Thursday, August 30, 2012

आज पुन्हा उशीर झाला.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स!)


आज पुन्हा उशीर झाला..
'लौकर येतो' सांगूनही
आणि तुझे डोळे भरले
बरंच काही सांडूनही..

काळ्याभोर डोळ्यांचं डबडबणं
मला थबथबलेल्या चिंचेच्या झाडामधून
डोकावणाऱ्या झाकोळलेल्या चंद्रासारखं वाटतं
आणि आत्ताच बरसून रितं झालेलं आभाळ
फिरून पुन्हा एकदा
माझ्या डोळ्यांत दाटतं....

तुला माहितेय..
मला रडता येत नाही..
म्हणून मी सगळं हसण्यावारी नेतो...
तुझी शप्पथ राणी,
पुढच्या वेळी नक्की लौकर येतो..

तू चिडू नकोस
कारण तू चिडलीस की तूच रडतेस
मला झाकोळलेला चंद्र
पाहवत नाही..
आणि भरल्या डोळ्यांनी नीट
'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स'
पण म्हणवत नाही !

....रसप....
२९ ऑगस्ट २०१२
गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!  

Sunday, August 26, 2012

निरोप द्यावा.... (श्रद्धांजली - ए. के. हनगल R.I.P. A K Hangal)


किती जणांनी समोर माझ्या
अर्ध्यावरती डाव सोडला
अखेरच्या वळणावरती मी
परिस्थितीचा घाव सोसला

मीच अडकलो घरात माझ्या
धडपड केली सुटकेसाठी
मदतीच्या हातांनी माझे
श्वास वाढले घटिकेसाठी

सर्वाधिक वजनाचे ओझे
कुठले असते खांद्यावरती ?
मीच जाणले - 'आयुष्यच ते'
श्वासामागुन श्वास वाढती..!

दुर्दैवी अन खडतर जीवन
कधीच नव्हते नको वाटले
झळा वर्तमानाच्या लागुन
पाणी डोळ्यांतले आटले

अखेर झाली माझी सुटका
शेवटचा हा सलाम घ्यावा
धडपडणारा कलाकार मी
मंचावरुनी निरोप द्यावा....


....रसप....
२६ ऑगस्ट २०१२
श्रद्धांजली - ए. के. हनगल


रोजची रात्र अशीच असते.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!)

तापलेल्या मातीत
पहिल्या पावसाचा पहिला थेंब पडल्यावर
झटक्यासरशी आसमंत व्यापणाऱ्या मृद्गंधासारखी
संध्याकाळ गडद होत जाते आणि
दिवसभर वेगवेगळ्या छटा दाखवणारं आभाळ
एकच निकोप, निष्कलंक काळा रंग लेऊन
किंचित लाजऱ्या चंद्राला
माझ्या खिडकीजवळ
तुझा 'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स'चा निरोप देण्यासाठी पाठवते....

रोजची रात्र अशीच असते..
किंचित रेंगाळलेली
तुझ्या आभासांचा सुगंध होऊन
निकोप दरवळलेली..

....रसप....
२५ ऑगस्ट २०१२

गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!  

Saturday, August 25, 2012

शिरीन फरहाद की विजोड जोडी (Shirin Farhad ki to nikal padi - Review)

"प्यार की कोई 'एक्सपायरी डेट' नहीं होती." - असं एका दृश्यात जेव्हा बोमन इराणी म्हणतो तेव्हा म्हणावंसं वाटतं की "लेकीन, 'मॅन्युफॅक्चरिंग डेट' तो होती हैं ना ?" नक्कीच असते. किमान त्या-त्या वयात होणाऱ्या प्रेमाची जातकुळी तरी वेगळी असतेच आणि इथेच 'शिरीन-फरहाद..' कमी पडला. वयाची चाळीशी ओलांडलेल्या दोन अविवाहितांच्या भावविश्वास दाखविताना जरी एक हलका-फुलका सिनेमा बनवायचा दृष्टीकोन ठेवला असला, तरी केवळ एका दृश्याचा अपवाद वगळता - त्यातही सौजन्य, बोमन इराणी - कुठेच सिनेमा अपेक्षित भावनिक उंची गाठत नाही.

'फरहाद पस्ताकीया' (बोमन इराणी) एक ४५ वर्षांचा अविवाहित पारशी 'मुलगा', आई नर्गिस (हनी इराणी) आणि आजीसोबत राहात असतो. एका ब्रा-पँटी च्या शो-रूम मध्ये सेल्समनची नोकरी करणारा फरहाद खूप सरळसाधा असतो. त्याच्या लग्न न होण्यामागे त्याची ही 'भुक्कड' नोकरीही कारणीभूत असते. शेकडो मुली बघूनही त्याला त्याच्या नोकरीमुळे कुणी पसंत करत नसते. पण फरहाद आपल्या नोकरीशी प्रामाणिक असतो.
दुसरीकडे, 'शिरीन फुग्गावाला' (फराह खान) पारसी ट्रस्ट ची सचिव असते. पस्ताकीयांच्या घरात लावलेल्या बेकायदेशीर पाण्याच्या टाकीबद्दल ती नोटीस बजावते आणि फरहादच्या वडिलांनी २५ वर्षांपूर्वी बसवलेली ती टाकी पाडते.
शिरीन-फरहाद ची पहिली भेट शो-रूममध्ये झालेली असते आणि ती त्याला पहिल्या नजरेतच आवडलेली असते. टाकी पाडली, म्हणून नर्गिसचा शिरीनवर असलेला राग, फरहाद शिरीनला घरी घेऊन येतो तेव्हा शिरीनने 'त्या टाकीवाल्या बिनडोक बाईला' अनावधानाने घातलेल्या शिव्यांमुळे अजूनच वाढतो आणि ती फरहाद-शिरीनच्या लग्नाला साफ नकार देते.
लेकीन, प्यार को कौन रोक सकता हैं?? पुढची स्टोरी सांगायची आवश्यकता नसावी.

बाकी सर्व ठीक आहे, पण ही कहाणी प्रमुख व्यक्तिरेखांच्या वयाशी न्याय करत नाही. हे जे काही होतं, ते होण्यासाठी हिरो-हिरोईन २६-२७ वर्षांचेही चालले असते की ! - असो.
बोमन-फराह जोडी म्हणजे एका बाजूने ग्लेन मॅकग्रा आणि दुसऱ्या बाजूने जोगिंदर शर्मा ने गोलंदाजी करावी इतकी विजोड वाटते. फराह खान इंडिअन आयडॉलच्या परीक्षकाच्या खुर्चीत बसल्यासारखी त्याच टिपिकल एका सुरात संवाद 'फेकते'. दिसते चांगली आणि मध्यमवर्गीय पारसी स्त्री म्हणून शोभतेही पण पहिल्यापासून शेवटपर्यंत एकदाही तिच्यात 'फराह खान' सोडून इतर कुठल्याही व्यक्तिरेखेचा आभासही होत नाही, 'शिरीन'सुद्धा नाही. तिची कमजोरी बोमन इराणी च्या 'Flawless' अदाकारीसमोर जास्तच प्रकर्षाने जाणवते.
सिनेमाच्या उत्तरार्धात दोघांत होणारं भांडण आणि अगदी शेवटी फरहादला पोलिसांनी पकडणं वगैरे तर कृत्रिम नाट्यनिर्मितीचा साफ फसलेला प्रयोग आहे. कारण ह्या घडलेल्या रामायणांचा  'फॉलोअप' दृश्यांत काही संदर्भच येत नाही!
संगीतकार जीत गांगुली चे काम कर्णमधूर आहे. खासकरून 'कुकूडूकू' आणि 'राम्भा मे सांबा' ही गाणी छान जमली आहेत.

एकंदरीत, बासू चटर्जी वाल्या पारसी सिनेमांच्या समोर ह्या सिनेमाला ठेवणार असाल तर घरात बसूनसुद्धा पाहू नका. पण पुढे-मागे टीव्हीवर जेव्हा हा सिनेमा येईल, तेव्हा अगदीच काही बघण्यासारखं नसेल, तर त्या दाक्षिणात्य डब्डं सिनेमांपेक्षा निश्चितच सरस मनोरंजन आहे!

रेटिंग - * *

Tuesday, August 21, 2012

माझ्या त्या साऱ्या कविता....

'मराठी कविता समूहा'च्या 'ओळीवरून कविता - भाग ९९' मधील माझा सहभाग -

आठवती का सांग तुला मी लिहिलेल्या पहिल्या ओळी ?
नकळत सुचली होती कविता अगदी साधी अन भोळी
तीच जी तुझ्या अजून दिसते गालावरच्या खळीतुनी
डोळ्यांतुन चमचम करते वा रुळून हसते बटीतुनी

हरकत नाही, विसरुन जा तू पहिली कविता अल्लडशी
पन्नासावी आठवते का जमली होती फक्कडशी ?
तुझ्या चालण्याची लय होती धीमी पण दिलखेच अशी
तुझ्याप्रमाणे नटली सजली तुझी हुबेहुब छबी जशी

नाही ना? मज ठाऊक होते नाही आठवणार तुला..
गंध स्वत:चा किती पसरला कळतच नसते कधी फुलां

वाहत होती अखंड सरिता कवितांची झुळझुळणारी
कधी तुझ्या निर्व्याज हसूसम उथळ तरी खळखळणारी
आता केवळ पात्र कोरडे आटुन गेली ती सरिता
आज तुला मी अर्पण करतो माझ्या त्या साऱ्या कविता....

............... आज तुला मी अर्पण करतो
............... माझ्या त्या साऱ्या कविता....

....रसप....
२० ऑगस्ट २०१२

Sunday, August 19, 2012

तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही..


पाउलवाटेवर माझ्या माझीच सावली असते
माझीच पापणी ओली माझ्या डोळ्यांना दिसते
तू हात पुढे केला पण मी वळुन बघितले नाही
तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही

जो रोज साथ देतो तो एकांत हवासा वाटे
मी घड्याळ माझ्यापुरते थांबवतो अडवुन काटे
तू शब्दावरती एका अडल्याचे कळले नाही
तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही

बाळगले उरात होते काहूर कधीकाळी जे
अन आज सजवले आहे तू खुद्द तुझ्या भाळी जे
ते दारावरून गेले पण मी थोपवले नाही
तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही

अस्तित्त्वाच्या अंताची ओढ्याला चिंता नसते
निर्बुद्ध वाहिल्यानंतर त्याचीही सरिता बनते
तू माझी सरिता व्हावे, हे भाग्य लाभले नाही
तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही


....रसप....
१९ ऑगस्ट २०१२

Friday, August 17, 2012

दिलासा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!)


६.
ऐकू येतो मला माझा
एकेक ठोका काळजाचा
जसा टिक टिक करत चालत राहातो
घड्याळ्यात काटा सेकंदाचा

हा माझा एकांत आहे,
रितेपण नाही
मी एकटा आहे,
एकांकी नाही

मला फार आवडतो
हा संध्याकाळ ते रात्र असा वेळेचा प्रवास
कारण सतत तू सोबत असल्याची जाणीव होत असते
मी बराच वेळ गप्पा मारतो तुझ्याशी
पण तू उत्तर देत नाहीस
मग मनाला आपोआप कळून येतं
तू दिसतेस, पण असत नाहीस

असते फक्त एक दिशा...
आणि एक विश्वास की,
ह्या बाजूला... पुढे.... काही अज्ञात मैलांवर...
तूही अशीच बोलतेयस माझ्याशी...
मनातल्या मनात..!

मग मऊ स्वप्नांची उबदार शाल ओढून
ज्या दिशेला तू आहेस..
त्या कुशीवर मी वळतो..
आणि समाधानाने डोळे मिटून..
स्वत:शीच हसतो..
तेव्हढाच मनाला दिलासा
तुला 'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स' म्हटल्याचा !

.... रसप....
१७ ऑगस्ट २०१२
गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !! 

Thursday, August 16, 2012

एक दमदार टायगर (Ek Tha Tiger - Review)



वॉन्टेड, दबंग आणि बॉडी गार्ड हे बहुचर्चित सलमानपट मी थेटरात पहिल्या दिवशी पाहिले नव्हते. ह्यापैकी थर्ड रेटेड (म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर लिहिलेला... "बॉडी गार्ड". बाकी काही म्हणायचं नाहीये!) तर अजूनही पाहिला नाहीये. मागे तो 'रद्दड राठोड' पाहिल्याचं प्रायश्चित्त म्हणून 'डीव्हीडीवर लागोपाठ तीन वेळा बॉडी गार्ड पाहीन' अशी प्रतिज्ञा मी केली होती, पण मी स्वत:ला त्रास नाही देऊ शकत! क्या करूँ...? मैं अपना फेवरेट हूँ ! असो... हे सांगण्यास कारण की, असं पातक शिरावर असल्याने मी 'एक था टायगर' नक्की पहिल्या दिवशी बघणार असं आधीपासूनच ठरवलं होतं आणि तसं केलं.
कबीर खान चा 'काबुल एक्स्प्रेस' आवडला होता आणि ट्रेलर्स वरून 'टायगर' सुद्धा चांगला वाटला होता म्हणून हिंमत केली आणि खरंच सांगतो, निराशा झाली नाही!!

ट्रेलर्समधून कहाणी पुरेशी समजून आलेली असेलच, तरी -
'टायगर' (सलमान) RAW चा एक अफलातून, तडफदार 'एजंट' असतो. देश विदेशांत अनेक मोहिमा त्याने फत्ते केल्या असतात. अर्थातच RAW चीफ शेणॉय (गिरीश कर्नाड) ह्यांचा तो हुकुमाचा एक्का असतो. सिनेमाची सुरुवात होते इराकमध्ये. एक भारतीय गुप्तहेर, पैश्यांखातर पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI ला फितूर झाला असतो. त्याला जिवंत परत आणण्यासाठी किंवा त्याचा खातमा करण्यासाठी टायगर तिथे येतो आणि चित्रित केलेला थरार थेटर दुमदुमेपर्यंत शिट्या घेतो..! - पहिला सलाम.

जराही विश्रांती न घेता, एका मोहिमेनंतर दुसरी मोहीम आवडीने करणाऱ्या टायगरसाठी भारतात परतेपर्यंत पुढची मोहीम तयारच असते.
भारतासाठी ॲन्टी मिसाईल तंत्रज्ञान विकसित करणारे शास्त्रज्ञ 'हमीद किडवाई' (रोशन सेठ) सध्या आयर्लंड मध्ये असतात. RAW ला असा संशय असतो की ते काही गुप्त माहिती पाकिस्तानला देत आहेत. किडवाई वर नजर ठेवून सत्य शोधून काढण्यासाठी टायगरला पाठवले जाते. त्याला मदत करण्यासाठी इथे 'गोपी' (रणवीर शौरी) हा अजून एक RAW एजंट तैनात असतो. किडवाई 'झोया' (कतरिना) सोबत राहात असतात. त्यांच्या जवळ पोहोचण्यासाठी टायगर झोयाशी जवळीक वाढवतो आणि नंतर खरोखरच तिच्या प्रेमात पडतो. चाणाक्ष प्रेक्षकाला लगेच समजून येते की झोया पाकिस्तानी गुप्तहेर आहे. ही मोहीम कशीबशी पूर्ण करून टायगर भारतात परततो. पण झोयाला विसरू शकत नाही. पुढे, इस्तांबुलमध्ये होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय बैठकीतील पाकिस्तानी शिष्टमंडळात झोया आहे, असे समजल्यावर टायगरदेखील तिथे येतो आणि झोया-टायगर कर्तव्यापेक्षा प्रेमाला महत्त्व देऊन, बुद्धीपेक्षा मनाचे ऐकून, फरार होतात.
 
मग काय होतं ?
त्यांचं प्रेम यशस्वी होतं का?
ISI व RAW झोया-टायगर विरुद्ध काय कारवाई करतात ?
टायगरचं खरं नाव काय ? (अगदी शेवटून दुसऱ्या प्रसंगात त्याचं खरं नाव कळतं! - दुसरा सलाम!)

ह्या प्रश्नांची उत्तरं मी देणार नाही. पण जरी (खाजगीत) दिली, तरी सिनेमा चुकवू नये असाच!
प्रेम कहाणी असूनही सिनेमा कुठेही कंटाळवाणी धीमी गती घेत नाही. थरार संपत नाही. कहाणीतील लहान मोठे धक्के उत्कंठा जिवंत ठेवतात. मारामाऱ्या, पाठलाग, उंच-लाब उड्या वगैरे सगळं अचाट असलं तरी काहीच्या काही अतर्क्य नसून अत्यंत सफाईदार चित्रण केल्याने दाद घेतं! संगीतकार जोडगोळी साजीद-वाजीदला फारसा वाव न दिल्याने डोकंही फारसं उठत नाही.
कबीर खान जे सांगायचं आहे ते फाफटपसारा न करता, थोडक्यात सांगतो. सिनेमाचा शेवट हकनाक भावनिक कडेलोट केलेला नसल्याने बऱ्यापैकी 'जस्टीफाईड' वाटतो.    
सलमान-कतरिना केमिस्ट्री मजा आणते. कतरिनाने चक्क चांगला अभिनय वगैरे केला आहे. ॲक्शन दृष्यांत तिने दाखवलेले कसब उत्कृष्टच ! - तिसरा सलाम.
सलमानबाबत बऱ्याच विचारांती मी एका निकषावर पोहोचलो आहे. सिनेमाच्या पडद्यावर वावरण्याचे तीन प्रकार असतात -
१. चांगला अभिनय करणे
२. वाईट अभिनय करणे (अभिनय न करणे, हे पण वाईट अभिनयातच समाविष्ट)
३. सलमान बनणे
सलमान अभिनय करतो किंवा करत नाही, असं काहीही म्हणणं म्हणजे अभिनय व सलमान दोघांवर अन्याय आहे. सुरुवातीच्या काळात त्याने अभिनेता बनायचा प्रामाणिक प्रयत्न केला असावा. 'हम दिल दे चुके सनम' त्याच्या प्रयत्नांची परिसीमा होता. पण नंतर सलमान वेळीच सावरला आणि त्याने आपलीच एक category बनवली.. तो 'हीरो' बनला, अभिनेता नाही. फक्त 'हीरो' म्हणता येईल असा एकही 'अभिनेता' (म्हणजे 'चित्रपटात काम करणारा' ह्या अर्थी) सद्य स्थितीला माझ्या तरी नजरेत नाही. - चौथा सलाम.

थोडक्यात, इतर सलमानपटांप्रमाणेच मनोरंजनाने भरलेला पण दर्ज्यावरही तरलेला 'टायगर' एक 'मस्ट वॉच'च आहे! (पैसे देऊन परत बघणार नाही, पण कुणी स्पॉन्सर मिळाल्यास मी परत एकदा सव्वा दोन तास खर्ची घालण्यास तयार आहे!)

रेटिंग - * * * १/२


Wednesday, August 15, 2012

एक तारा लुकलुकणारा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!)


एक तारा लुकलुकणारा
आणि वारा दरवळणारा
खिडकीत जरा येऊन बघ

तारा माझा भास देईल
वारा तुझा श्वास होईल
स्वत:मध्ये हरवून बघ

मन मनात गाणं गाईल
चेहऱ्यावरती हसू येईल
हसता हसता लाजून बघ

वारा खिडकीशी रेंगाळेल
तारा तुझ्यावरती भाळेल
'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स' म्हणून बघ....!!

....रसप....
१४ ऑगस्ट २०१२

Tuesday, August 14, 2012

रातराणीचा सुगंध.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!)


४.
रातराणीचा सुगंध वेचायला
रात्र तरुण होते
आणि तुझी हळवी आठवण
मनात भरून येते...

गुलाबी थंडीत
तुझ्या आठवणींची उब मिळते
आणि पाठ फिरवलेल्या स्वप्नाची कूस
माझ्या बाजूला वळते !

खिडकीतून आत येणारं चांदणं
हातात तुझा हात देतं
एक सुगंधी स्वप्न मला
तुझ्या समीप घेऊन येतं..

एक हात चांदण्याचा
तुझ्याकडे आहे पाठवला
"गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!"
इतकंच तुला म्हणायला..

....रसप....
१३ ऑगस्ट २०१२
गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!

Monday, August 13, 2012

कैद सरल्यासारखा ! (हझल)


'मराठी कविता समूहा'च्या 'अशी जगावी गझल - भाग २०' च्या निमित्ताने अनेक दिवसांनंतर 'गझले'च्या वाटेला जायचा प्रयत्न केला आहे. पण 'हझल' झाली (बहुतेक!!).

मला मी भासतो जाळ्यात फसल्यासारखा
शिकारी बायको अन मी अडकल्यासारखा

जिथे जावे तिथे दिसतात चिकणे चेहरे
अताशा चालतो डोळेच नसल्यासारखा

जरी कॉलेजमध्ये चालली माझी मुले
तरी उंडारतो मिसरूड फुटल्यासारखा

स्वत:च्या बायकोला मी समजतो माधुरी
तिच्याशी वागतो 'श्रीराम'* असल्यासारखा

सुना येता घरी मग बायको सासू बने
'जितू' निश्वास घेतो कैद सरल्यासारखा

-----------------------------------------------

कधी रिमझिम असे श्रावण कधी भुरभुर असे
कसा यंदा दिसे हा बाळ मुतल्यासारखा !

....रसप....
१२ ऑगस्ट २०१२

श्रीराम = नेन्यांचा हो! (डॉ. श्रीराम नेने - तोच तो ज्याने माधुरीला पळवलं !!)

Sunday, August 12, 2012

धांय धांय वासेपूर - २ (Gangs of Wasseypur 2 - Review)


आपलं असंच आहे.. आपण क्रिकेटला शिव्या घालतो, 'फिक्सिंग आहे' म्हणतो; पण तरी तमाशा पूर्ण बघतो आणि नंतर जल्लोषही करतो अन लाखोल्याही वाहातो..! 'वासेपूर - १' फारसा 'पटला' नसतानाही 'वासेपूर - २' पाहिला कारण उपरोक्त ! असो.

Story starts from where it stopped last time....
सरदार खान (मनोज वाजपेयी) ला गोळ्या घालून शरीराची चाळण करून ठार मारलं आहे आणि आता सरदारचा मोठा मुलगा 'दानिश' बदल्याच्या भावनेने पेटून उठला आहे. बापाला गोळ्या घालणाऱ्या एकेकाला तो एकेक करून मारतोय.. पण बदला पूर्ण होण्याआधीच त्यालाही मारलं जातं. त्यापेक्षा लहान असलेला सरदार खानचा दुसरा मुलगा फैजल (नावाझुद्दिन सिद्दिकी) चरस-गांज्याच्या नशेडीत पूर्णपणे बुडला आहे. पण नवरा आणि मोठा मुलगा मेल्यावर आई फैजलला फैलावर घेते आणि त्याच्या पौरुषालाच आव्हान देते की, 'खून खोलता नहीं क्या तेरा?'.. फैजलला जाणवतं आणि बाप व भावाचा बदला पूर्ण करीन असं आश्वासन तो आईला देतो. अतिशय क्रूरपणे पहिल्या मारेकऱ्याला मारल्याने फैजलचा वासेपुरात दबदबा निर्माण होतो.. हळूहळू करत तो आपलं साम्राज्य बनवतो. 'लोखंड माफिया' बनतो.
इकडे फैजलच्या बापाचा आणि पर्यायाने फैजलचाही सर्वात मोठा शत्रू 'रमाधीर सिंह' (तीगमांषु धुलिया) फैजलशी तह करतो.
सरदार खानचे पाचही जिवंत मुलगे पहिलीची चार, दुसरीचा एक) रोज सकाळी उठल्यावर एका हातात टमरेल आणि दुसऱ्या हातात बंदुकच घेत असतात. वासेपूर - २ हा ह्या पाच भावांचा गुन्हेगारी प्रवास दाखवणारा सिनेमा आहे. काय-काय होतं, कसं-कसं होतं हे शब्दातीत आहे कारण बरंच काही होतं आणि कसंही होतं! संपूर्ण सिनेमा सी-सॉ किंवा रस्सीखेच सारखा एकदा इथे, एकदा तिथे... जात, नेत राहतो आणि अखेरीस माहित असलेल्या शेवटास पोहोचतो.

पहिला वासेपूर 'सरदार'मय होता आणि हा वासेपूर 'फैजल'मय आहे. सिनेमा संपल्यावर, 'अमुक-अमुक घडलं' ह्यापेक्षा काहीही बोध होत नाही. जे दाखवलं आहे ते भडक वास्तवदर्शी असलं तरी वास्तवदर्शनाचा जो एरव्ही होणारा परिणाम आहे, तो होत नाही.

पण सगळ्यात चांगली आणि वाखाणण्याजोगी बाब ही की, हा जरी 'भाग -२' असला तरी त्याला स्वतंत्र अस्तित्त्व आहे. कुठेही - पहिल्या भागाचा संदर्भ एक-दोन ठिकाणी - येऊनसुद्धा सिनेमा 'प्रेक्षकाने पहिला भाग पाहिला आहे' असं मानून पुढे जातोय असं वाटत नाही.
दुसरी चांगली गोष्ट - नवाझुद्दिन सिद्दिकी. अतिसामान्य शरीरयष्टी असूनही एका बाहुबलीची भूमिका अप्रतिम निभावली आहे. कदाचित त्याच्या व्यक्तिरेखेच्या परिणामकारकतेत त्याच्या चरस-गांजा फुंकण्याचा बराच मोठा वाटा आहे. जरा त्याच्या हातात चिलीम दाखवली नसती तर तो त्या भूमिकेत शोभला नसताच, पण हालचालीतील चापल्य, निस्तेज डोळे आणि अचूक संवादफेक ह्या सगळ्याच्या जोरावर 'अभिनेता नवाझुद्दिन', 'बाहुबली फैजल'वर मात करतो आणि आपली छाप सोडतो.
एकंदरीत, एकदा पाहण्यासारखा हा वासेपूर एका अतिरंजित हिंसक प्रलंबित नाट्याचा एक अपेक्षित शेवट करतो.

रेटिंग - * * १/२

Wednesday, August 08, 2012

एक थेंब चांदण्याचा.... (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!)


३.

एक थेंब चांदण्याचा
पापणीच्या आत झिरपून येतो
रोज एका स्वप्नासाठी
चौकट नवी देऊन जातो

रंगीबेरंगी स्वप्नं
अशीच डोळ्यांत सजव
काळ्या आभाळाला त्याचाच
आशेचा चंद्र दाखव

चांदणे झिरपत राहील
पापण्या जड होतील
काही स्वप्नं कुशीत घे..
फुलपाखरू होशील..

इवल्याश्या पंखांनी भिरभिरण्याआधी -
म्हणायला विसरू नकोस.....

गुड नाईट.. स्वीट ड्रीम्स..!

....रसप....
८ ऑगस्ट २०१२

गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!

Tuesday, August 07, 2012

गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !! (Good Night, Sweet Dreams!!)

१. 

थोडीशी दरवळलेली रात्र 
खिडकीशी ओथंबली
एक लाघवी झुळूक 
कानाशी कुजबुजली

मोत्याची सर तुटावी, 
तसं वाटलं 
आणि एक हळुवार मोरपीस 
डोळ्यांवरून फिरलं...

तो कसलासा भास होता..
तुझ्या पदराचा की केसांचा?
माहित नाही.. 
पण खोलवर मातीत 
रुजलेल्या बियाण्याला अंकुर फुटावा...
तसं जुन्या आठवणींना नवा मोहोर आला..
आणि रोम रोम शहारला.. 

आजची रात्र तुझीच...
तुझ्यासाठीच...

गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!

....रसप....
७ ऑगस्ट २०१२ 

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
२. 

मला रात्र खूप आवडते
कारण काळोख्या कॅनव्हासवर 
सगळेच रंग खुलून दिसतात...
आणि आवडती स्वप्नं 
डोळ्यांत फुलून सजतात

मी पुन्हा पुन्हा जगतो..
ते क्षण सरलेले
सोबत असतं स्वच्छ गडद आभाळ
चांदण्यांनी नटलेले..

आज मीही चमचमणार आहे  
एक काजवा होऊन 
तुझ्यापर्यंत उडत येणार आहे
सुखद गारवा घेऊन..


एक रंग तांबडासा
क्षितिजाला देईन
एक रंग निळा तुझ्या 
पापणीवरती सोडीन..

रात्र अशीच सरून जाईल 
आणि म्हणायचं राहून जाईल...

गुड नाईट.. स्वीट ड्रीम्स..!

....रसप....
७ ऑगस्ट २०१२

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

३. 

एक थेंब चांदण्याचा 
पापणीच्या आत झिरपून येतो 
रोज एका स्वप्नासाठी 
चौकट नवी देऊन जातो

रंगीबेरंगी स्वप्नं 
अशीच डोळ्यांत सजव
काळ्या आभाळाला त्याचाच 
आशेचा चंद्र दाखव 

चांदणे झिरपत राहील
पापण्या जड होतील
काही स्वप्नं कुशीत घे..
फुलपाखरू होशील..

इवल्याश्या पंखांनी भिरभिरण्याआधी -
म्हणायला विसरू नकोस.....

गुड नाईट.. स्वीट ड्रीम्स..!

....रसप....
८ ऑगस्ट २०१२

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

४.
रातराणीचा सुगंध वेचायला
रात्र तरुण होते
आणि तुझी हळवी आठवण
मनात भरून येते...

गुलाबी थंडीत
तुझ्या आठवणींची उब मिळते
आणि पाठ फिरवलेल्या स्वप्नाची कूस
माझ्या बाजूला वळते !

खिडकीतून आत येणारं चांदणं
हातात तुझा हात देतं
एक सुगंधी स्वप्न मला
तुझ्या समीप घेऊन येतं..

एक हात चांदण्याचा
तुझ्याकडे आहे पाठवला
"गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!"
इतकंच तुला म्हणायला..

....रसप....
१३ ऑगस्ट २०१२

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *


५.
एक तारा लुकलुकणारा
आणि वारा दरवळणारा
खिडकीत जरा येऊन बघ

तारा माझा भास देईल
वारा तुझा श्वास होईल
स्वत:मध्ये हरवून बघ

मन मनात गाणं गाईल
चेहऱ्यावरती हसू येईल
हसता हसता लाजून बघ

वारा खिडकीशी रेंगाळेल
तारा तुझ्यावरती भाळेल
'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स' म्हणून बघ....!!

....रसप....
१४ ऑगस्ट २०१२
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

६.
ऐकू येतो मला माझा
एकेक ठोका काळजाचा
जसा टिक टिक करत चालत राहातो
घड्याळ्यात काटा सेकंदाचा

हा माझा एकांत आहे,
रितेपण नाही
मी एकटा आहे,
एकांकी नाही

मला फार आवडतो
हा संध्याकाळ ते रात्र असा वेळेचा प्रवास
कारण सतत तू सोबत असल्याची जाणीव होत असते
मी बराच वेळ गप्पा मारतो तुझ्याशी
पण तू उत्तर देत नाहीस
मग मनाला आपोआप कळून येतं
तू दिसतेस, पण असत नाहीस

असते फक्त एक दिशा...
आणि एक विश्वास की,
ह्या बाजूला... पुढे.... काही अज्ञात मैलांवर...
तूही अशीच बोलतेयस माझ्याशी...
मनातल्या मनात..!

मग मऊ स्वप्नांची उबदार शाल ओढून
ज्या दिशेला तू आहेस..
त्या कुशीवर मी वळतो..
आणि समाधानाने डोळे मिटून..
स्वत:शीच हसतो..
तेव्हढाच मनाला दिलासा
तुला 'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स' म्हटल्याचा !

.... रसप....
१७ ऑगस्ट २०१२

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

७.

तापलेल्या मातीत
पहिल्या पावसाचा पहिला थेंब पडल्यावर
झटक्यासरशी आसमंत व्यापणाऱ्या मृद्गंधासारखी
संध्याकाळ गडद होत जाते आणि
दिवसभर वेगवेगळ्या छटा दाखवणारं आभाळ
एकच निकोप, निष्कलंक काळा रंग लेऊन
किंचित लाजऱ्या चंद्राला
माझ्या खिडकीजवळ
तुझा 'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स'चा निरोप देण्यासाठी पाठवते....

रोजची रात्र अशीच असते..
किंचित रेंगाळलेली
तुझ्या आभासांचा सुगंध होऊन
निकोप दरवळलेली..

....रसप....
२५ ऑगस्ट २०१२


* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

८.


आज पुन्हा उशीर झाला..
'लौकर येतो' सांगूनही
आणि तुझे डोळे भरले
बरंच काही सांडूनही..

काळ्याभोर डोळ्यांचं डबडबणं
मला थबथबलेल्या चिंचेच्या झाडामधून
डोकावणाऱ्या झाकोळलेल्या चंद्रासारखं वाटतं
आणि आत्ताच बरसून रितं झालेलं आभाळ
फिरून पुन्हा एकदा
माझ्या डोळ्यांत दाटतं....

तुला माहितेय..
मला रडता येत नाही..
म्हणून मी सगळं हसण्यावारी नेतो...
तुझी शप्पथ राणी,
पुढच्या वेळी नक्की लौकर येतो..

तू चिडू नकोस
कारण तू चिडलीस की तूच रडतेस
मला झाकोळलेला चंद्र
पाहवत नाही..
आणि भरल्या डोळ्यांनी नीट
'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स'
पण म्हणवत नाही !

....रसप....
२९ ऑगस्ट २०१२


* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

९.

कोपऱ्या-कोपऱ्याला हळूहळू व्यापत.. रंगवत..

सारी धरणी मुठीत घेणारं काळंकुट्ट आभाळ
पहाटेच्या चाहुलीसरशी
दहीवराच्या प्रत्येक थेंबात भरून येतं..
आणि पानापानावर डवरतं
माझ्या डोळ्यातलं समाधान
तू नसतानाची अजून एक रात्र सारून गेल्याचं !

अर्धवट उजळलेल्या आकाशाच्या एका कोपऱ्यात
विरघळत जाणारा झोपाळलेला चंद्र
मला साखरझोपेतल्या जगाच्या नकळत
एक मिश्कील पोचपावती देतो...
काल संध्याकाळी तुला माझ्या वतीने
'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स'
म्हटल्याची.. !
अन अचानक
अजून एका रात्रीची दिवसभर वाट पाहायचा उत्साह येतो..
विझलेल्या नजरेत..!

....रसप....
१० नोव्हेंबर २०१२


* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

१०.

मी बघतो ते स्वप्न आहे..
आणि जगतो ते सत्य आहे
हे कसं ठरवावं?
जे डोळे मिटल्यावरही माझ्यापासून वेगळं होत नाही..
त्याला असत्य कसं समजावं?
खरं असो.. खोटं असो..
मला आवडतंय
सत्य असो.. स्वप्न असो..
मला हसवतंय..

पण एकच विचार येतो -
दिवसभर श्वास-श्वासातून दरवळणाऱ्या..
रात्री निवांत मिटलेल्या पापण्यांवर अलगद पहुडणाऱ्या..
आणि सकाळी अंगणातल्या प्राजक्ताच्या सड्याप्रमाणे  
मनभर पसरणाऱ्या..
माझ्याच गुलाबी स्वप्नांच्याही नकळत..
मी तर रोजच म्हणत असतो..
कधी तूही म्हण की -
'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स!!'

(की मला ऐकू येणारा आवाज माझा नसतो,
तुझाच असतो
आणि मी फक्त मनातल्या मनातच बोलत असतो..?)

....रसप....
१२ नोव्हेंबर २०१२


* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

११.


केशरी, तांबड्या रंगांच्या वेगवेगळ्या गडद छटा दाखवत
एका नाजूक क्षणी लुप्त होणारा सूर्य
हळूहळू करत...एकेका रेषेसरशी जिवंत होत जाणाऱ्या
आणि नकळत बोलू लागणाऱ्या एखाद्या चित्रासारखा..
लाल, निळ्या, काळ्या रंगांत हरवलेलं आकाश
झाडं, वेली, पक्ष्यांनाही लागलेली गुलाबी चाहूल..
पण माझ्या मनात मात्र एक अनाहूत काहूर..
ह्याच वेळेला 'कातरवेळ' म्हणत असावेत
इथून पुढे मनाच्या कातरपणाला सुरुवात होते
अश्या वेळी मला काहीच नको असतं..
मी, मी आणि फक्त मीच..
मग सभोवती असणारी
प्रत्येक अंधुक सजीव-निर्जीव वस्तू
वेगवेगळे मुखवटे चढवते...
मला हवे असलेले..
हसणारे.. रडणारे..
रुसलेले.. चिडणारे..
ओळखीचे.. अनोळखी
आणि काही माझ्यासारखेच..
हळवे हळवे, कातर कातर !
अचानक लक्ष जातं...
खिडकीत रुणझुणणाऱ्या 'विंड चाईम्स' कडे
तो तुझाच आवाज असतो...
पन्हाळीवर एक थेंब रेंगाळलेला दिसतो
तो तुझाच चेहरा वाटतो
'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स'
म्हणणारा.. !

रोज..
ह्यानंतर पुढे काय होतं,
मला आठवत नाही
कारण डोळे उघडेपर्यंत
कातरवेळ थांबत नाही..

....रसप....
१९ जानेवारी २०१३

(क्रमश:)

Monday, August 06, 2012

भातुकलीचा डाव आपला


एकांताच्या दोन क्षणांचा
परस्परांशी मेळ घालतो
काळवंडल्या मनात माझ्या
रस्ता शोधत धडपड करतो

तुझ्याविना मी जगण्याचीही
कधी कल्पना केली नव्हती
तू नसताना क्षणाक्षणाला
विषण्णतेची येते भरती

लपवुन दु:खे हसायलाही
तूच शिकवले मनास होते
गहिवरतो मी हसता हसता
स्मरते कारण मला नको ते

भातुकलीचा डाव आपला
तसाच अर्धा पडून आहे
खिडक्या दारे भिंतींनाही
तुझीच आशा अजून आहे

खोट्या इच्छा आकांक्षांच्या
नभात कोणी किती उडावे
विझलेल्या डोळ्यांनी माझ्या
सांग दूरचे कसे पहावे ?

....रसप....
६ ऑगस्ट २०१२

Sunday, August 05, 2012

कमी आंबट दुसरं शरीर (Jism - 2 Review)


डिस्क्लेमर - ब्रॅड पिट, टॉम क्रुझ, जॉनी डेप्प, वगैरे मान्यवरांनी एकूण मिळून जितके हिंदी सिनेमे पाहिले असतील तितकेच इंग्रजी सिनेमे मी पाहिले आहेत. तरी, सिनेमाच्या उत्तरार्धात 'अयान ठाकूर'च्या व्यवसायाबद्दल उघडणारं रहस्य कळल्यावर असं वाटलं की असा व्यवसाय फक्त अमेरिकेतच (पाश्चात्य भागात) असू शकतो, भारतात नाही. म्हणून कदाचित हा सिनेमा कोण्या इंग्रजी सिनेमाची नक्कल असू शकतो. खरं खोटं कुणास ठाऊक. पण मी हा 'ओरिजिनल' आहे असं समजून लिहितो.....

'इस्ना' (सनी लिओन) - एक 'उच्चभ्रू' वेश्या.
एके रात्री ती 'अयान ठाकूर' (अरुणोदय सिंग) सोबत जाते. रात्रभरात 'कामाची गोष्ट' उरकून झाल्यावर अयान तिला स्वत:ची ओळख करून देतो. तो एका गुप्तचर संस्थेत कार्यरत असतो. ही गुप्तचर संस्था खरोखर 'गुप्त'च असते. देशहितकारक कामं करत असले, तरी तिचे अस्तित्त्व जाणीवपूर्वक गुप्त ठेवण्यात आलेलं असतं. अयान इस्नाला एका कामाची 'ऑफर' देतो. काम तेच जे ती रोज करतेय, फक्त माणूस तो जो अयान सांगेल! पैसे जितके इस्ना मागेल! बास्स... ती तोंड उचकटते - 'दहा करोड!!'............  "डील!!"
ज्या माणसाला फसवायचं असतं, तो असतो 'कबीर विल्सन' (रणदीप हूडा). कबीर कधीकाळी एक तडफदार पोलीस ऑफिसर असतो. पण पोखरलेली व्यवस्था, भ्रष्ट अधिकारी पाहून तो निराश होतो आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. तो एकेक करून सर्व भ्रष्ट व्यक्तींना मारत सुटतो. त्याच्या ह्या 'हिट लिस्ट' मध्ये नेते, अधिकारी, पोलीस, वगैरे सगळे असतात. सहा वर्षांपूर्वी हाच कबीर इस्नाच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो. पण अचानक तो काहीही न सांगता तिला सोडून जातो, गायब होतो आणि आपलं 'सफाई अभियान' सुरू करतो. कबीरने आत्तापर्यंत केलेले घातपात आणि त्याचे पुढचे प्लान्स ह्याची इत्थंभूत माहिती त्याच्या LAPTOP मध्ये असते. ती माहिती मिळवण्यासाठी इस्नाची आणि त्याची भेट घडवून आणून, तिला त्याच्या आयुष्यात परत आणायचा प्लान अयान आणि कं.ने आखलेला असतो.
इस्ना आणि अयान, कबीर राहात असतो त्या 'गॉल' (श्री लंका?)ला एक लग्न न झालेलं (पण ठरलेलं) जोडपं "इस्ना-करण" बनून येतात. पुढे इस्ना कबीरला आपल्या जाळ्यात ओढते आणि त्याच्या मागणीनुसार 'करण' (अयान) ला सोडून त्याच्याशी लग्न करण्यास होकार देते. मात्र, आता परिस्थिती बदललेली असते. अयानही इस्नाचा प्रेमात पडलेला असतो! आता....??
पुढे काय होतं?
अयानला हवी असलेली माहिती मिळते का ?
इस्ना कुणाला मिळते?
कबीरचं काय होतं ?
वगैरे सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देऊन सिनेमा एका वेगळ्याच शेवटावर संपतो.

काही प्रसंगांत थरारक वाटणारा हा सिनेमा काही भागांत रेंगाळतो. सनी लिओन ज्या कामासाठी सिनेमात आहे, ते काम बऱ्यापैकी निभावते. (तरी आंबट शौकीन लोक जर पंच पक्वान्नाचे ताट अपेक्षित करून आले असतील, तर त्यांना फक्त 'स्वीट डिश'च मिळते!) 'अभिनेत्री' सनी लिओन, ती मुळात 'पॉर्न स्टार' का आहे, ह्याचं उत्तर मिळावं इतकी बथ्थड आहे. नवीन चेहरा 'अरुणोदय सिंग' सनी लिओनला दगड म्हणून उत्कृष्ट साथ देतो. संगीत श्रवणीय आहे. 'गॉल' व एकंदरीत श्रीलंका फार सुंदर आहे. संवाद काव्यात्मक आहेत. रणदीप हूडा सिनेमा खिश्यात घालून घरी नेतो! त्याने रंगवलेला 'कबीर' क़ाबिल-ए-तारीफ आहे!

एकंदरीत एकदा पाहावा असा हा जिस्म - २, कुठल्याही इंग्रजी सिनेमाची नक्कल नसल्यास नक्कीच अपेक्षेपेक्षा चांगला आहे.

रेटिंग  - * * १/२

Saturday, August 04, 2012

'आभासकुमार गांगुली' अर्थात ' किशोर कुमार'!


एखादी कलाकृती निर्मित केल्यावर स्वत: कलाकारच त्या कलाकृतीच्या प्रेमात पडतो, तिच्या परिपूर्णतेने/ सौंदर्याने भारावून जातो आणि अचंबित होऊन विचार करतो की, "हे मीच बनवलं आहे?".. किंचित अभिमानाने वारंवार स्वत:च स्वत:ची पाठही थोपटतो. असंही वाटतं की, "बनवावं तर असंच, नाही तर काही करूच नये!"
अगणित कलाकृती निर्मित करणारा तो सगळ्यात मोठा कलाकार, जो कुठे आहे कुणालाच माहित नाही; पण त्याचं अस्तित्त्व अश्याच अफलातून कलाकृतींमधून जाणवत राहतं, तो विधाताही आपल्या काही निर्मितींच्या अश्याच प्रकारे प्रेमात पडला असावा; असं काहीसं मला काही व्यक्तींबाबत विचार केल्यावर बरेचदा वाटतं. अशीच एक व्यक्ती म्हणजे - 'आभासकुमार गांगुली' अर्थात ' किशोर कुमार'!

मी कुणी चित्रपट समीक्षक नाही, त्यामुळे मला 'आतल्या गोष्टी', किस्से-कहाण्या माहित नाहीत. मला एकच माहित आहे की, नाकातून शेंबूड वाहतो आहे हे जेव्हा मला कळायला लागलं त्या वयापासून मी किशोरचा भक्त आहे.... तो आजतागायत, जेव्हा डोळ्यातून पाणी वाहते आहे, हे कळेनासं होईपर्यंत दुनिया पाहून झाली आहे.



आज त्या माझ्या देवाचा ८३ वा वाढदिवस !
असं काय खास होतं त्याच्यात ?
फार जबरदस्त गायकी होती ? - नाही.
फार भारदस्त व्यक्तीमत्त्व होतं ? - नाही.
फार असामान्य अभिनयगुण होते ? - नाही..
फार अफलातून सौंदर्य होतं ? - नाही..
मग ?
हीच तर खासियत होती! गायन, अभिनय, लेखन, संगीत, दिग्दर्शन, निर्मिती, गीतलेखन सगळंच त्याने केलं आहे. आणि प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला. गायक किशोरकुमारचा ठसा सगळ्यात ठळक उमटला. नव्हे.. त्याच्या आवाजाने हृदयावर एकेक भावना कोरून ठेवली. त्याचा आवाज कुणाला शोभला नाही? अमिताभ, राजेश खन्ना, देव आनंद  सारख्या सुपरस्टार्सपासून अमोल पालेकर, ऋषी कपूर सारख्या 'बॉय नेक्स्ट डोअर' नटांपासून ते अगदी गेलाबाजार अनिल धवन, फिरोज खान, राकेश रोशन पर्यंत प्रत्येकाच्या पडद्यावरील अस्तित्त्वाला जिवंतपणा देणारा आवाज किशोरचा होता. महान गायक अनेक झाले, आहेत. पण प्रत्येकाचा आवाज (मला तरी) कुणा ना कुणासाठी विजोड वाटला आहे; इथेच किशोर कुमार सगळ्यात वेगळा आहे.

सचिन तेंडूलकरच्या शतकांची गणती करताना एकदा एक समालोचक म्हणाला होता की, 'ह्याची जितकी शतकं ठोकून झाली आहेत, तितके सामनेही खेळायला मिळाले तरी कुणाचंही आयुष्य सार्थकी लागेल!'; तसंच 'किशोरची जितकी गाणी मनात घर करून आहेत, तितकी एकूण गाणीही कुणा गायकाला मिळाली तरी आयुष्य सार्थकी लागावं!'

आज असं वाटतंय की, बरं झालं... बरं झालं.. १३ ऑक्टोबर १९८७ पर्यंत मला फारशी समज आली नव्हती.. समजायला लागल्यापासून हेच समजलं की 'किशोर नाहीये'. नाही तर त्याच्या जाण्याच्या दु:खाने मन पोखरून ठेवलं असतं आणि ती पोकळी कधीच भरून निघाली नसती. बरं झालं.... मला तेव्हा काहीच समजत नव्हतं. म्हणूनच आजही, तो नसतानाही मला असं वाटतच नाही की तो नाहीये..

हॅप्पी बर्थडे किशोरदा.........
तेरा मुझसे हैं पहले का नाता कोई..
यूं ही नहीं दिल लुभाता कोई....

Thursday, August 02, 2012

दृष्टांत (टेकडीवरचे झाड)


दिवसाला मिळे समाधी
संध्येच्या काजळडोही
दरवळतो उदास वारा
कानाशी गुणगुणतोही

डोळ्यांना येते धुंदी
पण डोळा लागत नाही
वेळेचे विचारचक्र
पळभरही थांबत नाही

नजरेस सोडतो माझ्या
डोळ्यातुन मुक्त जरासे
ओघळता अश्रू देतो
सुटकेचे श्रांत उसासे

मग दूर टेकडीवरती
धूसर नजरेला दिसते
एका वृक्षाला कुठली
सोबतही उरली नसते

"मी एक एकटा नाही"
दु:खात दिलासा मिळतो
गोंजारुन मीच स्वत:ला
ओल्या डोळ्यांनी हसतो

ती संध्या हलकी हलकी
उतरून मनाच्या काठी
दृष्टांत आगळा देते
सुटती गुंत्याच्या गाठी

झेलाया वादळवारे
कमजोर कुणीही नसतो
अपुल्या शक्तीचा साठा
अपुल्याच मनाशी असतो

आताशा संध्याकाळी
मी रोज झाड ते बघतो
अन पुन्हा झगडण्यासाठी
मी नवीन हिंमत करतो....!

....रसप....
२ ऑगस्ट २०१२
Related Posts Plugin for WordPress, Blogger...