बावऱ्या राधेचा सावळा कान्हा
मोहवी सुरांनी सांज जाताना
झाकोळदिशांनी ओघळे नभ
तहान वेगळी आज ओठांना
सांडला सुगंध बासरीतून
लाजला मोगरा फिका होऊन
पावले ओढते नादमाधुरी
तहान शमेना होतां तल्लीन
राधेची यमुना विसावा घेई
गहिऱ्या गहिऱ्या तळाशी नेई
कान्हाच जाहली एकटी राधा
तहान प्रेमाची यमुना होई
राधेला एव्हढी आस लागली
कान्हाची बनावे सदा सावली
तहान रहावी नेहमी मनी
सावळ्या रंगात राधा रंगली
कधीच राधेने नाही जाणले
कान्हाने विश्वाला साऱ्या व्यापले
राधेच्या प्रेमाला दुसरे स्थान
पहिले स्थान ना कोणा लाभले
....रसप....
१८ जुलै २०१२
(अक्षरछंद. असा कुठला छंद आहे की नाही, माहित नाही पण प्रत्येक ओळीत ११ अक्षरं आहेत.)
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!