"मराठी कविता" ह्या ऑर्कुट समुहाच्या "प्रसंगावरून कविता" ह्या उपक्रमासाठी केलेली रचना
देवा तुझी नवलाई
कणाकणाच्याही ठायी
तरी साद का रे माझी
तुझ्या कानी जात नाही
कसा बहरला ऋतू,
तुझ्या मायेने फळला
मीही तुझाच रे लेक,
भोग मलाच लाभला
थंड गार ह्या हवेला
आसवांचाच ओलावा
भाळी लिहिला अंधार
कुणी उजेड पाहावा
कुणा सांगावे गा-हाणे
घायकुतीला येऊन
काय भरावी खळगी,
हाल आपले खाऊन
तुझ्या हाती खेळ सारा
तूच मांडला पसारा
देवा आता पामराला
आहे तुझाच निवारा
चारा शेरडापुरता
नको गार माळरान
घासभर पोटाला दे
अन डोक्यावर पान
....रसप....
१३ जानेवारी २०१०
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!