Thursday, August 16, 2012

एक दमदार टायगर (Ek Tha Tiger - Review)



वॉन्टेड, दबंग आणि बॉडी गार्ड हे बहुचर्चित सलमानपट मी थेटरात पहिल्या दिवशी पाहिले नव्हते. ह्यापैकी थर्ड रेटेड (म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर लिहिलेला... "बॉडी गार्ड". बाकी काही म्हणायचं नाहीये!) तर अजूनही पाहिला नाहीये. मागे तो 'रद्दड राठोड' पाहिल्याचं प्रायश्चित्त म्हणून 'डीव्हीडीवर लागोपाठ तीन वेळा बॉडी गार्ड पाहीन' अशी प्रतिज्ञा मी केली होती, पण मी स्वत:ला त्रास नाही देऊ शकत! क्या करूँ...? मैं अपना फेवरेट हूँ ! असो... हे सांगण्यास कारण की, असं पातक शिरावर असल्याने मी 'एक था टायगर' नक्की पहिल्या दिवशी बघणार असं आधीपासूनच ठरवलं होतं आणि तसं केलं.
कबीर खान चा 'काबुल एक्स्प्रेस' आवडला होता आणि ट्रेलर्स वरून 'टायगर' सुद्धा चांगला वाटला होता म्हणून हिंमत केली आणि खरंच सांगतो, निराशा झाली नाही!!

ट्रेलर्समधून कहाणी पुरेशी समजून आलेली असेलच, तरी -
'टायगर' (सलमान) RAW चा एक अफलातून, तडफदार 'एजंट' असतो. देश विदेशांत अनेक मोहिमा त्याने फत्ते केल्या असतात. अर्थातच RAW चीफ शेणॉय (गिरीश कर्नाड) ह्यांचा तो हुकुमाचा एक्का असतो. सिनेमाची सुरुवात होते इराकमध्ये. एक भारतीय गुप्तहेर, पैश्यांखातर पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI ला फितूर झाला असतो. त्याला जिवंत परत आणण्यासाठी किंवा त्याचा खातमा करण्यासाठी टायगर तिथे येतो आणि चित्रित केलेला थरार थेटर दुमदुमेपर्यंत शिट्या घेतो..! - पहिला सलाम.

जराही विश्रांती न घेता, एका मोहिमेनंतर दुसरी मोहीम आवडीने करणाऱ्या टायगरसाठी भारतात परतेपर्यंत पुढची मोहीम तयारच असते.
भारतासाठी ॲन्टी मिसाईल तंत्रज्ञान विकसित करणारे शास्त्रज्ञ 'हमीद किडवाई' (रोशन सेठ) सध्या आयर्लंड मध्ये असतात. RAW ला असा संशय असतो की ते काही गुप्त माहिती पाकिस्तानला देत आहेत. किडवाई वर नजर ठेवून सत्य शोधून काढण्यासाठी टायगरला पाठवले जाते. त्याला मदत करण्यासाठी इथे 'गोपी' (रणवीर शौरी) हा अजून एक RAW एजंट तैनात असतो. किडवाई 'झोया' (कतरिना) सोबत राहात असतात. त्यांच्या जवळ पोहोचण्यासाठी टायगर झोयाशी जवळीक वाढवतो आणि नंतर खरोखरच तिच्या प्रेमात पडतो. चाणाक्ष प्रेक्षकाला लगेच समजून येते की झोया पाकिस्तानी गुप्तहेर आहे. ही मोहीम कशीबशी पूर्ण करून टायगर भारतात परततो. पण झोयाला विसरू शकत नाही. पुढे, इस्तांबुलमध्ये होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय बैठकीतील पाकिस्तानी शिष्टमंडळात झोया आहे, असे समजल्यावर टायगरदेखील तिथे येतो आणि झोया-टायगर कर्तव्यापेक्षा प्रेमाला महत्त्व देऊन, बुद्धीपेक्षा मनाचे ऐकून, फरार होतात.
 
मग काय होतं ?
त्यांचं प्रेम यशस्वी होतं का?
ISI व RAW झोया-टायगर विरुद्ध काय कारवाई करतात ?
टायगरचं खरं नाव काय ? (अगदी शेवटून दुसऱ्या प्रसंगात त्याचं खरं नाव कळतं! - दुसरा सलाम!)

ह्या प्रश्नांची उत्तरं मी देणार नाही. पण जरी (खाजगीत) दिली, तरी सिनेमा चुकवू नये असाच!
प्रेम कहाणी असूनही सिनेमा कुठेही कंटाळवाणी धीमी गती घेत नाही. थरार संपत नाही. कहाणीतील लहान मोठे धक्के उत्कंठा जिवंत ठेवतात. मारामाऱ्या, पाठलाग, उंच-लाब उड्या वगैरे सगळं अचाट असलं तरी काहीच्या काही अतर्क्य नसून अत्यंत सफाईदार चित्रण केल्याने दाद घेतं! संगीतकार जोडगोळी साजीद-वाजीदला फारसा वाव न दिल्याने डोकंही फारसं उठत नाही.
कबीर खान जे सांगायचं आहे ते फाफटपसारा न करता, थोडक्यात सांगतो. सिनेमाचा शेवट हकनाक भावनिक कडेलोट केलेला नसल्याने बऱ्यापैकी 'जस्टीफाईड' वाटतो.    
सलमान-कतरिना केमिस्ट्री मजा आणते. कतरिनाने चक्क चांगला अभिनय वगैरे केला आहे. ॲक्शन दृष्यांत तिने दाखवलेले कसब उत्कृष्टच ! - तिसरा सलाम.
सलमानबाबत बऱ्याच विचारांती मी एका निकषावर पोहोचलो आहे. सिनेमाच्या पडद्यावर वावरण्याचे तीन प्रकार असतात -
१. चांगला अभिनय करणे
२. वाईट अभिनय करणे (अभिनय न करणे, हे पण वाईट अभिनयातच समाविष्ट)
३. सलमान बनणे
सलमान अभिनय करतो किंवा करत नाही, असं काहीही म्हणणं म्हणजे अभिनय व सलमान दोघांवर अन्याय आहे. सुरुवातीच्या काळात त्याने अभिनेता बनायचा प्रामाणिक प्रयत्न केला असावा. 'हम दिल दे चुके सनम' त्याच्या प्रयत्नांची परिसीमा होता. पण नंतर सलमान वेळीच सावरला आणि त्याने आपलीच एक category बनवली.. तो 'हीरो' बनला, अभिनेता नाही. फक्त 'हीरो' म्हणता येईल असा एकही 'अभिनेता' (म्हणजे 'चित्रपटात काम करणारा' ह्या अर्थी) सद्य स्थितीला माझ्या तरी नजरेत नाही. - चौथा सलाम.

थोडक्यात, इतर सलमानपटांप्रमाणेच मनोरंजनाने भरलेला पण दर्ज्यावरही तरलेला 'टायगर' एक 'मस्ट वॉच'च आहे! (पैसे देऊन परत बघणार नाही, पण कुणी स्पॉन्सर मिळाल्यास मी परत एकदा सव्वा दोन तास खर्ची घालण्यास तयार आहे!)

रेटिंग - * * * १/२


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...