सिनेमाचं शीर्षक गीत.. 'बोल बच्चन'..
ह्या गीतामध्ये एके ठिकाणी 'पेंड्यूलम' ह्या शब्दावर मस्त हरकत आहे. हे गीत त्या जागेवर खूपच आवडतं. मग आपण सिनेमा पाहातो आणि जाणवतं की सिनेमाही 'पेंड्यूलम'च आहे. धमाल, छान, बरा, वाईट, बंडल.. अश्या वेगवेगळ्या दर्ज्यांवर सिनेमा वारंवार हिंदोळे घेत राहतो.
तीन वेळा फक्त शीर्षकाची नक्कल करून झाल्यावर अखेरीस 'रोहित शेट्टी'ने 'बोल बच्चन' द्वारे हृषीदांच्या खुद्द 'गोलमाल'चीसुद्धा नक्कल केली. आता चित्रपट सही-सही 'गोलमाल'वर बेतलेला असल्याने तुलना होणे अनिवार्य आहे आणि इथेच 'बोल बच्चन' अक्षरश उघडा (नव्हे नागडाच!) पडतो. काही किरकोळ तुलना -
१. गोलमाल मधला 'नोकरी देणारा मालक' एक प्रतिष्ठित, सुसंस्कृत, सुशिक्षित व्यावसायिक असतो. 'बो.ब.' मधला 'मालक' एक अडाणी, अर्धशिक्षित, 'सभ्य' गुंड.
२. 'गो.मा.' मधला नोकरदार माणूस एक चार्टर्ड अकाउन्टन्ट, तर 'बो.ब.' मधला नोकरदार माणूससुद्धा एक एक अडाणी, अर्धशिक्षित, 'सभ्य' गुंड.
३. 'गो.मा.' मधली बहिण 'एम.ए. (हिंदी)' तर 'बो.ब.' मधली बहिण एका डब्बा नाटक कंपनीतली 'नेपथ्यकार/ अभिनेत्री'.
४. 'गो.मा.' मधली नकली आई, एक हौशी प्रतिष्ठित अभिनेत्री तर 'बो.ब.' मधली नकली आई एक कोठेवाली!
५. 'गो.मा.' मधला नकली जुळा भाऊ एक गायक (आनेवाला पल....... आहाहाहा!!) तर 'बो.ब.' मधला नकली जुळा भाऊ एक बायल्या नाच्या ! (काय ते कथ्थकच्या नावाखाली केलेले हिडीस अंगविक्षेप ! ईईईईई !!)
असो.. ह्या झाल्या वर वर तुलना. अधिक खोलात न जाता सिनेमाबद्दल थोडंसं बोलतो.
'अब्बास अली' (अभिषेक बच्चन) आणि 'सानिया अली' (असीन) दिल्लीला राहणारे बहिण-भाऊ. वडिलार्जित घरावर चुलत्यांनी कायदेशीर ताबा मिळवल्याने बेघर होतात. त्यांच्या वडिलांचा जवळचा मित्र 'शास्त्री' (असरानी) 'रणकपूर'मधील सगळ्यात मोठं प्रस्थ असलेल्या 'पृथ्वीराज सूर्यवंशी' (अजय देवगण) कडे कामाला असतो. (कसलं काम? माहित नाही.) तिथेच अब्बासलाही काम मिळवून द्यायच्या विचाराने तो अब्बास-सानियाला दिल्लीहून 'रणकपूर' ह्या त्याच्या गावी घेऊन येतो. पृथ्वी आणि जवळच्याच 'खेरवाडा' गावात राहणारा त्याचा चुलत भाऊ विक्रांत ह्यांच्यात 'खानदानी दुष्मनी' असते. ह्या वैमनस्यामुळे दोन गावांच्या सीमारेषेवरील पुरातन मंदिर बंद पडलेले असते. एका लहान मुलाचा प्राण वाचवायच्या हेतूने अब्बास हे मंदिर उघडतो आणि 'एका मुस्लिमाने मंदिर उघडलं' ह्यावरून गदारोळ होऊ शकतो; असा विचार करून 'शास्त्री'चा नौटंकीबाज मुलगा 'रवी' (कृष्णा) गडबडीत अब्बासचं नाव बदलून 'अभिषेक बच्चन' सांगतो. इथून सुरू होतो खोट्यावर खोटं... खोट्यावर खोटं.. बोलत जाण्याचा नेहमीचा खेळ. पृथ्वीला एकाच गोष्टीचा प्रचंड तिटकारा असतो, 'खोटं बोलणे'! बाकीचा सिनेमा ज्याने 'गोलमाल' पाहिला असेल; त्यासाठी डोळे मिटून पाहाण्यासारखा आहे.
अधिक -
१. अजय देवगण. अगदी सहज वावर आणि उत्कृष्ट अभिनय!
२. अजय देवगण. तोडकं-मोडकं इंग्रजी बोलण्याचा अट्टाहास काही ठिकाणी छानच विनोदनिर्मिती करतो.
३. अजय देवगण. कुठल्याच दृश्यात एक क्षणसुद्धा, किंचितही चंचल होत नाही. अख्खा सिनेमा एकटाच पेलतो!
४. अनेक ठिकाणी सिनेमा पोट धरून हसवतो. अनेक ठिकाणी खसखस पिकवतो.
५. अखेरीस 'तुमचं भांडं फुटलं आहे' हे ज्या प्रकारे अजय देवगण व साथीदार व्यक्त करतात, ते आवडलं.
उणे -
१. अभिषेक बच्चन. ह्याने आयुष्यात कॉमेडी सोडून काहीही करावं, असा वावर.
२. अभिषेक बच्चन. काही दृश्यांत चेहऱ्यावरची माशी उडत नाही!
३. अभिषेक बच्चन. अनेक ठिकाणी ओव्हर ॲक्ट करतो. अख्खा सिनेमा एकट्यानेच उचलून आपटतो.
४. अभिषेक बच्चन. 'कथ्थक' नावाखाली केलेलं हिडीस नृत्य म्हणजे आजपर्यंत पाहिलेला विनोदनिर्मितीचा सगळ्यात विकृत प्रयत्न असावा.
५. अभिषेक बच्चन. वारंवार रडकं तोंड करून विनोदाचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न सिनेमाभर करत राहातो आणि एकदाही जमत नाही.
६. अजय-अतुल ने लौकरच सावरावं.
७. काही ॲक्शन दृश्यं बरी विनोदनिर्मिती करतात! पण रोहित शेट्टीने अशी विनोदनिर्मिती आधीच्या सिनेमांतही केली आहेच !
८. पृथ्वी-विक्रांत च्या कौटुंबिक वैमनस्याचा भाग पूर्णपणे अनावश्यक. त्याने मूळ कहाणीस काहीही हातभार लागत नाही. केवळ काही अचाट मारामाऱ्या दाखवून पिटातल्या पब्लिकला खूष करायचा हेतू असावा बहुतेक.
एकंदरीत, एकदा(च) पाहावा असा, पण नाही जरी पाहिला तरी काहीही दु:ख होऊ नये असा हा "बोल बच्चन" माझ्या मते तरी एका ऑल टाईम ग्रेट निखळ विनोदी सिनेमाची अगदीच भ्रष्ट नक्कल आहे. Watch at your own risk. मी जुन्या 'गोलमाल'चा 'फॅन' असल्याने मला तरी हा प्रयत्न अगदीच पिचकवणी वाटला, पण थेटरातील बहुतेक पब्लिक मात्र बरंच 'खूष' वाटलं!!