Friday, March 20, 2015

चलो सिडनी ! (IND vs BAN - World Cup 2015)

~ ~ चलो सिडनी ! ~ ~

विश्वचषक सुरु होण्यापूर्वी जर कुणाही संघाला हा पर्याय दिला असता की 'उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशसोबत खेळा', तर प्रत्येकानेच अगदी आनंदाने स्वीकार केला असता. ह्याचा अर्थ बांगलादेश कच्चा संघ आहे, असं नाही तर इतर संघ जास्त पक्के आहेत असा. भारताला उपांत्यपूर्व सामना बांगलादेशशी खेळायला मिळणे, हे भारताचे सौभाग्य आहे असं बरेच जण म्हणतील, खासकरून पाकिस्तानचे समर्थक. मात्र हे म्हणत असताना ते सगळे सोयीस्काररित्या हे विसरतील की हा सामना मिळवण्यासाठी भारताने त्याच्या ग्रुपमधल्या सर्व सहा संघांना चारी मुंड्या चीत केलं होतं आणि हे सहा बांगलादेशचे संघ नव्हते. ज्या दक्षिण आफ्रिकेसमोर पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात श्रीलंकेने बिनशर्त शरणागती पत्करली, त्या दक्षिण आफ्रिकेला, जो पाकिस्तानचा संघ आत्ताच्या क्षणी सगळ्यात धोकादायक म्हणवला जातो आहे, त्या पाकिस्तानलाही भारताने धूळ चारली होती. झिंबाब्वेला बुकलून काढल्यावर जबरदस्त आत्मविश्वास कमावलेल्या विंडीजलाही भारताने अस्मान दाखवलं होतं. भारताने उपांत्यपूर्व फेरीत स्वकर्तृत्वाच्या बळावर थाटात, आवेशात प्रवेश केला. केलेल्या मेहनतीचं फळ म्हणून किंवा एक काव्यात्मक न्याय म्हणून त्यांना उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेश मिळाला. हे त्यांचं नशीब नव्हे आणि असलं तरी ते त्यांनी स्वत:च्या हाताने लिहून घेतलं होतं.

बांगलादेशला नेहमीच लिंबू टिंबू म्हटलं जातं. पण ह्या लिंबाने आजवर अनेकांचे दुधाचे पेले नासवले आहेत. भारतासाठी २००७ च्या विश्वचषकाच्या आठवणी अजूनही ताज्या होत्या आणि डावाचा पहिला अर्धा भाग संपला तोपर्यंत त्या आठवणी अश्या काही त्रास द्यायला लागल्या होत्या जसा एखादाच डास कानाजवळ 'गुँss गुँss' करत असावा. पंचवीस षटकांत ९९ धावा म्हणजे रनरेट पूर्ण चारचाही नाही, धवन व कोहली तंबूत परतलेले आणि खेळपट्टीवर आंधळी कोशिंबीर खेळणारा अजिंक्य रहाणे. हे दृश्य पुन्हा पुन्हा पोर्ट ऑफ स्पेनला घेउन जात होतं. पण रोहित शर्मा योग्य वेळी कृष्ण बनला आणि वस्त्रहरण होत असलेल्या भारतीय फलंदाजीची अब्रू वाचली.

मेलबर्नच्या मैदानावर नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करणं आणि धावांची गगनचुंबी इमारत उभारून सामना स्वत:च्या नावावर लिहून घेणं, असंच गेल्या काही सामन्यांत होत आलेलं आहे. धोनीने नाणेफेक जिंकली आणि अजून एका इमारतीचा पाया धवन-रोहितने घातला. पण महत्वाच्या संसदीय अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पक्ष नेत्याने सुट्टीवर निघून जावं तसं ऐन मोक्याच्या क्षणी धवन आणि कोहली पटापट बाद झाले आणि धावांचा ओघ पाण्याची टाकी संपावी तसा मंदावला. नळाने आचके देत देत धार सोडावी, तश्या अधूनमधून एक-दोन धावा निघायला लागल्या. एरव्ही मोरपिसासारखा हळुवार खेळ दाखवणारा अजिंक्य रहाणे टूथब्रशसारखा खरवडायला लागला आणि अखेरीस लहान मुलाने खेळणं फेकावं तसा विकेट फेकून निघून गेला. त्याचं विकेट फेकणं 'ब्लेसिंग इन डिसगाईस' ठरलं. झिंबाब्वेविरुद्ध महत्वपूर्ण शतक ठोकणारा रैना रोहितच्या साथीला आला आणि बांगलादेशी खेळाडूंना काही काळासाठी दिसलेलं मधुरस्वप्न स्वप्नच राहिलं. सर्व गोलंदाजांना धावांची समसमान वाटणी करून कुणालाही तक्रारीची संधी न देता ह्या दोघांनी धावसंख्येला आकार दिला. आत्तापर्यंतच्या स्पर्धेत जवळजवळ सर्व सामन्यांत धूम केतूप्रमाणे येऊन निघून जाणाऱ्या रोहितने 'आज एकाग्रतेने खेळायचा दिवस आहे' असं ठरवलं होतं. Fortune favours the brave असं म्हणतात. त्याचे काही हवेतले, धोकादायक, ताबा नसलेले फटके मैदानावरील रिकाम्या जागा शोधून तिथे विसावले आणि एकदा तर साक्षात पंचदेवही त्याला प्रसन्न झाले. अखेरच्या षटकांत भारताला धोनीकडून जी अपेक्षा होती ती थोड्या प्रमाणात जडेजाने पूर्ण केली. पहिल्या २५ षटकांत ९९ आणि पुढच्या २५ मध्ये २०३ ही रिकव्हरी जबरदस्तच होती.

३०३ धावांच्या पाठलागाची सुरुवात बांगलादेशने खोकल्याची उबळ दाबतच केली. ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्या आणि आधीपासूनच बांगलादेशच्या हातात नसलेला विजय हळूहळू दृष्टिक्षेपाच्याही बाहेर गेला.
सुरुवातीला मोहम्मद शमी स्वत:च्या डुप्लिकेटसारखा वाटत होता. पहिल्या दोन षटकांत त्याने मार खालल्यावर चाणाक्ष धोनीने त्याला लगेच विश्रांती देऊन मोहितला आणलं. पण उमेश यादव मात्र स्वाभिमान डिवचल्यासारखा टिच्चून गोलंदाजी करत होता. धोक्याचा इशारा देणाऱ्या तमिम इक़्बालला त्याने तंबूत जाण्याचा इशारा दिला आणि त्याने आत जाऊन पॅड्स सोडण्याच्याही आधी त्याचा जोडीदार इम्रूल कयीससुद्धा आलाच ! बांगलादेशची गाडी ह्यानंतर पुन्हा रुळावर आलीच नाही आणि भारताची थेट सिडनीच्या दिशेने रवाना झाली.

गेल्या सहा सामन्यांत ज्या रोहित, 'यदाव' आणि जडेजाच्या खेळावर प्रश्नचिन्ह होते, त्या तिघांनीही ह्या सामन्यांत आपली कमी-अधिक प्रमाणात चुणूक दाखवली, हे विशेष. शमी आणि अश्विन ही ह्या भारतीय गोलंदाजीची संपत्ती आहे. पहिल्या दोन षटकांत स्वैर वाटलेल्या शमीने नंतरच्या स्पेल्समध्ये स्वत:ला आणि स्वत:च्या गोलंदाजी पृथ:करणाला सावरलं आणि मागील सामन्यात भरपूर चोप खाललेल्या अश्विनने बांगला फलंदाजांच्या मुसक्या आवळत पुन्हा एकदा आपली 'उंची' सिद्ध केली.




हा लेख लिहून होईपर्यंत तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्याचा निकाल जवळजवळ निश्चित झालेला आहे. बहुतेक तरी भारतासमोर उपांत्य फेरीत खडूस ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान असणार आहे. ते मोडून काढण्यासाठी भारतालाही खडूसपणा वाढवावा लागेल. कारण 'लोहा लोहे को काटता हैं'. विराट कोहलीला स्वस्तात बाद करणाऱ्या रुबेल हुसेनने त्याला जाता जाता तोंड भरून शुभेच्छा दिल्या होत्या. विराटने त्या शांतपणे ऐकून घेतल्या त्याचं कारण स्पर्धेच्या सुरुवातीलाच पत्रकाराशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल त्याला मिळालेल्या कानपिचक्या असाव्यात. पण प्रतिस्पर्ध्यांना डिवचण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन रुबेल हुसेनच काय सगळ्यांच्याच किती तरी मैल पुढे आहेत. ते नक्कीच बाचाबाचीची एकही संधी सोडणार नाहीत. तेव्हाही भारतीयांना संयम पाळून प्रत्येक टोमण्याचं उत्तर आपल्या बॅटने किंवा चेंडूनेच खडूसपणा दाखवून द्यावं लागेल.

भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्याला सिडनी क्रिकेट ग्राउंड तुडुंब भरेल, हे निश्चित. त्या जनसागरात निळ्या लाटा जास्त असतील की पिवळ्या लाटा जास्त असतील ? कुठल्याही रंगाच्या लाटा असोत, विजयाचा झेंडा तिरंगीच असायला हवा !

- रणजित पराडकर


ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...