Sunday, March 15, 2015

एक भयावह प्रवास (Movie Review - NH10)

एखाद्या काल्पनिक कथेवर विश्वास न ठेवणे जर शक्य असेल तर बहुतेक वेळेस तो आपल्या अज्ञानातला आनंद असतो. कारण आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या भोवतालच्या जगाबाबतच आपल्याला पूर्ण ज्ञान नसतं तर जी सृष्टी दृष्टीआडची आहे, तिची काय कथा ? कुठल्याही रंगाचा चष्मा न लावता, डोळ्यांना झापडं न बांधता खुल्या नजेरेने जर आपण पाहिलं तर दिसून येईल की आपल्याच परिघात संस्कृतीच्या पताका म्हणून कित्येक वेळा लोकशाहीची लक्तरं टांगलेली असतात. देशाच्या राजधानीच्या शहरातल्या एका उपनगरातल्या एका सोसायटीतल्या एका फ्लॅटच्या बंद दरवाज्याआड असलेलं सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या एका पती-पत्नीला हरयाणातल्या एका अर्धविकसित गावातल्या अर्धशिक्षित लोकांच्या आयुष्यातल्या घडामोडींची माहिती असणं अनेकदा शक्य नसतंच कारण ह्याच्या उलटसुद्धा अशक्यच असतं. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्या प्रमाणे प्रत्येक संस्कृतीच्याही दोन बाजू असाव्यातच. ही दुसरी बाजू कधी अनपेक्षित आनंद देते तर कधी अकल्पित आघात.

लग्न करून बंगलोर (बंगळुरू!)हून दिल्लीला स्थायिक झालेली मीरा (अनुष्का शर्मा) आणि तिचा नवरा अर्जुन (नील भूपालन) एक समाधानी आयुष्य जगणारे पती-पत्नी. एके रात्री मीराला ऑफिसमधून तातडीने बोलावणं येतं म्हणून ती एकटीच गाडी घेऊन निघते. तिला एकटी पाहून रस्त्यात तिच्यावर अज्ञात लोक हल्ला करता, पण ती शिताफीने बचावते. ह्या मानसिक धक्क्यात असलेली मीरा आणि 'मी तिला एकटं का जाऊ दिलं' ह्या अपराधी भावनेने अस्थिर झालेला अर्जुन मीराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेरगावी जाण्याचं ठरवतात. दिल्लीहून हरयाणामार्गे पंजाबमधील भारतीय सीमारेषेपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १० (NH10) ने जाताना एका धाब्यावर त्यांच्यासमोर एक मुलगी व तिच्या पतीचं अपहरण होतं आणि अर्जुन त्यात हस्तक्षेप करतो. इथून पुढे, त्या संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मीरा-अर्जुनच्या आयुष्यात जे काही घडतं, त्यामुळे त्यांना नाण्याची दुसरी बाजू दिसते जिचा एक खोलवर आघात होतो.


हा आघात आपल्या मनावरसुद्धा होतो. वास्तवाचं इतकं भयावह नग्न चित्रण बघताना असह्यही होतं. दाखवलेली हिंसा अश्या वेळी कहाणीसाठी न्याय्य वाटते. हिंसाच नव्हे तर काही साधे-साधे संवादही हादरवतात. उदा.
- यह शहर बढ़ता बच्चा हैं, उछलेगाही !
- गुडगाँव का आखिरी मॉल जहाँ ख़तम होता हैं, वहीं पर आपकी डेमोक्रसी भी ख़तम हो जाती हैं !
- टोल माँगा तो गोली मार दी !

आपल्या 'कम्फर्ट झेन' मधून बाहेर जेव्हा एखादी कलाकृती आपल्याला नेते तेव्हा तिने आपल्यावर पूर्णपणे पकड घेतलेली असते. त्या वेळी आपण आपल्याच नकळत खूष होतो, हसतो, रडतो, दाद देतो किंवा घाबरतोही. खुर्चीत रेलून पॉपकॉर्न चघळत, पेप्सीचे फुरके मारत शांतपणे कुणी 'NH10' पाहू शकत असेल तर ते ढोंग तरी समजावं किंवा संवेदनाशून्यता.
उण्या-पुऱ्या दोन तासांचं हे नाट्य आहे. एका रात्रीत घडणारं कथानक आहे. त्यामुळे त्याला प्रचंड वेग आहे. हा वेग ह्या सगळ्या थराराला वेगळीच धार देतो.
प्रत्येक लहान-मोठ्या भूमिकेने आपापली छाप सोडली आहे. अगदी टोलनाक्यावर निर्विकारपणे 'रात्री इथे गोळीबार झाला' सांगणारा माणूस किंवा दोन लाखांच्या घड्याळाला पाहून 'इसमे लाईट नही लगती क्या ?' विचारणारा लहान मुलगासुद्धा लक्षात राहतो.

वारंवार संताप, नैराश्याचा उद्रेक होणारी 'मीरा' व्यक्तिरेखा साकारताना अनुष्का शर्माकडून अति-अभिनय होणे स्वाभाविक होते. मात्र आपल्या 'इमेज'च्या बाहेर जाऊन तिने 'मीरा' साकारली आहे. योग्य वेळी, योग्य तितका उद्रेक करण्यात ती यशस्वी ठरली आहे आणि तो तिच्याकडून करवून घेतल्याबद्दल दिग्दर्शक नवदीप सिंग अभिनंदनास पात्र आहेत. नवदीप सिंग ह्यांचा 'मनोरमा' हा पहिला चित्रपट तिकीटबारीवर विशेष चालला नव्हता, मात्र तोसुद्धा एक चांगला थरारपट होता. नील भूपालन आणि दीप्ती नवल दोघांना खूप जास्त काम नाही. मात्र एक गुणी अभिनेता आहे तर एक कसलेली अभिनेत्री. 'ज़िन्दगी ना मिलेगी दोबारा' मध्ये केवळ एका दृश्यात दीप्ती नवलने व्यक्तिरेखा साकारली होती, तर इथे शेवटच्या काही मिनिटांत कमाल दाखवली आहे. नकारात्मक भूमिकेत अनेकदा अभिनयास बराच वाव असतो, असं मला नेहमी वाटतं. कारण त्या भूमिकेस आनंद, दु:ख, विकृती, रुद्र, भीती, मृत्यू वगैरे अनेक छटा सादर करायच्या असतात. त्याच बरोबर प्रत्येक खलव्यक्तिरेखेस बहुतेकदा स्वत:ची वेगळी अशी एखादी लकबही असतेच. पण इथला खलनायक सतबीर मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच मूडमध्ये आहे. भावनांचे असे वेगवेगळे रंग उधळायला ह्या व्यक्तिरेखेत खरं तर वावच नाही, तरी 'दर्शन कुमार' ('मेरी कोम' मधला नवरा) ने सतबीर असा उभा केला आहे की जणू तो आपल्या समोरच उभा ठाकला असावा. चित्रपट संपल्यावर मीरा आणि सतबीर प्रत्येकाच्या लक्षात राहतात, हे निश्चित.

हिंदीत उत्तम थरारपट म्हणजे योग्य वेळी होणाऱ्या पावसासारखा दुर्लभ योग झाला आहे. त्यामुळे 'NH10' हा 'पाहायलाच हवा' असा चित्रपट नक्कीच आहे !

रेटिंग - * * * *

हे परीक्षण आज (१५ मार्च २०१५) मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये प्रकाशित झाले आहे :-


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...