एखादी कलाकृती निर्मित केल्यावर स्वत: कलाकारच त्या कलाकृतीच्या प्रेमात पडतो, तिच्या परिपूर्णतेने/ सौंदर्याने भारावून जातो आणि अचंबित होऊन विचार करतो की, "हे मीच बनवलं आहे?".. किंचित अभिमानाने वारंवार स्वत:च स्वत:ची पाठही थोपटतो. असंही वाटतं की, "बनवावं तर असंच, नाही तर काही करूच नये!"
अगणित कलाकृती निर्मित करणारा तो सगळ्यात मोठा कलाकार, जो कुठे आहे कुणालाच माहित नाही; पण त्याचं अस्तित्त्व अश्याच अफलातून कलाकृतींमधून जाणवत राहतं, तो विधाताही आपल्या काही निर्मितींच्या अश्याच प्रकारे प्रेमात पडला असावा; असं काहीसं मला काही व्यक्तींबाबत विचार केल्यावर बरेचदा वाटतं. अशीच एक व्यक्ती म्हणजे - 'आभासकुमार गांगुली' अर्थात ' किशोर कुमार'!
मी कुणी चित्रपट समीक्षक नाही, त्यामुळे मला 'आतल्या गोष्टी', किस्से-कहाण्या माहित नाहीत. मला एकच माहित आहे की, नाकातून शेंबूड वाहतो आहे हे जेव्हा मला कळायला लागलं त्या वयापासून मी किशोरचा भक्त आहे.... तो आजतागायत, जेव्हा डोळ्यातून पाणी वाहते आहे, हे कळेनासं होईपर्यंत दुनिया पाहून झाली आहे.
आज त्या माझ्या देवाचा ८३ वा वाढदिवस !
असं काय खास होतं त्याच्यात ?
फार जबरदस्त गायकी होती ? - नाही.
फार भारदस्त व्यक्तीमत्त्व होतं ? - नाही.
फार असामान्य अभिनयगुण होते ? - नाही..
फार अफलातून सौंदर्य होतं ? - नाही..
मग ?
हीच तर खासियत होती! गायन, अभिनय, लेखन, संगीत, दिग्दर्शन, निर्मिती, गीतलेखन सगळंच त्याने केलं आहे. आणि प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला. गायक किशोरकुमारचा ठसा सगळ्यात ठळक उमटला. नव्हे.. त्याच्या आवाजाने हृदयावर एकेक भावना कोरून ठेवली. त्याचा आवाज कुणाला शोभला नाही? अमिताभ, राजेश खन्ना, देव आनंद सारख्या सुपरस्टार्सपासून अमोल पालेकर, ऋषी कपूर सारख्या 'बॉय नेक्स्ट डोअर' नटांपासून ते अगदी गेलाबाजार अनिल धवन, फिरोज खान, राकेश रोशन पर्यंत प्रत्येकाच्या पडद्यावरील अस्तित्त्वाला जिवंतपणा देणारा आवाज किशोरचा होता. महान गायक अनेक झाले, आहेत. पण प्रत्येकाचा आवाज (मला तरी) कुणा ना कुणासाठी विजोड वाटला आहे; इथेच किशोर कुमार सगळ्यात वेगळा आहे.
सचिन तेंडूलकरच्या शतकांची गणती करताना एकदा एक समालोचक म्हणाला होता की, 'ह्याची जितकी शतकं ठोकून झाली आहेत, तितके सामनेही खेळायला मिळाले तरी कुणाचंही आयुष्य सार्थकी लागेल!'; तसंच 'किशोरची जितकी गाणी मनात घर करून आहेत, तितकी एकूण गाणीही कुणा गायकाला मिळाली तरी आयुष्य सार्थकी लागावं!'
आज असं वाटतंय की, बरं झालं... बरं झालं.. १३ ऑक्टोबर १९८७ पर्यंत मला फारशी समज आली नव्हती.. समजायला लागल्यापासून हेच समजलं की 'किशोर नाहीये'. नाही तर त्याच्या जाण्याच्या दु:खाने मन पोखरून ठेवलं असतं आणि ती पोकळी कधीच भरून निघाली नसती. बरं झालं.... मला तेव्हा काहीच समजत नव्हतं. म्हणूनच आजही, तो नसतानाही मला असं वाटतच नाही की तो नाहीये..
हॅप्पी बर्थडे किशोरदा.........
तेरा मुझसे हैं पहले का नाता कोई..
यूं ही नहीं दिल लुभाता कोई....
किशोर दांचा तू खूप मोठा चाहता आहेस!
ReplyDeleteखूप सहज आणि मनापासून लिहिला आहेस!
:-)किशोर दांचा तू खूप मोठा चाहता आहेस!
खूप सहज शैलीत आणि मनापासून लिहिला आहेस!
तुझं लिखाण वाचून झालं कि, तुला THANK YOU म्हणावसं वाटतं, कि बाबारे आज काहीतरी चांगलं वाचायला मिळालं!
SO Thanks a lot for this article!
:-)
Anaggha