अशीच एक लांबलेली संध्याकाळ
मिट्ट काळोख्या रात्रीत बदलली
पण अंधाराच्या कातळकुशीतून
ती प्रसन्न पहाट उगवली
सोनेरी किरणांनी चमचम करणारी
एक नवीन वाट समोर होती..
चालणारे अनेक होते पण -
सोबत तुझीच होती
सहवासाकडून मैत्रीपर्यंतचा प्रवास नकळतच घडला
स्वत:पेक्षाही जास्त तुझ्यावर विश्वास जडला
अनेक चढउतार पाहिले
उन्हाळे-पावसाळे साहिले
अनवट वळणांना
सहज मागे सोडले...
मी विसाव्याला थांबलो
तेव्हा तूही थांबलास
माझा डोळा लागला
तेव्हा तूच तर जागलास..
कधी पाठीवरची थाप होतास...
कधी खांद्यावरचा हात होतास
कधी भावासारखा खंबीर बनलास
कधी तत्त्ववेत्ता गंभीर बनलास
काल तुला ठेच लागली...
मीही कळवळलो
इथेच थांबू की थोडं पुढे...
क्षणभरच घुटमळलो
पण परत आलोय... बघ जरा
गहिवरलोय... बघ जरा
दुखावला असशील, पण दुरावू नकोस..
प्रतिमेचा आरसा, हिरावू नकोस..
पुढची वाट खडतर आहे मित्रा...
हात सोडू नकोस..
साथ सोडू नकोस..
क्षणभरही......
....रसप....
१८ फेब्रुवारी २०१२
Nice Poem Ranjit
ReplyDeleteThanks Nagesh!
Delete