गालावर ओघळणाऱ्या
थेंबांचे वाळुन जाणे
आता तर रोजच असते
दु:खात हासुनी गाणे
विस्कटले धागे सारे
नात्यांची वीण उसवली
ना ऊब राहिली आता
पण आस तरी ना विरली
निवडुंगावर फुललो मी,
काट्यांशी जमले नाही
दुनिया नाकारुन गेली
मज फूल मानले नाही
मी हताश नजरा देतो
छायेला, प्रतिबिंबाला
सारे परके का वाटे,
मुकलो रंगा-गंधाला
भळभळत्या संध्याकाळी
दु:खाची दरवळधुंदी
मी सूर आर्त ऐकूनी
अपुल्या कोषातच बंदी
ही माझी अधुरी कविता
मी तुलाच आंदण देणे
आता तर रोजच असते
वेडास पांघरुन घेणे
....रसप....
१६ फेब्रुवारी २०१२
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!