Monday, March 30, 2015

~ ~ स्वप्नभंगाची हॅटट्रीक (Australia vs New Zealand - Cricket World Cup 2015 - Final) ~ ~

प्रत्येक विश्वचषक सुरु होण्याआधी काही संघ 'प्रबळ दावेदार' मानले जातात. 'फेवरेट्स'.
एखाद-दुसरा संघ 'लक्षवेधी' असतो. 'डार्क हॉर्स'.
जवळजवळ प्रत्येक विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ 'प्रबळ दावेदार' मानला गेला आहे. तर न्यू झीलंड नेहमीच 'लक्षवेधी'. १९९२ ला दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकात सहभाग घेतला, तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक विश्वचषकासाठी तेसुद्धा 'प्रबळ दावेदार' राहिले आहेत आणि सौरव गांगुलीने खडबडून जागं केलेल्या भारतीय संघाने जेव्हा २००३ साली अंतिम सामन्यापर्यंत मुसंडी मारली होती, तेव्हापासून भारतसुद्धा. त्या त्या देशातील लोकांना तो तो देश जिंकावा, असं वाटणं स्वाभाविक आहे. (ब्रिटीश लोकांचाही इंग्लंड संघाला पाठींबा असणारच.) त्यामुळे बाद फेरीत जेव्हा आठ संघ दाखल झाले तेव्हा ते सगळेच संघ, त्या त्या देशांतील लोकांसाठी 'प्रबळ दावेदार' झालेले होते आणि त्यातून जेव्हा चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले, तेव्हा तर भावनांना ऊतच आला होता. दक्षिण आफ्रिका, न्यू झीलंड आणि भारत ह्यांना प्रचंड प्रमाणात 'दिल से' पाठींबा होता पण 'दिमाग से' बहुतेक जण ऑस्ट्रेलियासोबत होते. ह्या तिन्ही संघांचे पाठीराखे आपापल्या संघाच्या विजेतेपदाचं स्वप्न रंगवत होते आणि मग एकामागोमाग एक तिन्ही स्वप्न भंग झाली. स्वप्नभंगाची हॅटट्रीक झाली. उरलं ते एक असं वास्तव, जे बदलण्याचा अजून एक प्रयत्न अयशस्वी ठरला होता. 'ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेतेपदा'चं वास्तव.

हा भावनिक कडेलोट फक्त पाठीराख्यांतच होता, असं नाही. जेव्हा स्टेनसारखा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जीव तोडून गोलंदाजी करत असतानाही टप्पा चुकत होता, जेव्हा सेट झालेल्या शिखर धवनने उतावीळपणे आपली विकेट फेकली, जेव्हा ब्रेंडन मॅक्युलमने नेहमीप्रमाणे पहिल्या चेंडूपासूनच चेंडूला सीमा दाखवण्याच्या प्रयत्नात ऑफ स्टंप गमावला, तेव्हा त्यांचा आपापल्या भावनांवरचा ताबा सुटलेला होता. तर दुसरीकडे पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात जेव्हा वहाब रियाझ तोफगोळे फेकावेत तसे चेंडू टाकत होता, तेव्हा त्याच्यासमोर स्टीव्हन स्मिथ शांतपणे उभा राहिला होता, त्याने कुठलाही आत्मघात केला नाही, भारताविरुद्ध उपांत्य सामन्यांत आपल्या बॅटमधून धावा निघत नाही आहेत, हे दिसत असतानाही आरोन फिंचने संयम सोडून उतावीळपणा केला नाही आणि पॉवरप्लेच्या षटकांत हल्ला होणार आहे, ह्याचा आधीच अंदाज घेऊन जेम्स फॉकनरने सुरुवातच धीम्या गतीच्या चेंडूने करून न्यू झीलंडच्या फलंदाजीला अंतिम सामन्यात घसरगुंडीवर लोटलं; हे व असं बरंच काही ऑस्ट्रेलियन खेळाडू करू शकले कारण इतरांप्रमाणे त्यांच्या मेंदूचा ताबा मनाने घेतलेला नव्हता. ह्या म्हणतात अस्सल व्यावसायिकपणा. आपल्याला काय करायचं आहे, आपली भूमिका काय आहे, लक्ष्य काय आहे ह्यावरच त्यांचं लक्ष पूर्णपणे केंद्रित असणं. दबावाखाली खेळताना हीच बाब सगळ्यात महत्वाची ठरते. Clarity of thoughts.

ह्यामुळेच अंतिम सामन्यात नाणेफेक गमवूनही ऑस्ट्रेलियाच्या खेळावर परिणाम झाला नाही आणि न्यू झीलंडने नाणेफेक जिंकली तरी त्याचा त्यांना फायदा उठवता आला नाही. ३५ व्या षटकांत १५० वर ३ बाद ही एक समाधानकारक धावसंख्या होती. तिथपर्यंत पोहोचवणारे इलियट व टेलर जितका काळ एकत्र होते, तितका काळ वगळता दोन्ही डावांत पूर्णपणे ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. सर्व बाद १८३ ही धावसंख्या १९८३ साली भारताने अंतिम सामन्यात केली होती आणि सामना जिंकला होता. पण तेव्हाचं आणि आजचं एकदिवसीय क्रिकेट ह्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आता इतक्या धावा तर एकटा खेळाडूही बरेचदा करत असतो. ह्या विश्वचषकात तब्बल ३८ शतकं ठोकली गेलीत आणि त्यांपैकी दोन तर द्विशतकं. आजच्या घडीस प्रथम फलंदाजी करताना १८३ धावांत गळपटणं, म्हणजे जवळजवळ आत्महत्याच. त्यात मेलबर्नची खेळपट्टी जराशी मनधरणी केल्यावर ३०० धावा करू देईल इतकी दयाळू होती. तिथे १८४ धावा, त्याही ऑस्ट्रेलियासाठी आणि त्याही चौथा व पाचवा गोलंदाज कमकुवत असलेल्या न्यू झीलंडसमोर किरकोळ होत्या, किरकोळच ठरल्या. ३४ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्टीव्हन स्मिथने विजयाचा चौकार मारला, पण त्या अखेरच्या क्षणासाठी खेळाडूंसकट, प्रेक्षकही खूप आधीपासूनच तयार होते. स्टेडियममध्ये जमलेल्या ९१००० लोकांना आपण विश्वचषकाचा अंतिम सामना पाहतो आहे, असं वाटलंच नसावं कारण व्यावसायिकतेपुढे भावनिकता पूर्णपणे हताश झालेली होती.

संपूर्ण स्पर्धेत, न्यू झीलंडने घराबाहेर खेळलेला हा पहिला सामना होता. ही गोष्ट त्यांच्यावर उलटली. साखळीतील ऑस्ट्रेलियासोबतचा सामनाही त्यांनी घरीच खेळला. ऑस्ट्रेलियाने तो सामना गमावला, पण त्यामुळे जर उपांत्यपूर्व वा उपांत्य मध्ये एखाद-दुसरा सामना त्यांना घराबाहेर खेळायला लागला असता तर ते त्यासाठी थोडे फार तरी तयार असते.

न्यू झीलंडसाठी सहा उपांत्य सामने हरल्यावर मिळालेली अंतिम सामना खेळण्याची पहिली संधी होती. ती त्यांनी गमावली. विश्वविजेतेपद मिळवण्याच्या वाटेवर नेहमीच ऑस्ट्रेलियाचं आव्हान असतं. ते ज्याला पेलवतं, तोच यशस्वी ठरतो. पण खरं सांगायचं तर ह्या आव्हानासाठी न्यू झीलंड तयार असल्यासारखे वाटलेच नाहीत. स्टार्क, जॉन्सनच्या भन्नाट वेगाला उत्तर देण्यासाठी किंवा स्मिथ, क्लार्कला भेदण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीही विशिष्ट नीती दिसली नाही. 'बस्स, जाऊन आपापला नैसर्गिक खेळ खेळा' हे ऑस्ट्रेलियासारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्यासमोर पुरेसं नसतंच. त्याची किंमत आधी पाकिस्तान, नंतर भारत व सगळ्यात शेवटी न्यू झीलंडने मोजली.

मला स्वत:ला अंतिम सामन्याच्या ह्या निकालाबद्दल आश्चर्य वाटत नसलं तरी आनंदही वाटत नाही.
क्रिकेट हा माझ्यासाठी खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन करणारा सर्वोत्कृष्ट सांघिक खेळ आहे. आणि ऑस्ट्रेलिया व खिलाडूवृत्ती हे दोन परस्परविरोधी शब्द आहेत. हा असा संघ आहे की ज्याच्याकडून खिलाडूवृत्तीची अपेक्षा करणंही चूक आहे आणि असा संघ पुन्हा एकदा विश्वविजेता ठरला आहे. त्यांनी उत्तम खेळ केला आहे, मात्र त्या उत्तम खेळाने मिळवलेल्या यशाने त्यांच्यात आलेला उन्मत्तपणा योग्य ठरत नाही.

असो. एक मात्र नक्की की पराभवाच्या दरीत कोसळल्यावर उद्दामपणाच्या उड्या मारणं सुचत नसतं. त्या वेळी आत्मपरीक्षण करून, नियोजनबद्ध आखणी करून आधी दरीतून बाहेर यावं लागतं. तूर्तास न्यू झीलंड, भारत व दक्षिण आफ्रिकेसाठी हेच करणं आवश्यक आहे. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने सेंड ऑफ द्यावेत आणि त्यांनी ते स्वीकारावेत. फक्त उद्या त्यांची परतफेड तशीच करू नये कारण मग त्यांच्यात आणि ऑस्ट्रेलियात फरक राहणार नाही आणि माझ्यासारख्या प्रामाणिक क्रिकेटप्रेमींना ते पाहवणार नाही. विश्वचषक चार वर्षांनी पुन्हा येईल. तो दर चार वर्षांनी येतच राहील. दर चार वर्षांनी विश्वविजेता बदलू शकेल. पण खेळ ह्या सगळ्याच्या वर आहे. तो बदलू नये. क्रिकेटचं फुटबॉल, रग्बी, रेसलिंग होणार असेल तर आम्ही क्रिकेट कुठे शोधायचं ?

ऑस्ट्रेलियाचे मन:पूर्वक अभिनंदन !
न्यू झीलंडला मन भरून शुभेच्छा !

- रणजित पराडकर


ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...