डिस्क्लेमर - ब्रॅड पिट, टॉम क्रुझ, जॉनी डेप्प, वगैरे मान्यवरांनी एकूण मिळून जितके हिंदी सिनेमे पाहिले असतील तितकेच इंग्रजी सिनेमे मी पाहिले आहेत. तरी, सिनेमाच्या उत्तरार्धात 'अयान ठाकूर'च्या व्यवसायाबद्दल उघडणारं रहस्य कळल्यावर असं वाटलं की असा व्यवसाय फक्त अमेरिकेतच (पाश्चात्य भागात) असू शकतो, भारतात नाही. म्हणून कदाचित हा सिनेमा कोण्या इंग्रजी सिनेमाची नक्कल असू शकतो. खरं खोटं कुणास ठाऊक. पण मी हा 'ओरिजिनल' आहे असं समजून लिहितो.....
'इस्ना' (सनी लिओन) - एक 'उच्चभ्रू' वेश्या.
एके रात्री ती 'अयान ठाकूर' (अरुणोदय सिंग) सोबत जाते. रात्रभरात 'कामाची गोष्ट' उरकून झाल्यावर अयान तिला स्वत:ची ओळख करून देतो. तो एका गुप्तचर संस्थेत कार्यरत असतो. ही गुप्तचर संस्था खरोखर 'गुप्त'च असते. देशहितकारक कामं करत असले, तरी तिचे अस्तित्त्व जाणीवपूर्वक गुप्त ठेवण्यात आलेलं असतं. अयान इस्नाला एका कामाची 'ऑफर' देतो. काम तेच जे ती रोज करतेय, फक्त माणूस तो जो अयान सांगेल! पैसे जितके इस्ना मागेल! बास्स... ती तोंड उचकटते - 'दहा करोड!!'............ "डील!!"
ज्या माणसाला फसवायचं असतं, तो असतो 'कबीर विल्सन' (रणदीप हूडा). कबीर कधीकाळी एक तडफदार पोलीस ऑफिसर असतो. पण पोखरलेली व्यवस्था, भ्रष्ट अधिकारी पाहून तो निराश होतो आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. तो एकेक करून सर्व भ्रष्ट व्यक्तींना मारत सुटतो. त्याच्या ह्या 'हिट लिस्ट' मध्ये नेते, अधिकारी, पोलीस, वगैरे सगळे असतात. सहा वर्षांपूर्वी हाच कबीर इस्नाच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो. पण अचानक तो काहीही न सांगता तिला सोडून जातो, गायब होतो आणि आपलं 'सफाई अभियान' सुरू करतो. कबीरने आत्तापर्यंत केलेले घातपात आणि त्याचे पुढचे प्लान्स ह्याची इत्थंभूत माहिती त्याच्या LAPTOP मध्ये असते. ती माहिती मिळवण्यासाठी इस्नाची आणि त्याची भेट घडवून आणून, तिला त्याच्या आयुष्यात परत आणायचा प्लान अयान आणि कं.ने आखलेला असतो.
इस्ना आणि अयान, कबीर राहात असतो त्या 'गॉल' (श्री लंका?)ला एक लग्न न झालेलं (पण ठरलेलं) जोडपं "इस्ना-करण" बनून येतात. पुढे इस्ना कबीरला आपल्या जाळ्यात ओढते आणि त्याच्या मागणीनुसार 'करण' (अयान) ला सोडून त्याच्याशी लग्न करण्यास होकार देते. मात्र, आता परिस्थिती बदललेली असते. अयानही इस्नाचा प्रेमात पडलेला असतो! आता....??
पुढे काय होतं?
अयानला हवी असलेली माहिती मिळते का ?
इस्ना कुणाला मिळते?
कबीरचं काय होतं ?
वगैरे सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देऊन सिनेमा एका वेगळ्याच शेवटावर संपतो.
काही प्रसंगांत थरारक वाटणारा हा सिनेमा काही भागांत रेंगाळतो. सनी लिओन ज्या कामासाठी सिनेमात आहे, ते काम बऱ्यापैकी निभावते. (तरी आंबट शौकीन लोक जर पंच पक्वान्नाचे ताट अपेक्षित करून आले असतील, तर त्यांना फक्त 'स्वीट डिश'च मिळते!) 'अभिनेत्री' सनी लिओन, ती मुळात 'पॉर्न स्टार' का आहे, ह्याचं उत्तर मिळावं इतकी बथ्थड आहे. नवीन चेहरा 'अरुणोदय सिंग' सनी लिओनला दगड म्हणून उत्कृष्ट साथ देतो. संगीत श्रवणीय आहे. 'गॉल' व एकंदरीत श्रीलंका फार सुंदर आहे. संवाद काव्यात्मक आहेत. रणदीप हूडा सिनेमा खिश्यात घालून घरी नेतो! त्याने रंगवलेला 'कबीर' क़ाबिल-ए-तारीफ आहे!
एकंदरीत एकदा पाहावा असा हा जिस्म - २, कुठल्याही इंग्रजी सिनेमाची नक्कल नसल्यास नक्कीच अपेक्षेपेक्षा चांगला आहे.
रेटिंग - * * १/२
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!