"मराठी कविता समूहा" च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ८६" साठी माझा प्रयत्न -
आयत्या बिळावरी मजेत नाग डोलतो
लाज सोडुनी खुशाल मस्तवाल बोलतो
करे कुणी भरे कुणी हिशेब कोण मागते
इथे असेच चालते, इथे असेच चालते
पाय दे शिरावरी शिडी पुढे चढून जा
गोत तोडण्यास तू कुऱ्हाडही बनून जा
उरेल जो, तरेल तो, अशीच वेळ वाहते
इथे असेच चालते, इथे असेच चालते
बैल जाहला पसार दोर तोडुनी जरी
घे कवाड दांडगे उगाच बांधुनी तरी
नको बघूस तू सुजाण गाव काय सांगते
इथे असेच चालते, इथे असेच चालते
निंदका समीप ठेवुनी रहा, ’उदो’ म्हणा
सर्व घाव झेलुनी उरावरी, जपा कणा
कुणी खरेच सांगते, कुणी उगाच बोलते
इथे असेच चालते, इथे असेच चालते
भूतकाळ सांगुनी इथे कितीक माजले
"आज" त्यांस झेपला नसे म्हणून पांगले
शिळ्या कढीस ऊत आणणेच त्यांस भावते
इथे असेच चालते, इथे असेच चालते
....रसप....
२१ फेब्रुवारी २०१२
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!