रोख-उधारी हिशेब सारे फिटवुन द्यावे जाता जाता
माझ्याकडचे तुझे तुला मी परत करावे जाता जाता
उश्यास माझ्या पहूडलेली कुंतलकाळी निशा बावरी
तिचे कोवळे गंधभारले पाश खुलावे जाता जाता
सुखावणारे स्पर्श तुझे जे जपले होते जिवापाड मी
तुझ्या मिठीच्या स्वर्गसुखाचे भास विरावे जाता जाता
कातरवेळी मावळणारा सूर्य आपल्या मुठीत होता
अजून हाती उरलेल्या लालीस पुसावे जाता जाता
तुला मला जो भिजवुन गेला रिमझिम पाउस आठवतो का?
चिंब क्षणांनी डोळ्यांमधुनी आज झरावे जाता जाता
गोडगोजिरी कितीक स्वप्ने नकळत माझी पाहुन झाली
त्या स्वप्नांच्या काचांनी पायांत रुतावे जाता जाता
जाता जाता झुरतिल माझ्या व्याकुळ नजरा तुला पाहण्या
संपुन गेले श्वास तरी मी रेंगाळावे जाता जाता
....रसप....
४ फेब्रुवारी २०१२
एक इजाज़त दे दो बस्स्....
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!