Monday, October 31, 2011

तिच्या डोळ्यात ओलावे..



तिच्या डोळ्यात ओलावे जरासे बोचरे होते
कधी खोटे कुणासाठी कधी थोडे खरे होते    

असा का पारखा झाला मला हा आरसा माझा
मला पाहून का त्याने उठवले हे चरे होते?

मनाचे खेळ हे सारे मनालाही न समजावे
पराभूतासमोरी का विजेते बावरे होते ?

नव्या देशात माणुसकी नसावी ईश्वरालाही
नव्याने ते पुन्हा माझे जुने होणे बरे होते

तिच्या हातून मरण्याची मजा ती वेगळी होती
तिच्या ओठावरी मी रंगणेही साजरे होते


....रसप....
३१ ऑक्टोबर २०११

Monday, October 24, 2011

मोडला “कणा”

सर्वप्रथम कवीवर्य कुसुमाग्रजांना अभिवादन.
क्षमस्व.


"सोडताय का सर मला"
-जोडून हात दोन्ही
इस्त्री उतरल्या कपड्यांमधली
मूर्ती केविलवाणी

पळभर श्वास रोखून बॉस
बोलला वरती पाहून,
"Reports अजून दिले नाहीस
चाललास कुठे पळुन ?

सकाळपासून PC तुझा
मांडीत घेउन बसलास
काम अर्धे आहे तरी
येऊन उभा ठाकलास?

जबाबदारीची जाण नाही
घड्याळ बघत बसतोस
F.T.R. "झीरो" तुझा
नुसतेच दिवस भरतोस ..!!

बैलासारखी कामं करता
डोकं जरा वापरा
५:३० ला घोड्यावर बसता
आधी खाली उतरा..!!"

'बैल' म्हणताच शेळीच्या त्या
डोक्यात तिडीक गेली
कुणास ठाऊक त्याच्यात इतकी
हिंमत कुठून आली....!

झटक्यासरशी जीभ उचलून
त्याने टाळुस लावली
"रेकॉर्ड्स काढून पाहा माझे
सुट्टी कधी घेतली ?

सहा महीन्यात घरी,
मी वेळेत गेलो नाही
बायको-मुलं रुसून बसलीत
घरात संवाद नाही

मंद झाली बुद्धी आता
राब राब राबुन
लक्ष्मी माय देई आम्हा
तरी दर्शन दुरून..!!

दिवस दिवस झिज-झिज झिजून
मोडला जरी कणा
पाठीवरती हात ठेवून
नुसते "मर" म्हणा..!!"


....रसप....

Sunday, October 23, 2011

प्रवासी


लेउनी रंगांस तिन्हीसांज झाली
आज माझी वाट प्रकाशात न्हाली

मी मनाशी दु:ख जपावे कशाला
पाहिले येथेच सुखाच्या उद्याला
वेदना आनंद मला देत गेली
आज माझी वाट प्रकाशात न्हाली

बंधने तोडून असा व्यक्त झालो
त्या पतंगाच्या सम मी मुक्त झालो
झुळुक आली तीच खरा जोर झाली
आज माझी वाट प्रकाशात न्हाली

जोखले वाटांस नव्या आवडीने
अन् प्रवासी मी बनलो आवडीने
पावले माझी इथली खूण झाली
आज माझी वाट प्रकाशात न्हाली

....रसप....
२३ ऑक्टोबर २०११
(गालगागा गाल लगा गालगागा)

(मला अनुभव नाही... पण सन्यासाश्रमाकडची वाटचाल काहीशी अशीच असावी..) 

Saturday, October 22, 2011

वाट प्रकाशात न्हाली........!!


मिट्ट काळोखी रात्र
ओघळणाऱ्या प्राजक्तासारखी हळूहळू सरली..
आणि पोपडे निघालेली कोरडी पापणी
नकळतच मिटली

आजचा पहाटवारा नेहमीसारखा बोचत नव्हता
भयाण शांततेचा सूर शूलासारखा टोचत  नव्हता

आजची रात्र शेवटची होती
आणि होणारी सकाळ पहिली होती
सगळे पाश आपोपाप... स्वत:च गळून पडले होते
संवेदनांच्या सुन्नतेपुढे दु:खसुद्धा हरले होते

पुन्हा एकदा मी बोलू शकत होतो
मनातलं... मनालाच सांगू शकत होतो
डोळ्यात रुतलेल्या काचा
आणि हृदयात फुलेल्या जखमा
आता किरकोळ होत्या
आजच्या अधांतरी विहरण्याच्या आनंदापुढे
त्या फुटकळ होत्या !!

तांबड्या कोवळ्या अंधारात
माझी दृष्टी स्पष्ट झाली..
आणि क्षितिजापुढे जाणारी ती
वाट प्रकाशात न्हाली........!!


....रसप....
२० ऑक्टोबर २०११

Thursday, October 20, 2011

बेसन की सोंधी रोटी पर.... - भावानुवाद


"निदा फाजली" ह्यांची एक अप्रतिम कविता वाचनात आली. कविता इतकी सुंदर आहे की अनुवाद करावा की नाही असा प्रश्न पडला. गेले दोन-तीन दिवस पुन्हा-पुन्हा वाचली.. किमान २५ वेळा तरी.. तेव्हा कुठे जराशी हिंमत आली अनुवादाचा प्रयत्न करायची. मला जाणीव आहे की माझा प्रयत्न अगदीच बाष्कळ असेल.. तरी मूळ कवितेचा अंशभर सुगंधही माझ्या अनुवादात उतरला तर मी समजेन की मी ह्या प्रयत्नात यशस्वी झालो!

बेसन की सोंधी रोटी पर खट्टी चटनी जैसी माँ ,
याद आता है चौका-बासन, चिमटा फुँकनी जैसी माँ ।

बाँस की खुर्री खाट के ऊपर हर आहट पर कान धरे ,
आधी सोई आधी जागी थकी दुपहरी जैसी माँ ।

चिड़ियों के चहकार में गूँजे राधा-मोहन अली-अली ,
मुर्गे की आवाज़ से खुलती, घर की कुंड़ी जैसी माँ ।

बीवी, बेटी, बहन, पड़ोसन थोड़ी-थोड़ी सी सब में ,
दिन भर इक रस्सी के ऊपर चलती नटनी जैसी मां ।

बाँट के अपना चेहरा, माथा, आँखें जाने कहाँ गई, 
फटे पुराने इक अलबम में चंचल लड़की जैसी माँ ।


- निदा फाजली

भावानुवाद :

पोळी-चटणीची आंबटशी गोडी भासे माझी आई
पाहुन चिमटा चौरंगाला मज आठवते माझी आई

पहुडुन खाटेवर काथ्याच्या खुट्ट वाजता खुले पापणी
श्रांत दुपारी अर्धी-मुर्धी सावध निजते माझी आई

चिवचिव चिमण्या साद घालती "राधा-मोहन अली-अली" ची
पहाटवेळी आरव ऐकुन कवाड उघडे माझी आई

कितीक नाती वेगवेगळी, कितीक रूपे तिने वठवली
तारेवरची रोजरोजची कसरत जगते माझी आई

तुकड्यांमध्ये वाटुन उरली कुणास ठाउक कुठे कितीशी?
जुन्या फाटक्या छबीत अल्लड मजला दिसते माझी आई


मूळ कविता - "बेसन की सोंधी रोटी पर...."
मूळ कवी - निदा फाजली
भावानुवाद - ....रसप....
२० ऑक्टोबर २०११

Wednesday, October 19, 2011

"लेक लाडकी " - एक अभूतपूर्व ई-पुस्तक



जग पुढारलं आणि पृथ्वी म्हणजे एक लहानसं खेड झालं. आंतरजालासारखी जादूची कुपी हाती आली. एका क्लिकवर सगळं समोर यायला लागलं. मराठी साहित्यही याला अपवाद राहीलं नाही. मराठी कविता, मराठीतलं उत्तमोत्तम साहित्यही नेटवर उपलब्ध होऊ लागलं. 

जागतिकीकरण झालं आणि मराठीचा वारू काहीसा थंडावला. पण अमृताशीही पैजा जिंकणाऱ्या मायमराठीचे शिलेदार लेचेपेचे नव्हते, होणाऱ्या बदलाच्या झंझावातात वाहून न जाता त्याच्यासमोर उभे राहून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मराठी साहित्याने कात टाकली. अश्याच बदलाच्या कालखंडात "ऑर्कुट" या सोशल नेट्वर्किंग साईट वर जन्म झाला "मराठी कविता समुहाचा". अल्पावधीतच हा समूह लोकप्रियही ठरला. यामागे मुख्य कारण होते ते या समूहावर चालणारे सर्वसमावेशक उपक्रम. लोकांना लिहितं आणि हो, वाचतंही करणारं दर्जेदार साहित्य.
या दर्जेदार लिखाणाचं चीज व्हायला हवं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले प्रयत्न आणि ही प्रतिभा पोचायला हवी. म्हणून मग संकल्पना पुढे आली ती "ई-बुक" ची. जास्तीत जास्त लोकांपुढे, विशेषतः तरुण लोकांपर्यंत पोचण्याचा हा अतिशय प्रभावी मार्ग!!


 "लेक लाडकी "

                       आपल्या घराची लेक, हा प्रत्येक घराचा एक हळवा कोपरा असतो, लेक घराची  मर्यादा असतेच पण घराचा अमर्याद आनंदही असतो.

                       मुलीची नाळ घराशी दोनदा तुटूनही घट्ट बांधलेली असते, दोनदा ती नाळ तोडली जाते. एकदा जन्म घेतल्यावर अपरिहार्य असते म्हणून आणि दुसरी लग्न करून ती दोन घर सजवणार असते म्हणून. पण कसेही, कस्सेही असले तरी आयुष्याच्या कुठच्याही टप्प्यावर तिला "माहेर" ही तीन अक्षरं मोहिनी घालतात, हळवं करतात म्हणून घराला मुलगी हवीच ! आज मुलींची चिंताजनक संख्या, आणि स्त्री भ्रूण हत्ये विरोधात इंटरनेटच्या प्रभावी माध्यमातून काहीतरी करता याव, प्रत्येकाच्या मनातला एक हळवा धागा पकडून मुलगी ही उद्याच्या समाजाचा मुलभूत आधार आहे हे सांगावं ह्यासाठी "मराठी कविता समूहा"ने राबवलेला अजून एक दर्जेदार उपक्रम "लेक लाडकी ". ज्याला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला, म्हणूनच ई- बुक क्षेत्रात आम्ही उतरायचं ठरवलं ते "लेक लाडकी "या ई बुकच्या  रूपाने.

ह्यात मिळतील, लेकीच्या भावविश्वात रममाण झालेले, तिच्या पंखात ताकद देणारे, तिच्या कर्तृत्वावर कौतुकाची झळाळी चढवणारे आणि सासरी चालेल्या तिला पाहून हळूच डोळे टिपणारे "असंख्य लेकींचे आई बाबा "

तुम्हाला ते नक्की आवडतील ही खात्री वाटते, तरीही या प्रयत्नात काही कमी-अधिक झाल्यास किंवा न्यून राहिल्यास तुम्ही ते निदर्शनास आणून द्याल ही अपेक्षा. 


या अंकाचा आनंद घ्या.  इथे - 

आणि 



अभिप्राय द्यायला विसरू नका. 
इथे - "मराठी कविता समूह" संचालक मंडळ.

शब्दांकन - अनुजा मुळे 

Tuesday, October 18, 2011

मनात स्वत:शीच हसता का?


रोज सकाळी तुम्ही स्वत:ला आरश्यात बघता का?
आरश्याकडे बघून मनात स्वत:शीच हसता का?

पुन्हा एकदा एक नवीन सूर्य तुमची वाट पाहात असतो
तुमच्या रस्त्यावरती उजेडाच्या पायघड्या पसरून बसतो
नवीन फुललेल्या कळ्यांसारखी डोळ्यांत स्वप्नं माळता का?  
सूर्याकडे बघून मनात स्वत:शीच हसता का?

गरम चहाच्या घोटासोबत सुस्ती उतरत जाते
कुठलंसं गाणं डोक्यात रुंजी घालत असते
शब्द काही आठवत नाहीत, पण गाणं पूर्ण करता का?
चहाकडे बघून मनात स्वत:शीच हसता का?

नेहमीच तुमची ऑफीससाठी टंगळमंगळ असते
ढकलत ढकलत बायको तुम्हाला बाथरूममध्ये लोटते
नाईलाजाने का होईना, चकाचक तयार होता का?
बायकोकडे रागाने बघून मनात स्वत:शीच हसता का?

"आपल्याएव्हढं अख्ख्या जगात कुणीच सुखी नाही"
इतकं ज्याला कळलं त्याला काहीच कमी नाही!
कुणा दु:खी मित्राच्या खांद्यावर हात ठेवता का?
त्याचं हसू बघून मनात स्वत:शीच हसता का?

खूप थकता, खूप झिजता, आजचा दिवस कठिण जातो
पण बायको-मुलं पाहताक्षणी पुन्हा एकदा उत्साह येतो
मेहनतीच्या थकव्याने शांत झोपी जाता ना?
रोज सकाळी तुम्ही स्वत:ला आरश्यात बघता ना ?
आरश्याकडे बघून मनात स्वत:शीच हसता ना ?


....रसप....
१५ ऑक्टोबर २०११

Monday, October 17, 2011

बिन फटाक्यांची अजून एक दिवाळी



खात्यामध्ये खडखडाट
तरी दारामध्ये दणदणाट
इंव्हर्टरच्या वीजेचा
गल्लोगल्ली लखलखाट

झगमगाट.. दणदणाट..
आनंद साजरा करणं हेच का..?
अरे.. कानाचे पडदे फाडणं
ह्यात कसला आनंद??
हा कोणता सण..??

पणत्यांच्या माळांचा सण हा
रोषणाईचा नव्हे..
उत्साहाचा..फराळाचा सण हा
आतषबाजीचा नव्हे..

दरवर्षी वाटतं..
चार दिवस फिरायला जावं
कोलाहलापासून दूर राहावं..

पण...
माझंही घर झगमगतं..
अन् मला अडवून ठेवतं..

बिन फटाक्यांची अजून एक दिवाळी
मी साजरी करतो
आणि चार दिवस ऑफीस नाही
ह्याच आनंदात डुंबतो..!!


....रसप....

Sunday, October 16, 2011

अशीच येते उडुन कुठुनशी !


अशीच येते उडुन कुठुनशी समोर माझ्या बसती होते
माझ्या हातुन कविता माझी खुद्द स्वत:ला लिहिती होते


कधी सुरावट गुणगुणते ती खुदकन हसते जशी पाकळी
कधी मोहिनी पाडुन मजला डौलदार चालते सावळी


चिमटीत जैसे फुलपाखरू तसे जाणते भाव मनाचे
मायेच्या एका शब्दाने ताण हारते जणू तनाचे


सदैव असते सोबत माझ्या श्वासांमधुनी तीच वाहते
तिला ऐकतो, तिला पाहतो, स्पर्शातुनही ती जाणवते


गडगडत्या मेघांत नाचते खळखळत्या पाण्यात खेळते
चिंब भिजविण्या पाउस बनुनी कविता माझी धुंद बरसते



....रसप....
१६ ऑक्टोबर २०११

Saturday, October 15, 2011

शौर्यप्रभू


रणशिंग फुंकले ठाण मांडले घोडखिंड अडवुनी
तू जाय नृसिंहा गडी विशाळी देहि तोफ दुमदुमी

अस्मान फाटले तरी न ढळता थोपवून ठेवू
अंश अंश लढवुनी भूवरी रुधिराला शिंपडू
खान न जाऊ शकतो येथून आम्हा ओलांडुनी
तू जाय नृसिंहा गडी विशाळी देहि तोफ दुमदुमी

जन्म वाहिला तव सेवेला मान प्रार्थनेला
वडील आम्हा जाणुन माना अमुच्या आज्ञेला !
भले थोरले स्वराज्य आहे अमुच्या प्राणाहुनी
तू जाय नृसिंहा गडी विशाळी देहि तोफ दुमदुमी

अपुली भूमी अमुचा राजा प्राणाहुन प्रियतम
हेच आमुच्या बुलंद भक्कम मानाचे उद्यम
हर हर हर हर महादेव जयघोष भरू गगनी
तू जाय नृसिंहा गडी विशाळी देहि तोफ दुमदुमी

रात ही काळी तलवारीच्या पातीने उजळवू
यमदेवाही क्षणभर अमुचे रौद्ररूप दाखवू
अमुची छाती भेदून जाईल बाण तो बनला नाही
तू जाय नृसिंहा गडी विशाळी देहि तोफ दुमदुमी


....रसप....


Thursday, October 13, 2011

मी नसतो तेव्हा.. (थोडासा "माज"..!! )



मी नसतो तेव्हा पाउल माझे शोधत सारे फिरती
पाउलरेषा पोहोचवती त्या अनंत क्षितिजापुढती


मी नसतो तेव्हा सारे माझ्या जागी बसून बघती
अन जमलेल्या मैफलीतसुद्धा रंग-जान ना मिळती !


मी नसतो तेव्हा तप्त कोरडे वारे जळजळ करती
खदखदत्या संतापाला उधळत दिशा-दिशांना फिरती


मी नसतो तेव्हा नकली हासुन कळ्या उदासी फुलती
दवबिंदू म्हणते दुनिया पण ते अश्रू चमचम सजती


मी नसतो तेव्हा शब्दच माझे सर्वदूर दरवळती
हे खुळे-दिवाणे शायर त्यांना गुंफुन कविता म्हणती


....रसप....
१३ ऑक्टोबर २०११

Wednesday, October 12, 2011

ह्या पहाटेच्याच वेळी रोज माझी रात होते


आठवांची आठवांशी भेट आवेगात होते
ह्या पहाटेच्याच वेळी रोज माझी रात होते


दो घडीचा खेळ माझा मांडला रंगून येथे
हारणेही जिंकल्याच्या खास आवेशात होते


वाचले होते कधी तू सांग डोळ्यातील माझ्या
बोललो तर वाटते की ही फुकाची बात होते ?


संपला हकनाक तू देशावरी ह्या भेकडांच्या
ती स्मृती प्राणार्पणाची साजरी गावात होते  


जे कधी जमलेच नाही तेच करणे भाग झाले
सत्य झाकावे किती जे समजणे ओघात होते


ध्वस्त झाले सर्व काही वेचतो अवशेष आता
वाटले जे झुळुकवारे तेच झंझावात होते


भोगले ऐश्वर्य ज्याने पाहिला तो खंगलेला
हाल कुत्रे खाइना त्याचे असे हालात होते


मैफली होऊन गेल्या पण अशी झालीच नाही
ऐकणारे सोबतीने भैरवी ही गात होते 


चूक झाली हीच माझी ठेवला विश्वास 'जीतू'
दावले ते वेगळे हे चावण्याचे दात होते


....रसप....
१२ ऑक्टोबर २०११ 

Tuesday, October 11, 2011

जगजीत सिंग Jagjit Singh

स्वराधीन आरास जगजीत होता
मनातील आवाज जगजीत होता


दुखी जीवनाचा कधी भार होता
पुन्हा आस देण्यास जगजीत होता


जसा धुंद वारा सुगंधास उधळी 
नशीली तशी बात जगजीत होता 


कधी चांदण्याची, कधी आवसेची
कधी दाटली रात जगजीत होता 


जगावी गझल जीवनाची सुरीली
तुला अन मला गात जगजीत होता


जलोटा असो वा हसन वा अलीही
परी एकटा खास जगजीत होता



....रसप....
११ ऑक्टोबर २०११

Monday, October 10, 2011

जरी म्हणालो सुखात आहे..



जरी म्हणालो सुखात आहे, तरी वेदनेस काय सांगू
मनात माझ्या कितीक जपल्या, नवीन जखमेस काय सांगू


नकोच होती सहानुभूती मला जगाची उधार म्हणुनी
झुगारले मी तरी पाहती, खजील नजरेस काय सांगू?


इथेच होता मला लाभला निवांत वेळी कधी निवारा
पोखरलेल्या अवशेषांच्या सुन्या शांततेस काय सांगू ?


बंध रेशमी जपण्यासाठी झटलो होतो मीच नेहमी
निर्विकारतेने तू धागे कसे तोडलेस काय सांगू?


उगाच खोटा करुन चेहरा मला हासणे जमतच नाही
खोड जित्याची ना सरणारी, अश्या उणीवेस काय सांगू?


....रसप....
१० ऑक्टोबर २०११

Saturday, October 08, 2011

ती बघते तेव्हा..!



ती बघते तेव्हा राधा बनुनी चित्त चोरते माझे
अंतरात माझ्या श्याम बोलतो "राधे... राधे.. राधे...!"


ती बघते तेव्हा गंध प्यायले रंग उधळती वारे
मज वाटे रंगित, गंधित, धुंदित भवतालीचे सारे


ती बघते तेव्हा असे वाटते बघून बघतच राहो
क्षण एक आज हा इथेच ऐसा क्षणभर थांबुन राहो


ती बघते तेव्हा विशाल अंबर पायी लोळण घेते
प्राशून सागराला मी उरतो मुठीत धरणी येते


ती बघते तेव्हा लाजलाजरे गाल गुलाबी होती
मधुशाला सारी जणू मांडली लाल रसील्या ओठी


ती बघते तेव्हा हृदयामधुनी तीर पार तो जातो
मी 'हाय' बोलुनी पुन्हा पुन्हा तो छातीवरती घेतो


ती बघते तेव्हा शब्दांचाही गोंधळ थोडा उडतो
अर्थास शोधणे व्यर्थच होते, फक्त पसारा उरतो !



....रसप....
८ ऑक्टोबर २०११


"ती रुसते तेव्हा.." 
"ती रुसली तेव्हा.." 
"ती हसते तेव्हा"
"ती नसते तेव्हा.."

Wednesday, October 05, 2011

तुझे ते मला पाहणे काय सांगू?


तुझे ते मला पाहणे काय सांगू?
गुलाबापरी लाजणे काय सांगू ?

तुझा तीर मी झेलताना हसावे
असे वार सांभाळणे काय सांगू?

मिळावा जरासा मलाही दिलासा
अबोला तुझा साहणे काय सांगू?

कधी मोरपंखी तुझा स्पर्श होता
शहारा उठे! कारणे काय सांगू?

मधू अमृताला जणू प्यायलो मी
तुझे ओठ गंधाळणे काय सांगू!!


....रसप....
५ ऑक्टोबर २०११

Monday, October 03, 2011

ती भेटते, हरवून जाते



एकट्याने आठवांना चाळवूनी जागतो मी
रातराणी माळुनी ती रात गंधाळून येते
"थांब रे थोडे क्षणा तू", आपल्याशी बोलतो मी
तार स्वप्नी छेडुनी ती भेटते, हरवून जाते

सागराच्या हासण्याला अर्थ होता गूढ काही
एक वेडी लाट माझी पावले स्पर्शून जाते
वाटते की स्पर्श ओला हा तिचा, पण तीच नाही
पापणी ओलावुनी ती भेटते, हरवून जाते

शब्द माझे सूर माझे साज गातो ही विराणी
ऐकुनी माझ्या व्यथेला वेदनाही दाद देते
पण कधी गाणार मी ती धुंदशी शृंगारगाणी
प्रश्न करण्या हाच का ती भेटते, हरवून जाते ?

थांबल्या नाहीत वाटा  मीच आहे थांबलेला
ह्या पहाटेच्याच वेळी रोज माझी रात होते
जीवनाशी पाठशिवणी खेळ माझा चाललेला
आस देण्याला मला ती भेटते, हरवून जाते..


....रसप....
३ ऑक्टोबर २०११



Saturday, October 01, 2011

ती नसते तेव्हा..



ती नसते तेव्हा नजर बावरी होते, भिरभिर करते
मी माझा हसतो, बसतो, बघतो; लक्ष कशातच नसते


ती नसते तेव्हा अंगावरती भिंती धावुन येती
पाहून उंबरा उदासवाणा बंद कवाडे होती


ती नसते तेव्हा गुलाबगाली दहिवर का चमचमते?
का सुगंध शोधत झुळुक मंदशी एकटीच झुळझुळते?


ती नसते तेव्हा मनात माझ्या खळकन काही तुटते
पण कुणास माझी वेडी तळमळ बघूनही ना दिसते


ती नसते तेव्हा वाळूवरती नाव तिचे मी लिहितो
तो खळखळ करुनी धावत येतो, सारे मिटवुन जातो


ती नसते तेव्हा रात्र गोठते, सरूनही ना सरते
आकाश सांडते भवताली काहूर दाटुनी येते


ती नसते तेव्हा मिटता डोळे समोर येवुन बसते
ती बोलत काही नाही मजला क्षणभर हसवुन जाते


....रसप....
१ ऑक्टोबर २०११

"ती रुसते तेव्हा.." 
"ती रुसली तेव्हा.." 
"ती हसते तेव्हा"
ती बघते तेव्हा..!
Related Posts Plugin for WordPress, Blogger...