Wednesday, July 18, 2012

'हाहाहाहा' हसू नका ही दु:खाची स्टोरी !


उगाच पळणे प्रेमापासुन सहजच मिळताना
मनातले समजून टाळणे सगळे दिसताना
मग नकळत फुलते कळी कोवळी हसते बावरते
हे असे नेहमी होते माझे मनास हरताना

मनात गाणे गुणगुणतो पण ओठांवर बंदी
मोजत बसतो उगाच पडल्या खड्ड्यांची रुंदी
मी कितीकितीदा पाउल माझे जपून चालवले
पण वळणावरती मलाच चढते गाण्याची धुंदी

धडपडणे ही सवयच माझी, अंगी बाणवली
सपाट रस्त्यानेही मजला घसरण दाखवली
पाहून घसरलो डोळे केवळ, हसू कधी हळवे
अन कधी पाहुनी छबीस दिवसा स्वप्ने रंगवली

मनात माझ्या कधी कुणाचा दरवळला चाफा
आठवणींच्या कल्लोळाचा भवताली ताफा
मज कधी वाटले जखडुन घ्यावे मिठीत कोणाला
पण लिहून कविता फक्त उठवल्या शब्दांच्या वाफा

'हाहाहाहा' हसू नका ही दु:खाची स्टोरी !
मनास जपतो किती तरीही होते हे चोरी
मी बांध घालतो रोज नव्याने कितीकदा ह्याला
पण देउन जाती सुंदर ललना कविता ही कोरी..!

....रसप....
१५ जुलै २०१२
पहिल्या दोन ओळीत २६ (१६,१०) मात्रा आणि शेवटच्या दोन ओळींत २८ (१८, १०) मात्रा.

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...