Sunday, March 29, 2015

बरखा सुमार आयी (Movie Review – Barkhaa)

वर्षानुवर्षं सकाळी उठून चहा किंवा कॉफी घेण्याची जवळजवळ प्रत्येकाला सवय असते. तीच चव, साधारण तीच वेळ आणि बहुतेकदा जागाही तीच. फक्त काही ठराविक काळानंतर 'कप' बदलतो. अगदी तसंच, वर्षानुवर्षं रोज सकाळी जाग आल्यावर प्रेमत्रिकोणाची किंवा 'पहिल्या नजरेत होणारं प्रेम आणि नंतर नावावर शेम' ह्या चहा किंवा कॉफीची हिंदी चित्रपटकर्त्यांचीही जुनी सवय आहे. फक्त ठराविक काळानंतर इथेही 'कप' बदलत गेला आहे. पहिली नजर जुळण्याच्या निवडक जागा कायम ठेवत नजरांची उगम स्थानं व मिलन स्थानं बदलत गेली आहे. ह्या 'प्रेम ते शेम ते परत प्रेम' प्रवासाची हाताळणी थोडी बदलत गेली आहे. ती अगदी जराशी वास्तववादी झाली आहे. अश्या कहाण्या दाखवताना पडद्यावर मात्र आजही ठोकळेच का असतात, हे मात्र मला समजत नाही.

'प्रेम-शेम-प्रेम'वाल्या 'बरखा' मधले ठोकळे आहेत 'ताहा शाह' आणि 'सारा लोरेन'. (पैकी हीरोचं नाव पहिलं आहे.)
एका नावाजलेल्या वकिलाचा मुलगा असलेला जतीन सबरवाल (ताहा) हिमाचल प्रदेशात मित्रासोबत गेला असताना बरखा (सारा)ला पाहतो आणि पहिल्या नजरेत वेड लागावं, असं तिच्यात काहीही नसतानाही तिच्यासाठी वेडा होतो. मग ती पांढरी पाल त्याला मुंबईत परतल्यावर पुन्हा भेटते. कालांतराने ती एक बार डान्सर असल्याचा एक भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक धक्का बसतो. भूकंपाप्रमाणे एका धक्क्यासोबत अजून एक धक्का बसतो, जो मी सांगणार नाही पण पण ह्या सगळ्यातून तो सावरणार आहे, हे आपल्याला माहित असतंच, सावर्तोच. अत्यंत बाष्कळपणे ही कहाणी, लिहिण्याआधीच सुचलेल्या शेवटापर्यंत पोहोचते. असा एकंदरीत कहाणीचा प्रवास.

ह्या दरम्यानच्या काळात असह्य प्रवासाचा आनंद काय असतो, ह्याचा पुरेपूर प्रत्यय येतो. पडद्यावर दिसणाऱ्यांपैकी १-२ सह-अभिनेत्यांचा अपवाद वगळता सर्व जण 'सुमार अभिनय स्पर्धे'त हिरीरीने सहभाग नोंदवल्यासारखे वावरतात.
'ताहा शाह' ही स्पर्धा अगदी सहजपणे जिंकतो. तो अनेक वर्षांतून एकदा येणाऱ्या विशिष्ट आकड्यांच्या तारखेप्रमाणे विशेष उल्लेखनीय आयटम आहे. त्याच्या चेहऱ्यावर हवा तो भाव दिसावा म्हणून मेक अपवाला, साउंड रेकॉर्डिस्ट, कॅमेरामन इ. सर्वांनी जीवाचं रान केलंय, मात्र तो क्षणभरही विचलित होत नाही. तो विनोद करताना हास्यास्पद आणि भावनिक होताना विनोदी वाटतो.
'सारा लोरेन'ला दुसरा क्रमांक मिळाल्याने ती जराशी खट्टू होईल. पण त्यात तिची खरोखर काहीच चूक नाही. तिची भूमिकाच अशी होती की तिने कितीही प्रयत्न केला, तरी अभिनयाचा थोडासा भास निर्माण होणं स्वाभाविकच होतं. मख्ख चेहऱ्याने लख्ख अंगप्रदर्शन करणाऱ्या जॅकलिन फर्नांडीस, लिसा रे, सेलिना जेटली, इ. पांढऱ्या बाहुल्यांच्या क्लबमध्ये 'सारा'ला आजीवन सदस्यत्व मिळू शकेल, नव्हे द्यायलाच हवं.
हिमांशू चटर्जी, पुनीत इस्सार व इतर सर्व कलाकारांना उत्तेजनार्थ बक्षीस विभागून देता येऊ शकेल. पण बारवाल्या 'अन्ना'च्या भूमिकेतील आशिष रॉयला 'सुमार अभिनय स्पर्धे'साठी अपात्र ठरवावं लागेल.
सगळ्यांकडून इतकं अप्रतिम प्रदर्शन करवून घेतल्याबद्दल दिग्दर्शकाच्या रिकाम्या खुर्चीला मात्र एक विशेष पारितोषिक दिलं गेलं पाहिजे. कारण चित्रपट हे दिग्दर्शकाचंच माध्यम असतं. पडद्यावर दिसणारे चेहरे निमित्तमात्र असतात.
ह्या सगळ्यात एक-दोन गाणी मात्र उगाच बरी जमून गेली आहेत. ती गाणी आपल्याला आवडल्याने थोडासा रसभंग होतो. खासकरून साबरी ब्रदर्सची कव्वाली 'मन कांटो मौला' चांगलीच लक्षात राहते आणि काही काळासाठी कलाकारांच्या नेत्रदीपक योगदानाला विसरायला भाग पाडते.
हिमाचलसारख्या निसर्गसुंदर भागात केलेलं चित्रणही इतकी इतकं सफाईदारपणे वाईट केलं आहे की कुठल्याही फ्रेममध्ये सौंदर्याचा लवलेश दिसू नये. मुंबई आणि हिमाचल हे दोन्ही भाग न पाहिलेल्यांना ह्या दोन्हींमध्ये फक्त बर्फाचा फरक आहे, असंही वाटू शकेल इतकं हे चित्रण सफाईदार आहे.

समजा दोन-अडीच तास कुठे तरी वेळ घालवायचाच असेल, तर उन्हाळ्याचे दिवस आहेत; उगाच इथे तिथे उंडारण्यापेक्षा एखाद्या स्वस्तातल्या, स्वच्छ व वातानुकुलीत चित्रपटगृहात जाऊन 'बरखा'चं तिकीट काढावे. अगदी कोपऱ्यातली जागा निवडावी आणि खुर्ची पुश बॅक करून ताणून द्यावी. उत्तम झोप होईल.

रेटिंग - १/२* (अर्धा तारा)

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (२९ मार्च २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

2 comments:

  1. दैनिकासाठी लिहिण्याचा एक तोटा म्हणजे, बघण्याची मुळीच इच्छा नसताना अनेक चित्रपट पाहावे लागतात. त्यातलाच हा प्रकार म्हणायचा का? असो, तुमची पोस्ट पाहिली आणि मग ट्रेलर पाहिला. तसाही कधीही पाहिला नसता असाच सिनेमा आहे.

    अश्या सिनेमांमध्ये शक्यतोवर सहाय्यक अभिनेते अतिशय गुणी काम करताना दिसतात नाही का?

    ReplyDelete
    Replies
    1. त्यातलाच प्रकार ! :-)

      मला तर नेहमी असं वाटतं की कुठल्याही सिनेमामध्ये सहाय्यक अभिनेते चांगलंच काम करताना दिसतात.

      धन्यवाद हर्षल !

      Delete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...