आपलं असंच आहे.. आपण क्रिकेटला शिव्या घालतो, 'फिक्सिंग आहे' म्हणतो; पण तरी तमाशा पूर्ण बघतो आणि नंतर जल्लोषही करतो अन लाखोल्याही वाहातो..! 'वासेपूर - १' फारसा 'पटला' नसतानाही 'वासेपूर - २' पाहिला कारण उपरोक्त ! असो.
Story starts from where it stopped last time....
सरदार खान (मनोज वाजपेयी) ला गोळ्या घालून शरीराची चाळण करून ठार मारलं आहे आणि आता सरदारचा मोठा मुलगा 'दानिश' बदल्याच्या भावनेने पेटून उठला आहे. बापाला गोळ्या घालणाऱ्या एकेकाला तो एकेक करून मारतोय.. पण बदला पूर्ण होण्याआधीच त्यालाही मारलं जातं. त्यापेक्षा लहान असलेला सरदार खानचा दुसरा मुलगा फैजल (नावाझुद्दिन सिद्दिकी) चरस-गांज्याच्या नशेडीत पूर्णपणे बुडला आहे. पण नवरा आणि मोठा मुलगा मेल्यावर आई फैजलला फैलावर घेते आणि त्याच्या पौरुषालाच आव्हान देते की, 'खून खोलता नहीं क्या तेरा?'.. फैजलला जाणवतं आणि बाप व भावाचा बदला पूर्ण करीन असं आश्वासन तो आईला देतो. अतिशय क्रूरपणे पहिल्या मारेकऱ्याला मारल्याने फैजलचा वासेपुरात दबदबा निर्माण होतो.. हळूहळू करत तो आपलं साम्राज्य बनवतो. 'लोखंड माफिया' बनतो.
इकडे फैजलच्या बापाचा आणि पर्यायाने फैजलचाही सर्वात मोठा शत्रू 'रमाधीर सिंह' (तीगमांषु धुलिया) फैजलशी तह करतो.
सरदार खानचे पाचही जिवंत मुलगे पहिलीची चार, दुसरीचा एक) रोज सकाळी उठल्यावर एका हातात टमरेल आणि दुसऱ्या हातात बंदुकच घेत असतात. वासेपूर - २ हा ह्या पाच भावांचा गुन्हेगारी प्रवास दाखवणारा सिनेमा आहे. काय-काय होतं, कसं-कसं होतं हे शब्दातीत आहे कारण बरंच काही होतं आणि कसंही होतं! संपूर्ण सिनेमा सी-सॉ किंवा रस्सीखेच सारखा एकदा इथे, एकदा तिथे... जात, नेत राहतो आणि अखेरीस माहित असलेल्या शेवटास पोहोचतो.
पहिला वासेपूर 'सरदार'मय होता आणि हा वासेपूर 'फैजल'मय आहे. सिनेमा संपल्यावर, 'अमुक-अमुक घडलं' ह्यापेक्षा काहीही बोध होत नाही. जे दाखवलं आहे ते भडक वास्तवदर्शी असलं तरी वास्तवदर्शनाचा जो एरव्ही होणारा परिणाम आहे, तो होत नाही.
पण सगळ्यात चांगली आणि वाखाणण्याजोगी बाब ही की, हा जरी 'भाग -२' असला तरी त्याला स्वतंत्र अस्तित्त्व आहे. कुठेही - पहिल्या भागाचा संदर्भ एक-दोन ठिकाणी - येऊनसुद्धा सिनेमा 'प्रेक्षकाने पहिला भाग पाहिला आहे' असं मानून पुढे जातोय असं वाटत नाही.
दुसरी चांगली गोष्ट - नवाझुद्दिन सिद्दिकी. अतिसामान्य शरीरयष्टी असूनही एका बाहुबलीची भूमिका अप्रतिम निभावली आहे. कदाचित त्याच्या व्यक्तिरेखेच्या परिणामकारकतेत त्याच्या चरस-गांजा फुंकण्याचा बराच मोठा वाटा आहे. जरा त्याच्या हातात चिलीम दाखवली नसती तर तो त्या भूमिकेत शोभला नसताच, पण हालचालीतील चापल्य, निस्तेज डोळे आणि अचूक संवादफेक ह्या सगळ्याच्या जोरावर 'अभिनेता नवाझुद्दिन', 'बाहुबली फैजल'वर मात करतो आणि आपली छाप सोडतो.
एकंदरीत, एकदा पाहण्यासारखा हा वासेपूर एका अतिरंजित हिंसक प्रलंबित नाट्याचा एक अपेक्षित शेवट करतो.
रेटिंग - * * १/२
खूप छान परीक्षण रणजीत ! पाहीन दुपारी...! नावाजुद्दिन च्या नावाचा इथे दिल्लीत मात्र जोरदार गवगवा झालाय. हा watchman च काम करायचा अस आमच्या थियेटर ग्रुप मध्ये मला कुणी सांगितले काल. त्याला जसा चान्स मिळालाय तसा आपल्यालाही मिळेल अशी स्वप्न या चित्रपट मुळे इथे सर्वांना पडतायेत..."उठल्यावर एका हातात टमरेल आणि दुसऱ्या हातात बंदुकच घेत असतात" हाहाहा... काय लिहील आहेस.. :))))) Prasanna Joshi
ReplyDelete