आता मीही कसंही लिहिणार
वाचणाऱ्याला नुसतं बोअर करणार
'र'ला 'र' आणि 'ट'ला 'ट' जुळवून
भरमसाट कविता करणार..
मनात येईल ते अगदी तस्संच ठेवणार
व्याकरणाला कोपऱ्यात फेकणार
चार-चार ओळींच्या जुड्या बांधून
तासातासाला सांडत बसणार
'लाईक' करा "थँक यू" म्हणणार
प्रत्येकाचे आभार मानणार
पुन्हा पुन्हा आभार मानून
माझीच पोस्ट वर आणणार
आता मी नवीनच शब्द जन्माला घालणार
मला हवा तसाच त्यांचा अर्थ सांगणार
मला तर सगळं कळतंच
तुम्हालाही पटवून देणार
कुणी मानो किंवा न मानो
मी माझंच खरं मानणार
कुणी दीड शहाणा लागलाच शिकवायला
तर दुधातल्या माशीसारखा काढून टाकणार
आता मीही अस्ताव्यस्त लिहिणार
वाचणाऱ्याला अगदी त्रस्त त्रस्त करणार
माझ्या 'आतून' आलेली भावना म्हणून
नुसता फापटपसारा मांडणार !
लेखणीचा कोयता करून वाक्यं कुठेही तोडणार
विशेषण आधी, क्रीयापद नंतर आणि नामाला शेवटी मांडणार
मला आवडेल तसं आणि तेव्हढं
ओळीला चिंगमसारखं ताणणार
आता मीही कसंही लिहिणार..
वाचणाऱ्याला नुसतं बोअर करणार....
....रसप....
२६ जानेवारी २०१२
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!