"मोठ्या नावाजलेल्या व्यक्तींचा एकेरी उल्लेख करून किंवा ज्याला-त्याला काका-मामा-दादा-मावशी-आत्या म्हणून दाखवून आपली किती चांगली ओळख आहे असं दाखवलं, की आपणही कुणी तरी असामी बनतो." हा हमखास फॉर्म्युला जसा सर्वांना माहित आहे; तसंच "जिथे जमेल तिथे मनसोक्त भ-कार, म-कार घालून, अतिरंजित खून-मारामाऱ्या किंवा काही तरी विक्षिप्त/ विकृत/ भडक/ अश्लील/ क्रूर/ बीभत्स वगैरे चित्रण केलं की आपला चित्रपट वास्तवदर्शी होतो आणि 'हट के' ठरतो", हाही फॉर्म्युला सर्वांना माहित होत चालला आहे. 'गँग्स ऑफ वासेपुर' अश्याच पठडीतला एक तथाकथित 'हट के' सिनेमा वाटला. (इंग्रजीत नाव देणं - हाही एक 'फॉर्म्युला'!)
सिनेमाची सुरुवात होते तीच गोळ्यांच्या धो-धो वर्षावाने. वासेपुर, बिहार (आता झारखंड) मधील एक छोटंसं खेडं.. तिथले कुणी गुंड कुणाच्या तरी वाड्यावर बॉम्ब आणि गोळ्यांचा असा काही पाउस पाडतात की तिथेच कल्पना येते की पुढे तुम्हाला असं काही बघायला मिळणार आहे, जे पूर्वी क्वचितच पाहिलं असेल.
सिनेमाची एकूण कहाणी साधारणत: तीन कालखंडातली आहे. एक स्वातंत्र्यपूर्व (१९४१-४२), स्वातंत्र्योत्तर - १ (१९४७ च्या आसपास) आणि स्वातंत्र्योत्तर - २ (१९८० चे दशक).
१९४१ ची गोष्ट. धनबादजवळील वासेपुर गावात 'कुरेशी' जातीच्या सुलताना डाकूचं वर्चस्व असतं. एकंदरीतच कुरेशी, ह्या कसाई ह्या जमातीचा गावावर वचक असतो. हा भाग मुस्लीमबहुल दाखवला आहे. इथल्या मुस्लिमांचे सरळसरळ दोन भाग आहेत. एक कुरेशी आणि दुसरा इतर. तर, हा सुलताना इंग्रजांच्या रेल्वेगाड्यांना लुटत असे. गावातील 'शाहीद खान' नामक पठाण सुलतानाच्या नावाचा - धाकाचा - फायदा घेऊन त्याच्या नावाने लुटमार सुरू करतो. रेल्वेही लुटतो. ही माहिती सुलतानाला कळल्यावर तो शाहीद खानच्या संपूर्ण टोळीला कंठस्नान घालतो आणि जिवंत वाचलेला शाहीद खान बायकोच्या अन होणाऱ्या बाळाच्या प्रेमाखातर लुटमार सोडतो, वासेपुरही सोडतो आणि धनबादला येऊन कोळश्याच्या खाणीत मजुरी करू लागतो. त्याची बायको मुलाला जन्म देताना मरण पावते. मजुरांवर वचक ठेवणारा पहेलवान त्याला वेळेवर घरी जाऊ देत नाही, म्हणून तो त्यास बदडून काढतो. त्याची हिंमत व ताकद बघून कोळश्याच्या खाणीचा नवा मालक 'रामाधीर सिंग' त्याला त्याचा खास माणूस बनवतो. पण शाहीद खानच्या मनात घातक विचार असतात, जे रामाधीरला समजतात आणि वेळीच तो शाहीद खानचा काटा काढतो, अर्थात त्याला मारून टाकतो. खानाचा जुना साथीदार, खानाच्या ६-७ वर्षांच्या मुलाला घेऊन पळतो आणि त्याला वाढवतो. हा मुलगा लहान वयातच शप्पथ घेतो की, "रामाधीर सिंगला बरबाद करून बापाच्या खूनाचा बदला घेईन, त्यानंतरच केस वाढवीन!"
कट. मुलगा मोठा झाला आहे - टकला मनोज वाजपेयी, नाव 'सरदार खान'.
सरदार खान, सिनेमातील इतर प्रत्येक व्यक्तिरेखेप्रमाणे उदरनिर्वाहासाठी गुंडगिरी, लुटमार वगैरेच करत असतो. पुढे तो वासेपुरला येतो. काही तरी काही तरी करतो आणि रामाधीरला त्रास देतो. बायकांची लफडी करतो. खून करतो.. स्मगलिंग करतो.. अनधिकृत जमिनी बळकावतो.. हफ्ता वसुली करतो.. अखेरीस अगदी मासेमारीही करतो. त्याचा बदला पूर्ण होतो का? हे बघायचं असेल(च) तर सिनेमा पाहा. (नाही पाहिला, तरी फरक काहीही पडणार नाही. पण तरी......)
१. एकंदरीत सिनेमाची कथा उत्कंठावर्धक आहे. पण मांडणी अत्यंत विस्कळीत वाटली. सरदार खानचं 'दुर्गा' (रीमा सेन)शी लफडं दाखविण्याचं, त्याला 'रंडीबाज' दाखविण्याचं प्रयोजन सिनेमातील इतरही काही घटना व पात्रांप्रमाणे, कळत नाही. अश्या अनेक अनावश्यक पात्र व घटनांमुळे अनेकदा असं विचार येतो की, अरे नक्की काय चाललं आहे? आणि मग अर्थातच शेवट अचानक 'कसा तरी' होतो.
२. सिनेमात सर्वात महत्त्वाचे काम कुणाचे असेल तर निवेदक! निवेदन आहे, म्हणून सिनेमा मला तरी थोडाफार कळला. अन्यथा अनन्वित तुकड्यांना एकत्र सांधणं सहज शक्य करण्याचं कसब दिग्दर्शकात आहे का? - हा वादाचा विषय ठरावा. (निवेदकाचा आवाज बहुतेक मनोज वाजपेयीचाच आहे, मी श्रेयनामावली बघण्यास थेटरात थांबलो नाही. सिनेमा संपल्या संपल्या बाहेर पडलो. कारण मला बाहेर पडून 'नॉर्मल' भारत पाहायची अनावर इच्छा झाली होती.)
३. खून, मारामाऱ्या, लुटालूट, वगैरे वगैरे इतकं सर्रास चाललेलं दाखवलं आहे की अतीच वाटावं. मान्य आहे, भारतातही असे काही भाग आहेत जिथे कायदा सुव्यवस्था नामशेषच असावी. परंतु, अश्या ठिकाणीही पोलिसांचा वावर असतोच, फक्त ते भ्रष्ट/ सामील असतात. पण सिनेमात तर म्हणजे 'जंगल कानून'च आहे! हे म्हणजे फार्रच काहीच्या काही वाटतं. हा भारत आहे की अफगाणिस्तान ?
४. दर १० मिनिटांनी कुणा ना कुणाच्या आई-बहिणीचा उद्धार केल्याने सिनेमा वास्तवदर्शी होतो, हा समज जर खरोखरच प्रेक्षक आणि दिग्दर्शक-निर्माते-लेखकांत दृढ झाला असेल, तर ही चिंतेची बाब आहे. पूर्वी 'कहानी की जरूरत' म्हणून अंगप्रदर्शन वगैरे केलं, असं म्हटलं जायचं. आता तर 'कहानी की जरूरत' म्हणून आम्ही अश्लील/ अश्लाघ्य वगैरे काही केलं नाही, असं म्हणायची वेळ आली आहे की काय? की आणायची आहे? गेट वेल सून, बॉलीवूड ! वास्तव म्हणजे शिवीगाळ नाही, अश्लीलता नाही. वास्तव भेदक असलं तरी ते परिणामकारकरीत्या दाखविण्यासाठी बिनधास्तपणाची कुबडी घेणं एक वेळ ठीक पण त्याच एका बांबूवर अख्खा तंबू उभारणार असाल, तर अल्लाह मालिक !
५. संगीत ? ते काय असतं भाऊ?
६. सिनेमातील अनेक व्यक्तिरेखा (यादव, रामाधीरचा मुलगा, दुर्गा, दुर्गेची पोरं, ई.) आणि घटना (फैजल खान - नवाझुद्दिन सिद्दिकी - ची 'डेट', त्याने वाराणसीला जाऊन बंदुका घेऊन येणे आणि पकडलं जाणे, नंतर परत तिथे जाऊन 'यादव'ला मारणे, सरदार खानची तुरुंगवारी, मासेमारी, ई.) मूळ कथेला भरकटवण्याचं काम करतात.
७. नवाझुद्दिन सिद्दिकी ला ह्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे, असं ऐकलं. पण मला तर तो सिनेमात का आहे, हेच कळलं नाही. त्याच्या अभिनय कौशल्याला अक्षरश: वाया घालवलं आहे.
८. सिनेमाच्या शेवटी 'To be continued....' आहे. ह्याचा अर्थ कदाचित कहाणी अजून बाकी आहे! हे तर अजूनच वाईट ! माझ्या मते तीन तासांत कुठलीही कहाणी पूर्णपणे मांडता आली पाहिजे. जमत नसल्यास सरळ सिरीयल काढावी!
मागे एकदा एका अत्यंत रद्दड चित्रपटावर मी सडकून टीका केल्यावर एका जाणकार वाचकाने मांडलेला एक मुद्दा मला मनोमन पटला होता. सिनेमा बघायला जाताना, प्रेक्षक आणि निर्माता-दिग्दर्शक ह्यांच्यात एक छुपा करार झालेला असतो. काही निर्माता-दिग्दर्शकांचे सिनेमे हे टोटली इललॉजिकलच असतात, तर काहींचे सिनेमे जरा सेन्सिबल वगैरे असतात, काहींचे अजून काही, काहींचे अजून काही...... थोडक्यात, एकाच मोजपट्टीवर डेव्हिड धवन, मणीरत्नम, कारण जोहर, वगैरे सगळे मोजले जाऊ शकत नाहीत. हाच विचार मनात होता आणि मी अनुराग कश्यपच्या सिनेमाला मोठ्या अपेक्षेने गेलो होतो. तब्बल तीन तासांच्या गदारोळानंतर मी जेव्हा बाहेर आलो, तेव्हा थोडक्यात सांगायचं तर, मला टोटलच लागली नाही! कदाचित हा सिनेमा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या इतर अनेक सिनेमांपेक्षा किंचित सरस असेलही, नव्हे आहेच ; पण अनुराग कश्यप...? बॉस, यु एक्स्पेक्ट समथिंग बेटर प्लीज!
Alryte ..atleast now I can decide where to watch it.. On DVD or on theatere... thanks... I know what to do now... But Liked two comments from bottom of my heart (1) कारण मला बाहेर पडून 'नॉर्मल' भारत पाहायची अनावर इच्छा झाली होती and (2) हा भारत आहे की अफगाणिस्तान ?
ReplyDelete....Dharmesh