ज आहे सारे त्याचे वार
आहे माझ्या जीवनाचा मीच शिलेदार
अंधाराला जाळणारे पेटविण्या दिवे
पुन्हा एका वादळाचे मला स्वप्न हवे
....रसप....
५ मार्च २०१२
पुन्हा एका वादळाचे स्वप्न मला हवे :
ReplyDeleteअप्रतिम रचना ! खूप आवडली . शब्द चित्र आहे !
मला अजून एका सुंदर गाण्याची आठवण झाली .पिक्चर होता "तुफान और दिया " . वसंत देसाई यांनी संगीतबध्ध केलेलं गाणे " निर्बल से लडाई बलवान कि , ये कहानी ही दिये कि और तुफान कि ".
बाय द वे ..ओळी काय होत्या ज्यावर हि कविता लिहिले होतीस तू ?
PRASANNA JOSHI
"माझ्या जीवनाचा मीच शिलेदार" ही ओळ होती.
Deleteकुसुमाग्रज जयंती (मराठी भाषा दिन) निमित्त ही कुसुमाग्रजांची ओळ देण्यात आली आहे.
धन्यवाद!
https://www.facebook.com/groups/marathikavitasamooh/doc/331786646856952/