Sunday, January 30, 2011

काळ (२ कविता)

काळ
म्हणजे?
पूर्णविराम?
की स्वल्पविराम?
एक अटळ फलश्रुती?
की एक नवी सुरुवात?
सर्व तत्त्वप्रणाली खुंटतात
अस्तित्त्वाचा शोध भरकटतो
भौतिकातील वासना संपल्यावर
फक्त एक शून्यरूप सत्य कळून येतं
की इथून पुढे काहीच माझं नाही
ज्यावर माझं अनंत प्रेम होतं
ज्याची नेहमीच हाव होती
जे अत्यंत नावडतं होतं
जे क्लेशकारक होतं
आता नवा आरंभ
शून्यातून पुढे
कारण मी
शून्य


....रसप....
३० जानेवारी २०१०


ब्रम्हाजींच्या (श्री. घन:श्याम पोटभरे) अनेक अप्रतिम रचनांपैकी एक - "एक" - ह्या रचनेवरून प्रेरणा घेऊन लिहिले.
ही अर्थातच फक्त एक प्रेरणाच आहे, मूळ रचनेच्या जवळपासही जात नाही.




अजरामर
.
एकच सत्य "काळ" - अजरामर आहे
एकेक क्षण आला-गेला त्याचाच हिशोब आहे
सावलीचे पाय थकतील
तेव्हा डोळ्यांत मृगजळ भरेल
हातभरावरचं क्षितीज टीचभरच वाटेल
वाट असेल गूढ काळोखी
पण मनात ’त्या’चा प्रकाश असेल
सुन्न झालेल्या इंद्रियांना एकच चेतना असेल
झाला प्रवास निरर्थक आणि
पुढचा टप्पा आकर्षक दिसेल
तेव्हा पटेल प्रारब्धाला -
एकच सत्य "काळ" - अजरामर आहे
एकेक क्षण आला-गेला त्याचाच हिशोब आहे.


....रसप....
३० जानेवारी २०१०

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...