किती जरी वाटलं तरी,
चंद्र कधी ओघळत नसतो
तो फक्त मनाचा खेळ असतो
आपणच आवडून घेतलेला...
उगाच वाटतं की -
आत्ताच ओघळलेला एक थेंब..
त्या डावीकडच्या तारकेने झेलला
आणि धरतीच्या संतप्त उरात
पावसाचा पहिला थेंब झिरपल्यावर
तिने एक आश्वस्त उसासा द्यावा,
तशी ती तारका क्षणभर लकाकली...
पण असं काही नसतं...
ती फक्त मनाची कल्पना असते
आपणच आवडून घेतलेली..
उगाच वाटतं की -
बेधुंद चंद्राची शुद्ध हरपली आहे
भोवतालच्या सात-आठ चिमुकल्या तारका
त्याला आधार देत आहेत
आणि तो,
खवळलेल्या सागराने पुन्हा पुन्हा धावून येत
किनाऱ्याला धडकावं... तसा
पुन्हा पुन्हा उफाळून येऊन
सगळ्यांना उधळायला बघतो आहे..
पण असं काही नसतं...
ते फक्त मनाचं प्रतिबिंब असतं
आपणच आवडून घेतलेलं..
कधी हाच चंद्र दिसतो पिवळा...
कधी सोनेरी
कधी ढगाळ आभाळातून रोखून बघणारा...
वाटतो अघोरी..
छ्या: !
ह्याला काहीच अर्थ नाही..
रोज काही तरी नवीन दिसतं मला..
ह्या खिडकीतून...
जे कधीच माझ्याशी मेळ खात नाही
म्हणून आताशा मी त्या खिडकीतच जात नाही
अख्खी रात्र सताड डोळ्यांनी
घरात भरून आलेलं आभाळ बघत बसतो...
डोळ्यांत चंद्र घेऊन..
थेंब-थेंब ओघळत राहतो
आणि उशीवरच्या चांदण्या टिपत राहतात..
आताशा मी अधून मधून खवळतोही
धडका द्यायला किनारा शोधतो...
एक पिवळा चंद्र मनाशी जपतो......
....रसप....
२५ जुलै २०१२
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!