Monday, August 06, 2012

भातुकलीचा डाव आपला


एकांताच्या दोन क्षणांचा
परस्परांशी मेळ घालतो
काळवंडल्या मनात माझ्या
रस्ता शोधत धडपड करतो

तुझ्याविना मी जगण्याचीही
कधी कल्पना केली नव्हती
तू नसताना क्षणाक्षणाला
विषण्णतेची येते भरती

लपवुन दु:खे हसायलाही
तूच शिकवले मनास होते
गहिवरतो मी हसता हसता
स्मरते कारण मला नको ते

भातुकलीचा डाव आपला
तसाच अर्धा पडून आहे
खिडक्या दारे भिंतींनाही
तुझीच आशा अजून आहे

खोट्या इच्छा आकांक्षांच्या
नभात कोणी किती उडावे
विझलेल्या डोळ्यांनी माझ्या
सांग दूरचे कसे पहावे ?

....रसप....
६ ऑगस्ट २०१२

1 comment:

  1. वयाच्या तीसर्या वर्षी "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी" हे गाण ऐकलं आणि आई म्हणते की मी त्यावेळीही मी रडले होते....त्याचं गाण्यातलं आर्त मला या कवितेत जाणवलं नकळत डोळे भरले पण ओसंड्ण्या ईतपत निरागसता नाही राहीली आता....
    रणजीत खरोखर तुझ्या कवितेतलं एक आर्त खुप स्पर्श करतं....पण तरीही तुझ्या कवितेत एक अस काही आहे की ते आस टिकवुन ठेवतं काळ्या ढगाला सोनेरी किनार असावी तसं.....

    मला खुप आवडली रचना.....

    अनुजा

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...